“अखिल भारतीय किसान सभेविषयी सारंकाही”

 

अखिल भारतीय किसान सभेच्या लाल बावट्याखालील शेतकऱ्यांचा ‘आक्रोश मोर्चा’ आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईत येऊन धडकलाय. या मोर्चामध्ये ३० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा सहभाग असून मोर्चा उद्या १२ मार्च रोजी मंत्रालयाला घेराव घालणार आहे. जाणून घेऊयात मोर्चाचे नेत्वृत्व करणाऱ्या अखिल भारतीय किसान सभेविषयी…

  • अखिल भारतीय किसान सभा ही कम्युनिस्ट पक्षाची शेतकरी संघटना आहे. स्वामी सहजानंद सरस्वती यांनी १९३६ मध्ये संघटनेची स्थापना केली.
  • १९२९ मध्ये स्वामी सहजानंद सरस्वती यांनी ‘बिहार प्रांतिय किसान सभा’ स्थापन केली. जमीनदारी पद्धतीविरोधात लढणे आणि बिहारमधील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवरील ताबा मिळवून देण्यासाठी संघटीतरित्या प्रयत्न करणे हे संघटनेचं उद्दिष्ट्ये होतं. त्यानंतर हळूहळू देशभरात शेतकरी चळवळ तीव्र होत गेली.
  • १९३५ साली एन. जी. रंगा आणि इ.एम.एस. नंबूद्रीपाद यांनी देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढण्यासाठी एखाद्या देशव्यापी संघटनेच्या स्थापनेची गरज अधोरेखित केली. त्याची परिणीती ११ एप्रिल १९३६ रोजी झालेल्या अखिल भारतीय कॉंग्रेसच्या लखनऊ येथिल अधिवेशनातून ‘अखिल भारतीय किसान सभे’च्या स्थापनेत झाली.
  • स्वामी सहजानंद सरस्वती यांची अध्यक्ष म्हणून तर एन. जी. रंगा, इ.एम.एस. नंबूद्रीपाद, राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, राहुल संक्रीत्यान, आचार्य नरेंद्र देव इ.ची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
  • १९३७ साली सभेने आपला जाहीरनामा घोषित केला ज्यात जमीनदारी पद्धतीचे उच्चाटन, कर्जमाफी यांसारख्या गोष्टींचा समावेश होता. लाल झेंड्याचा बॅनर म्हणून स्वीकार करण्यात आला.
  • कॉंग्रेस आणि समाजवादी कॉंग्रेस यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या अखिल भारतीय किसान संघटनेने बिहार आणि संयुक्त प्रांतातील कॉंग्रेस सरकारविरोधी भूमिका घेतल्याने कॉंग्रेसबरोबर संघर्ष सुरु झाला आणि कॉंग्रेस संघटनेतून बाहेर पडली.
  • १९४२ साली कम्युनिस्ट पक्षाने संपूर्णपणे संघटनेवर ताबा मिळवला. कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकृत भूमिकेप्रमानेच अखिल भारतीय किसान संघटनेने देखील ‘भारत छोडो’ आंदोलनापासून स्वतःला दूर ठेवले. त्यामुळे नाराज झालेल्या एन. जी. रंगा, सहजानंद सरस्वती आणि इंदुलाल याग्निक यांसारखे महत्वाचे नेते संघटनेतून बाहेर पडले.
  • १९६४ साली कम्युनिस्ट पक्षाचे विभाजन झाल्याने अखिल भारतीय किसान सभाही २ वेगवेगळ्या गटात विभागली गेली. संघटनेच्या दोन्ही गटांचं नाव सारखंच असलं तरी एक गट ‘कम्युनिस्ट पार्टी’शी तर दुसरा गट ‘मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा’शी संबंधित आहे.
  • सद्यस्थितीत डॉ. अशोक ढवळे हे अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष असून महाराष्ट्रात किसन गुजर हे सभेचं काम बघतात. डॉ. अजित नवले हे संघटनेचे सरचिटणीस आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.