एकेकाळचा पंचायत समितीचा सदस्य काँग्रेसचा शातीर दिमाग कसा बनला होता ?

वर्ष १९७७, इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीनंतर काँग्रेस पक्ष मोडकळीस आला होता. अनेक जुने मोठे नेते जनता पक्षात गेले होते. जे उरले होते ते खुश नव्हते.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंदिरा गांधींच्या आणिबाणीवर जनता खुश नव्हती, संजय गांधी व त्यांच्या टोळक्याने केलेली जबरदस्ती कित्येकांना पसंत नव्हती. काँग्रेस विरुद्ध लाट होती.इंदिरा गांधींचा पराभव होणार हे स्पष्ट होतं.

विशेषतः गुजरातमध्ये काँग्रेसची स्थिती अत्यंत दयनीय होती. इथल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनापासूनच जयप्रकाश नारायन यांनी इंदिरा गांधींच्या विरुद्ध क्रांतीचा वणवा पेटवला होता. गुजरातच्याच असलेल्या मोरारजी देसाई यांच्यामुळे देखील जनता पक्ष गुजरातमध्ये चांगला रुजला होता.

एरव्ही काँग्रेस पक्षातून तिकीट मिळवण्यासाठी भांडणारी मंडळी निवडणुकीतून पळ काढत होती. गुजरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना उमेदवार शोधेपर्यंत नाकी नऊ आले होते.

भरुच लोकसभा मतदारसंघाची देखील अशीच अवस्था झाली होती. एकेकाळचा हा गड संपूर्णपणे ढासळला होता. अशावेळी एका जेष्ठ नेत्याने भरुचमधल्या पंचवीस वर्षाच्या पंचायत समितीच्या सदस्याला लोकसभेचा उमेदवार म्हणून जाहीर केलं.

त्या उमेदवाराच नाव होतं अहमदभाई मोहम्मदभाई पटेल.

अहमद पटेल तेव्हा फक्त २५-२६वर्षांचे होते. त्यांचे वडील तालुक्यातले मोठे नेते होते पण अहमद पटेलांना राजकारणात येऊन पंचायत समितीची निवडणूक जिंकून फक्त १ वर्ष झालं होतं. त्यांना तिकीट दिलं म्हणून काँग्रेसच्या काही नेत्यांनी कुरकुर केली पण तसंही भरुच जिंकण्याची शक्यताच नव्हती त्यामुळे कोणीही उभं राहिलं तरी फरक पडणार नव्हता.

गुजरातच्या राजकारणात बाबूभाई म्हणून फेमस असलेले अहमद पटेल प्रचंड महत्वाकांक्षी माणूस. त्याने काँग्रेसने सोडलेली निवडणूक जिद्दीने लढवली. इंदिरा गांधींना प्रचारासाठी भरुचला आणलं.

खरं तर अनेक काँग्रेस उमेदवार इंदिरा गांधी आपल्या प्रचाराला येऊ नयेत याच प्रयत्नात होते पण हा २६ वर्ष अहमद पटेल मागे हटणारा नव्हता. भरुचला इंदिराजींची सभा झाली,नेहमीप्रमाणे त्यांनी सभा जिंकली. पण त्यांना राहून राहून अहमद पटेलांचं आश्चर्य वाटत राहिलं.

आणि जनता पक्षाच्या लाटेतही अहमद पटेलांनी विजय खेचून आणला.

खुद्द इंदिरा गांधी पराभूत झाल्या होत्या. त्यांना तो गुजराती तरुण लक्षात राहिला. अहमद पटेलांना युथ काँग्रेसची जबाबदारी देण्यात आली. गुजरातच्या तरुणांना पुन्हा पक्षाकडे वळवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. संजय गांधी आणि इंदिरा गांधी यांचा त्यांच्या डोक्यावर वरदहस्त होता. अल्पसंख्याक समाजातील असणे हे त्यांच्या राजकारणात कधीही खोड बनले नाही उलट त्यांनी याचा फायदा उठवून आपली राजकीय छबी मजबूत बनवली,

१९८० च्या निवडणुकीत अहमद पटेल पुन्हा जिंकले. यावेळचा विजय अधिक सोपा आणि सहज होता. आता तर इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान बनल्या होत्या. त्यांनी आवर्जून अहमद पटेलांना दिल्लीत मंत्रीपदासाठी बोलवून घेतलं.

पण बाबूभाई लंबी रेस का घोडा म्हणून ओळखले जात होते. त्यांनी मंत्रीपदाच्या ऐवजी काँग्रेस संघटन बळकट करण्यासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. अहमद पटेल आता फक्त युथ काँग्रेस पुरते उरले नव्हते तर पक्षाच्या श्रेष्ठींमध्ये त्यांच्या नावच8 चर्चा सुरू झाली होती.

संजय गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधी राजकारणात आले तेव्हा अहमद पटेल यांना पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून त्यांच्या मदतीसाठी देण्यात आलं.

फिरोज गांधी यांच घराणं मूळ गुजरातच्या भरुचचे असल्यामुळे अहमद पटेल यांच्या विषयी राजीव गांधीना विशेष आपुलकी होती. त्यांनी आपली कर्तबगारी देखील सिद्ध केली होती. म्हणूनच अहमद पटेल राजीव गांधी यांची सावली बनले.

वरवर पाहता लाजाळू, अत्यंत मितभाषी अहमद पटेल यांनी राजीव गांधींच्या सोबत काँग्रेसमध्ये सुशिक्षित तरुणांना जोडण्याचं काम केलं. त्यांनी १९८४ साली सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकली. राजीव गांधी पंतप्रधान बनल्यावरही त्यांनी पुन्हा मंत्रिपद नाकारलं.

किंगमेकर बनण्यात अहमद पटेलांना जास्त रस होता.

राजीव गांधी नेहमी म्हणायचे एकवेळ मी निवडणुकीत पडेन पण अहमद पटेल कधीही कोणतीही निवडणूक हरणार नाही. पण दुर्दैवाने याच्या विरुद्ध घडलं.

१९८९ साली अहमद पटेल आपल्या घरच्या मतदारसंघात निवडणूक हरले. बोफोर्स, शहाबानो,राममंदिर अशा अनेक गोष्टींचा त्यांच्या निवडणुकीत मोठा रोल निभावला. दिल्लीचं राजकारण खेळणाऱ्या अहमद पटेलांचा भरुचच्या तळागाळातल्या राजकारणाकडे दुर्लक्ष झाले होते.

याचाच परिणाम त्यांच्या पराभवात झाला.

तिथून अहमद पटेलांनी आपला मोर्चा पूर्णवेळ पक्षीय राजकारणासाठी दिला. राजीव गांधींच्या अकाली निधनामुळे त्यांना मोठा सेटबॅक बसला होता, नरसिंहराव यांनी पटेलांना थोडे दूरच ठेवले होते पण जेव्हा सीताराम केसरी काँग्रेस अध्यक्ष बनले तेव्हा अहमद पटेल पुन्हा फॉर्मात आले. त्यांना काँग्रेस पक्षाचा खजिनदार बनवण्यात आलं.

अस म्हणतात की त्या काँग्रेसच्या पडत्या काळातही अगदी अर्ध्या तासात पटेलांनी ३० कोटींचा पक्ष निधी उभा करून दाखवला होता.

केसरीच्या काळात पटेलांच राजकीय वजन वाढलं, पण याच पटेलांनी सीताराम केसरींना अध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली.

सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा बनवण्यात आल्या.

अहमद पटेल आजही सोनिया गांधी यांचे डोळे समजले जायचे. २००४ ते २०१४ काँग्रेसची सत्ता होती तेव्हा गांधी घराण्याच्या खालोखाल सगळ्यात ताकदवान व्यक्ती म्हणून त्यांचा उल्लेख केला जायचा. पक्षांच्या आघाडीच मॅनेजमेंट असो किंवा उद्योगपतींकडून पक्षनिधी गोळा करणे अहमद पटेल यात वाकबगार होते. अगदी विरोधी पक्षातही त्यांची मैत्री होती.

खुद्द नरेंद्र मोदी यांनी एकदा आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की अहमद पटेल आणि मी राजकारणात येण्याच्या आधी पासूनचे दोस्त आहोत.

काँग्रेसचे चाणक्य म्हणवले जाणारे अहमद पटेल कधी मीडियावर झळकले नाहीत, पण त्यांच्या भोवतीचे गूढ वलय कायम राहिलं होतं.

२०१४ पासूनच्या काँग्रेसच्या पराभवाला देखील त्यांनाच जबाबदार धरलं जातं. पण अहमद पटेलांना आपलं राज्य देखील कधी जिंकता आलं नाही. फक्त एकदाच राज्यसभा निवडणुकीवेळी अमित शाह यांनी प्रचंड मोठी फिल्डिंग लावली असतानाही पटेल यांनी डोकं लावून विजय मिळवला तेव्हा त्यांची चाणक्यनीती अमित शहा यांना भारी पडली होती.

आजही अहमद पटेल काँग्रेसच्या राजकारणात आपले महत्व राखून होते. कधीकधी अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाच्या वावड्या उठल्या मात्र ते प्रत्यक्षात झालं नाही. न बोलून गेम करणाऱ्या अहमद पटेलांनी दुखावलेले बाकीचे जेष्ठ नेते त्यांचा विरोध करत असावेत अशी शक्यता सांगितली जायची.

राजकारणात प्रचंड ग्लॅमर असलेले अहमद पटेल प्रत्यक्षात मात्र लो प्रोफाईल आयुष्य जगत होते, त्यांची मुले राजकारणापासून प्रचंड दूर होती. दर शुक्रवारी नमाज पढायला मशिदीत हजर असणारे अहमद पटेल यांना गुजराती लोक मात्र शातीर दिमाग वाला बाबू भाई म्हणूनच ओळखायचे.

गांधी परिवाराशी त्यांची निष्ठा ही मात्र अबाधित होती. इतक्या वर्षात राजीव गांधी यांच्या पासून ते राहुल गांधी यांच्या पर्यंत सगळा गांधी परिवार त्यांच्या सल्ल्यानेच चालत आला आहे याचं सिक्रेट मात्र अजूनही कोणाला कळायचं नाही.

काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना दवाखान्यात भरती करावं लागलं होतं. नुकतीच त्यांच्या निधनाची बातमी आली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.