शतकाच्या जवळ पोहचलेले अहमद पटेल माधवराव सिंधीयांना घाबरून आउट झाले…

डॉ.मनमोहनसिंग सरकार होतं तेव्हा एकच बोललं जायचं. काँग्रेसचा सर्वात मोठा खिलाडी म्हणजे अहमद पटेल.

गुजरात मध्ये त्यांना सुरवातीपासून लंबी रेस का घोडा म्हणून ओळखलं जायचं. अवघ्या पंचविसाव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा लोकसभा लढवली. तो काळ आणीबाणी नंतरचा होता. बाबूभाई म्हणून फेमस असलेले अहमद पटेल प्रचंड महत्वाकांक्षी माणूस. त्यांनी काँग्रेसने सोडलेली निवडणूक जिद्दीने लढवली. इंदिरा गांधींना प्रचारासाठी भरुचला आणलं. 

खरं तर अनेक काँग्रेस उमेदवार इंदिरा गांधी आपल्या प्रचाराला येऊ नयेत याच प्रयत्नात होते पण हा २६ वर्ष अहमद पटेल मागे हटणारा नव्हता. भरुचला इंदिराजींची सभा झाली,नेहमीप्रमाणे त्यांनी सभा जिंकली. पण त्यांना राहून राहून अहमद पटेलांचं आश्चर्य वाटत राहिलं.

आणि जनता पक्षाच्या लाटेतही अहमद पटेलांनी विजय खेचून आणला.

खुद्द इंदिरा गांधी पराभूत झाल्या होत्या. त्यांना तो गुजराती तरुण लक्षात राहिला. अहमद पटेलांना युथ काँग्रेसची जबाबदारी देण्यात आली. गुजरातच्या तरुणांना पुन्हा पक्षाकडे वळवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. संजय गांधी आणि इंदिरा गांधी यांचा त्यांच्या डोक्यावर वरदहस्त होता. अल्पसंख्याक समाजातील असणे हे त्यांच्या राजकारणात कधीही खोड बनले नाही उलट त्यांनी याचा फायदा उठवून आपली राजकीय छबी मजबूत बनवली.

इंदिरा गांधी संजय गांधी यांच्यानंतर राजीव गांधींशी देखील त्यांचे सूर जुळले. ते राजकारणात आले तेव्हा अहमद पटेल यांना पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून त्यांच्या मदतीसाठी देण्यात आलं.

फिरोज गांधी यांच घराणं मूळ गुजरातच्या भरुचचे असल्यामुळे अहमद पटेल यांच्या विषयी राजीव गांधीना विशेष आपुलकी होती. त्यांनी आपली कर्तबगारी देखील सिद्ध केली होती. म्हणूनच अहमद पटेल राजीव गांधी यांची सावली बनले.

वरवर पाहता लाजाळू, अत्यंत मितभाषी अहमद पटेल यांनी राजीव गांधींच्या सोबत काँग्रेसमध्ये सुशिक्षित तरुणांना जोडण्याचं काम केलं. त्यांनी १९८४ साली सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकली. राजीव गांधी पंतप्रधान बनल्यावरही त्यांनी पुन्हा मंत्रिपद नाकारलं.

राजीव गांधी नेहमी म्हणायचे एकवेळ मी निवडणुकीत पडेन पण अहमद पटेल कधीही कोणतीही निवडणूक हरणार नाही.

अगदी लहान वयातच अहमद पटेल राष्ट्रीय राजकारणात किंगमेकर म्हणून ओळखले जाऊ लागले.

याच काळातली एक आठवण.

भारताच्या संसदेची परंपरा आहे कि राजकारणाच्या धामधुमीत विसावा म्हणून अधून मधून खासदारांचे क्रिकेट सामने खेळवले जातात. खुद्द पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू देखील अशा स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. पार्लमेंट क्रिकेट टीम म्हणून या संघाला ओळखलं जाई .  या पार्लमेंटरी क्रिकेट टीमचे कॅप्टन असायचे माधवराव सिंधिया.

माधवराव सिंधिया म्हणजे ग्वाल्हेर घराण्याचे संस्थानिक. त्यांची आई भाजपच्या संस्थापिका. माधवरावांनि राजकारणाची सुरवात जनसंघातून केली होती पण पुढे ते काँग्रेसमध्ये आले. संजय गांधी, राजीव गांधी यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांना मोठं स्थान मिळालं.

माधवराव कॉलेज जीवनापासून ते क्रिकेट चांगले खेळायचे, राजकारणाच्या घाईगडबडीतही त्यांचा क्रिकेटचा शौक कधी कमी झाला नाही. उलट त्यांनी क्रिकेटच्या प्रशासनात लक्ष घातले. महाविद्यालयीन काळात खेळल्याचा परिणाम त्यांनी बीसीसीआय मध्ये आपली चांगलीच छाप पाडली. पुढे जाऊन ते त्याचे अध्यक्ष देखील बनले.

एकदा संसदीय क्रिकेट टीमची मॅच होती. ओपनिंगला बॅटिंगला आले होते अहमद पटेल.

खरं तर अहमद पटेल सुद्धा चांगली बॅटिंग करायचे. पण त्या दिवशी बाबूभाईंना विशेष जोर चढला होता. त्यांनी आल्यापासून फटकेबाजी सुरु केली. फक्त चौकार आणि षटकारची ते बरसात करू लागले. सिंगल डबल धावा काढतच नव्हते. काढल्यातरी ओव्हरच्या शेवटच्या बॉलला एक रन काढायचं म्हणजे पुढच्या ओव्हरला स्ट्राईकला पुन्हा तेच.

इकडे नॉन स्ट्रायकर एन्डला खुद्द महाराजा माधवराव सिंधिया उभे होते. पण अहमद पटेल त्यांना सुद्धा स्ट्राईक देत नव्हते. स्टेडियममध्ये नुसता धुमाकूळ सुरु होता. किंगमेकर अहमद पटेल त्यादिवशी स्वतः किंग बनायला खेळत होते. बघता बघता ते शतक काढायच्या जवळ पोहचले. पण त्यांचा स्पीड कमी होत नव्हता. फटकेबाजी सुरूच होती. पुन्हा त्यांनी शेवटच्या बॉलला एक धाव काढली आणि पुढच्या ओव्हरला स्वतः स्ट्राईकला गेले.

इकडे माधवरावांची सहनशक्ती संपली. गडी दुसऱ्याला खेळूच देत नाही म्हणजे काय ? त्यांनी पुढच्या ओव्हरच्या आधी पटेलांना जवळ बोलावून घेतलं.

आप मुझे बैटिंग क्यों नहीं दे रहे? मैं केवल दौड़ने के लिए मैदान में आया हूं क्या ?

माधवरावांनी अगदी स्पष्ट शब्दात पटेलांना सांगितलं की तुमचा खेळ बास झाला आता दुसर्यांना खेळू द्या. खुद्द महाराजा भडकलेत म्हटल्यावर काँग्रेसच्या चाणक्याचे धाबे दणाणले. राजकारणात कोणाशी पंगा घ्यायचा आणि कोणाला कुठं कधी कस उत्तर द्यायचं याच बाळकडू बनिया दिमाग असलेल्या पटेलांना चांगलंच ठाऊक होतं. पुढच्याच बॉलला आपली विकेट टाकली. 

अहमद पटेलांचं शतक तेव्हा हुकलं. आणि याला कारण ठरले माधवराव सिंधिया.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.