हॉस्पिटलपासून ३२ किलोमीटरवरील मंदिरात बसून हार्ट सर्जरी करत त्यांनी इतिहास रचला !

डॉ. तेजस पटेल असं त्यांचं नाव. व्यवसायाने हार्ट सर्जन.

हार्ट सर्जन म्हणून ते देशभरात ख्यातकीर्त आहेत. भारत सरकारने यापूर्वीच ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करून झालाय. आता त्यांचं नाव पुन्हा चर्चेत आलंय. त्यांचं नाव चर्चेत येण्यासाठी कारणीभूत ठरलीये ती त्यांनी केलेली ऐतिहासिक कामगिरी.

गेल्या बुधवारी त्यांनी ऐतिहासिक कामगिरी केलीये. त्यांनी काय केलंय, तर गुजरातमधील अक्षरधाम, स्वामीनारायण मंदिरात बसून ३२ किलोमीटर अंतरावरील हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या पेशंटची हार्ट सर्जरी केलीये.

अशा प्रकारची ही जगातली पहिलीच ‘टेली-रोबोटिक’ सर्जरी ठरली आहे.

रोबोटच्या सहाय्याने उपकरणे नियंत्रित करून ही सर्जरी पार पाडण्यात आली. अशा प्रकारच्या सर्जरीसाठी अतिजलद इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता असते.

अहमदाबादेतील ‘अपेक्स हार्ट इन्स्टिट्यूट’ मुख्य ह्रदयरोग तज्ञ म्हणून काम करणाऱ्या डॉ. तेजस पटेल यांनी गेल्या बुधवारी ही किमया घडवली. माध्यमांमध्ये प्रकाशित बातम्यांनुसार ज्या महिला पेशंटवर ही सर्जरी करण्यात आली ती अपेक्स हॉस्पिटलच्या ऑपरेशन थीएटरमध्ये भरती होती. त्या महिलेला काही दिवसांपूर्वीच हार्ट अॅटकचा झटका आला होता आणि तिच्या नसा ब्लॉक झाल्या होत्या.

डॉ. पटेल हे हॉस्पिटलपासून ३२ किलोमीटर अंतरावर असलेल्या अक्षरधाम मंदिरात बसलेले होते. तिथूनच त्यांनी या पेशंटवर रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही सर्जरी केली. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांनी पेशंटच्या ब्लॉक झालेल्या नसा सुरु केल्या. या सर्जरीच्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी हे देखील उपस्थित होते. या ऐतिहासिक कामगिरीसाठी त्यांनी डॉ. तेजस पटेल यांचं अभिनंदन केलंय.

ही कामगिरी पार पाडल्यानंतर डॉ.पटेल यांनी ‘टेलीरोबोटीक कोरोनरी’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अशा प्रकारच्या सर्जरी फक्त एका शहरातून दुसऱ्या शहरातच नाही, तर दुसऱ्या राज्यात आणि दुसऱ्या देशात देखील पार पाडल्या जाऊ शकतील, असंही माध्यमांशी बोलताना सांगितलं.

डॉ. पटेल यांनी यापूर्वीही टेली रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्जरी केलेल्या आहेत, आपण अशा प्रकारे हॉस्पिटलपासून ३२ किलोमीटर अंतरावरून यशस्वी टेली-रोबोटिक सर्जरीचं, जगातलं हे पहिलंच उदाहरण ठरलं आहे.

हे ही वाच भिडू