खरच एका तांत्रिकामुळं एअर इंडियाचं एक विमान थेट अरबी समुद्रात बुडालं होतं का..?

खरतर इतिहासात लय राडे आहेत. एकाला झाकून दुसरं काढावं असे प्रकार झालेत. यातलं काय सांगाव आणि काय नाही अस होतं. असाच एक किस्सा होता एअर इंडियाच्या विमानाचा झालेलं काय तर एका विमान अपघातात थेट तांत्रिकाचं नाव आलेलं. त्याच्यामुळे २१३ लोकांना घेवून एअर इंडियाचं विमान थेट अरबी समुद्रात पडल, सर्वच्या सर्व जण गेले. अगदी विमानाचे अवशेष शोधायला देखील पाच दिवस लागलेले. 

काय होता नेमका मॅटर विस्ताराने सांगतो.

१ जानेवारी १९७८ रात्रीचे सव्वा आठ वाजलेले. मुंबईच्या विमानतळावरून एअर इंडियाचं बोईंग ७४७ हे विमान दुबईच्या दिशेने झेपावलं होतं. या विमानाचं नाव एपरंर अशोका होतं. विमानाने आकाशात झेप घेतल्यानंतर अगदी तिसऱ्या मिनटाला मुंबईच्या विमानतळावरील डिपार्चर कंट्रोलने पायलट सोबत संपर्क साधून ख्यालीखुषाशी विचारली होती.

अगदी व्यवस्थित चाललं होतं तोच संपूर्ण विमान समुद्राच्या दिशेने झेपावलं आणि गायब झालं… 

विमान कुठे आग लागल्याची माहिती होती ना कुठे विमानाचे इंजन बंद पडल्याची माहिती होती. काहीच न कळता थेट अरबी समुद्रात जाणं हे विचित्र होतं. विमानाची सिटींग कपेसिटी ४३० प्रवाशांची होती पण झालेलं अस की विमान तब्बल तेरा तास उशीरा उडणार होतं. त्यामुळे शेवटच्या क्षणाला खूप जणांनी तिकीट कॅन्सल केलं होतं. राहिलेल्या १९० प्रवाशी, सोबत २० फ्लाईट अटेन्डन्स आणि दोन पायलटसह एका फ्लाईट इंजिनियरला घेवून हे विमान आकाशात झेपावलं होतं.

विमान संपर्क क्षेत्रातून बाहेर गेल्याची बातमी आली आणि तारांबळ उडाली. नेमकं काय झालंय याची कोणालाही कल्पना करता येत नव्हती. विमानाचा अपघात झालाय का म्हणून चौकशी सुरू झाली तोच आदल्या दिवशी विमानाच्या इंजिनला पक्षी धडकल्याने इंजिन बंद पडल्याची माहिती मिळाली पण तात्काळ एअर इंडियाच्या मॅनेंजिग डायरेक्टर असणाऱ्या अप्पूस्वामींनी सांगितलं की इंजिन दूरूस्त करण्यात आलं होतं. तसही विमानाला एकूण चार इंजिन होते, व दोन इंजिनच्या जोरावर हे विमान सुखरूप परत आलं असतं. 

त्यामुळे ही शक्यता फेटाळली गेली. तिकडे विमान नेमकं कुठे बुडालं याचा शोध भारतीय नौसेना आणि वायुदल संयुक्त पातळ्यांवर घेत होते. 

पाच दिवस होतं आले तेव्हा इंडियन नेव्हीच्या कमांडरना समुद्रातून विमान पडताना दिसलं होतं तिथेच विमानाचा कचरा सापडला. माणसच काय तर साधे लोखंडाचे तुकडे सुद्धा निट दिसत नव्हते. चार दिवस बचाव दलाने एक एक करुन तपास केला तेव्हा काही मासेमारी करणाऱ्यांना विमानाचा FDR मिळाला. 

सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे इंडियन नेव्हीच्या कमांडरांनी हे विमान समुद्राच्या दिशेने झेपावताना पाहिले होते. त्यांच्या मते विमानाला कुठेही आग वगैरे लागली नव्हती. अगदी विमानाच्या लाईट देखील सुरू होत्या. तशाच अवस्थेत विमान थेट ४५ डिग्रीच्या कोनातून समुद्राकडे झेपावले व गायब झाले. 

पण विमानाला नेमकं काय झालं हे कळण्याचा मार्ग नव्हता. 

IB अर्थात इंटेलिजन्स ब्युरो आणि नागरिक उड्डाण मंत्रालय संयुक्तपणे याच्या तपासात गुंतले. तिकडे मुंबई हायकोर्टाने देखील स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले. 

अन् चौकशीची सर्व सुत्र एका तांत्रिकाकडे सरकली

झालेलं अस की एअर इंडियाच्या लंडनच्या ऑफिसमध्ये अपघाताच्या ३ दिवासंपूर्वीचं म्हणजे २८ डिसेंबरला एक धमकीचा फोन आला होता. आमच्या बाबाला सोडलं नाही तर तुमचं विमान उडवून टाकू. या बाबाचं नाव होतं प्रभात रंजन सरकार. प्रभात रंजन सरकार हा प्रोग्रेसिव युटिलायझेशन थेअरीसाठी प्रसिद्ध होता. थोडक्यात आनंदमार्ग वगैरे टाईप. या माणसाला खुद्द राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांनी गौरवलं होतं. पण मॅटर असा झालेला की एका मर्डर केसमध्ये बाबा सध्या आत होते. तेव्हा जगभर विखुरलेल्या त्यांच्या भक्तांनी किंवा समर्थकांनी त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न चालवलेले. याच माणसाचं नाव चर्चेत आल्याने स्वतंत्रपणे चौकशी सुरू करण्यात आली. 

दूसरीकडे १२६ लोकांनी अचानक तिकीट कॅन्सल केलं होतं हे गुढ नेमकं काय होतं ते देखील शोधणं गरजेचं होतं.. 

मरणाऱ्यांच्या यादीतील एकाच्या नातेवाईकांनी आरोप केला की विमानात बॉम्ब असल्याची माहिती प्रवाशांना मिळाली होती. त्यामुळेच लोकांनी तिकीट कॅन्सल केले होते. या माणसाचं नाव होतं ललित कुमार भाटिया. साहजिक चौकशीचा रोख त्या दिशेने देखील सुरू करण्यात आला. १२६ जणांपैकी प्रत्येकाची कसून चौकशी करण्यात आली. पण अशी काही माहिती आम्हाला मिळाली नव्हती फक्त विमानाला उशीर झाल्याने व पर्यायी विमानांची सोय असल्याने आम्ही तिकीट कॅन्सल केल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

तांत्रिकांच्या माहितीत देखील तथ्य नसल्याचं चौकशीत समोर येत गेलं. ठोस पुरावे असे काहीच नव्हते पण एकाला फोन आला इतकच. 

तपासणीसाठी वाशिंग्टला पाठवलेल्या FDR मधून विमानाच्या एटिट्यूडमध्ये बिघाड झाल्याची शक्यता वर्तवन्यात आली. एटिट्यूड डायरेक्टर इंडिकेटर म्हणजे ADI. विमान डाव्या बाजूला झुकलेय की उजव्या की विमान सरळ आहे हे सांगणारे ही मशीन. यामध्ये विमान सरळ असताना देखील विमान डाव्या बाजूला झुकल्याचा सिग्नल देण्यात येत होता. त्यामुळे विमान सरळ करण्याच्या नादात विमान डावीकडे झुकवण्यात आले होते. जी गत डाव्या उजव्याची तिच उभ्या आणि आडव्याची. त्यामुळेच विमान खाली खाली सरकत थेट विमानात कोसळले अशी शक्यता मांडण्यात आली. 

या सर्व शक्यता, अंदाज, ठोकताळे होते. काळ सरकला आणि विमानाची ही गोष्ट देखील विमानासारखीच गायब होत गेली. आत्ता राहिला तो असाच इतिहास आणि किस्सा.. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.