अहमद पटेलांनी नारायण राणेंना तीन वेळा साफ गंडवलं.

राजकारण ही जगातली सर्वात चंचल गोष्ट. भल्या भल्यांना ही सत्ता सुंदरी धोका देऊन जाते. कधी कधी हाता तोंडाशी आलेला घास ऐनवेळी कोणीतरी स्कीम करून हिरावून घेऊन जातो. अंदाज अपना

महाराष्ट्राची धडाडती तोफ म्हणून ओळखले जाणारे, राजकारण कोळून पिलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या आयुष्यात अनेक वादळ झेलेले. अगदी रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यापासून ते मुख्यमंत्री पदाचा प्रवास केला. उद्धव ठाकरे यांच्याशी वाद करून शिवसेना सोडायचं धाडस देखील केलं .

अगदी बाळासाहेब ठाकरेंशी टक्कर घेतली. पण पुढे कॉंग्रेसमध्ये गेले आणि त्यांचं सगळ नशीबच गंडत गेलं.

गोष्ट आहे २६ जुलै २००५ सालची. राणेंनी शिवसेना सोडली होती. त्यावेळी त्यांना अनेक पक्षातून ऑफर आल्या होत्या पण निर्णय होत नव्हता. दिल्लीच्या ताज हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. त्यावेळी रात्री तीन वाजता त्यांना भेटायला कॉंग्रेसचे चार नेते  आले. 

सोनिया गांधींचे सल्लागार अहमद पटेल, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष प्रभा राव, पक्षाच्या निरीक्षक मार्गारेट अल्वा आणि दिवंगत बाळासाहेब विखे पाटील. त्यांनी नारायण राणे यांना पक्षात आमंत्रण दिल.

नारायण राणे यांनी त्यांना मला काय देणार हे विचारले. तेव्हा अहमद पटेल म्हणाले,

‘राणेजी, हमे कुछ वक्त दीजीये.’

राणे म्हणाले, ‘कितना वक्त आपको चाहिये?’

त्यावेळी अहमद पटेल यांनी त्यांना सहा महिने मागितले व त्यानंतर मुख्यमंत्री करतो असे आश्वासन दिले.

राणेंनी विचार केला की सहा महिने सहज जातील, काही हरकत नाही. दुसर्‍या दिवशी अकरा वाजता त्यांनी कॉंग्रेसला होकार सांगितळा. सोनिया गांधींच्या साक्षीने नारायण राणे यांचा कॉंग्रेस प्रवेश केला.

मुंबईत त्या दिवशी भरपूर पाऊस पडला होता. मुंबई बंद पडली होती. दुसऱ्या दिवशी नारायण राणे मुंबईला आले. त्यांना विलासरावांच्या मंत्रीमंडळात महसूल मंत्री पद देण्यात आलं. नारायण राणे कॉंग्रेसमध्ये सेटल झाले. पुढे कॉंग्रेसवाल्यांनी राणेंना दिलेलं आश्वासन सोयीस्कररित्या विसरून अडगळीत टाकलं. पण राणे विसरले नव्हते.

सहा महिन्यांनी त्यांनी पटेलांना आठवण करून दिली.

आज उद्या करता करता अखेर एक वर्ष भरानंतर त्यांनी राणेंना दिल्लीला बोलावून घेतलं.

दोघे सोनिया गांधी यांच्या कडे गेले. तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखांविरुद्ध अहमद पटेल यांनी सोनिया गांधी यांना बरच काय काय सांगितल. राणे खुश होते. पुढे दोघे बाहेर आल्यावर अहमद पटेलांनी नारायण राणे यांचं अभिनंदन केलं,

‘राणेजी, दो – तीन दिन मे मुख्यमंत्रीकी शपथ लीजिएगा’

राणेंना आभाळ ठेंगण झाल होता. पण दोन दिवस झाले, आठवडा झाला, महिना झाला, वर्ष झाले. पण ती शपथविधी काही झाली नाही. नारायण राणे आता कॉंग्रेसच्या पद्धतीला सरावत चालले होते. त्यांनी वाट पाहायचं ठरवलं.

परत सेम असच झाल. अहमद पटेल यांनी त्यांना दुसर्‍यांदा बोलावलं आणि परत मॅडमकडे नेले. पहिल्यावेळी केले तसेच सोनिया गांधींशी बोलणे झाले.

अहमद पटेल म्हणाले,‘राणेजी, आनेवाले वीक मे हो जाएगा सबकूछ. हम निर्णय ले लेंगे’

बाहेर आल्यावर परत अभिनंदन केलं. यावेळी पटेल त्यांना गाडीतून घरी घेऊन गेले. चहा पाजला. परत तोही आठवडा गेला. वर्ष गेले. राणेंच्या हाती धुपाटण आलं. शांतपणे या सगळ्या कडे पाहणारे विलासराव गालातल्या गालात हसत राहिले. त्यांच्या खुर्चीला कसलाही धक्का बसला नाही.

मध्ये महाराष्ट्रात राजकीय घडामोडी तीव्र झाल्या होत्या. परत  यावेळी त्यांना कॉंग्रेसच्या महाराष्ट्राच्या प्रभारी मार्गारेट अल्वांनी दिल्लीला बोलावल. अहमद पटेलांसोबत नारायण राणे यांना त्या सोनिया गांधी यांना भेटवल. नेहमीप्रमाणे बाहेर आल्यावर दोघांनी त्यांचं अभिनंदन केले.

राणे मार्गारेट अल्वांच्या घरी गेले. त्या म्हणाल्या, ‘अब हो जाएगा.’ ही तिसरी वेळ.

चौथ्यांदा, जेव्हा  २६/११ च्या हल्ल्यानंतर खरोखर विलासरावांना पायउतार व्हाव लागलं. त्यावेळी देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नारायण राणे आघाडीवर होते. यावेळी तर दिल्लीवरून प्रणव मुखर्जी, संरक्षणमंत्री ए. के. अँटनी आणि दिग्विजय सिंह निरीक्षक म्हणून आले व  विधीमंडळात प्रत्येक आमदाराला भेटले.

नारायण राणे म्हणतात की,

४८ जणांनी मुख्यमंत्रीपदासाठी मला पाठींबा दिला, ३२ जणांनी ‘अशोक चव्हाण’ दिले आणि ४ जणांनी ‘बाळासाहेब विखे पाटील’ दिले.

त्या दिवशी प्रणवदा विधिमंडळाच्या बाहेर पायरीवर येऊन नाव जाहीर करणार होते.  कॉंग्रेसमध्ये मतदान झाल्यानंतर निरीक्षकाने निवडलेल्या नेत्याचे नाव जाहीर करायची पद्धत आहे पण त्या दिवशी ते जाहीर होऊ दिले गेले नाही.

त्याच रात्री नारायण राणे दिल्लीला जायला निघाले. प्रणव मुखर्जी, अँटनी, दिग्विजयांनी त्यांना त्यांच्या विमानात घेतले.

दिग्विजय सिंग यांनी तर राणे यांचं अभिनंदन केले.

‘राणेजी, हो गया’.

दिल्लीला आलेली टीम रात्री दीड वाजता सोनिया गांधीना भेटली. सोनियाजी म्हणाल्या की सकाळी अकरा वाजता राणेंच नाव जाहीर करू.  नारायण राणे यांनी सकाळी अकरा वाजता टीव्ही लावला तर त्यात मुख्यमंत्रीपदी अशोक चव्हाण यांचे नाव.

एकेकाळचा हा दिग्गज नेता, माजी मुख्यमंत्री कॉंग्रेसवाल्यांच्या चक्रव्यूव्हात कायमचा जायबंदी झाला.

पुढे अशोक चव्हाणांचा आदर्श घोटाळ्याप्रकरणी राजीनामा झाला, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री बनले पण राणे यांना बघत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांचा दोन वेळा विधानसभेला पराभव झाला.

अखेर शेवटी त्यांनी भाजपचा आसरा घेतला. तिथे तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये देखील त्यांचं नाव नसत. शिवसेनेच्या वाघाला राजकारणाच्या स्कीमांनी अगदी घाईला आणल आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.