टाटांना विचारलं देखील नाही आणि नेहरूंनी एअर इंडियाचं राष्ट्रीयकरण केलं होतं

एअर इंडिया वर पुन्हा एकदा टाटा ग्रुपचा मालकी हक्क निर्माण झाला आहे. ब्लूमबर्ग च्या रिपोर्टनुसार सरकारने लावलेली एअर इंडियाची बोली टाटा सन्सने जिंकली आहे. तब्बल ६७ वर्षानंतर टाटांनी स्वतः स्थापन केलेली एअर इंडिया त्यांना परत मिळाली आहे.

पण ज्यावेळी एअर इंडियाला सरकारी कंपनी म्हणून घोषित केलं त्यावेळी जेआरडी टाटांना खूप दुःख झालं होत आणि ते नेहरूंवर नाराज होते. तेव्हा नेहरुंनी टाटांना पत्र पाठवून त्यांची समजूत घालण्याचा जो प्रयत्न केला होता त्याचाच हा किस्सा.

१९३२ साली जेआर डी टाटांनी टाटा सन्स नावाने कंपनी स्थापन केली. १९४६ मध्ये जेव्हा टाटा एअरलाईन्स पब्लिक होल्डिंग मध्ये आली तेव्हा ती जास्तीचा नफा कमावू लागली. दुसऱ्या महायुद्धानंतर टाटा एअरलाईन्सचं नाव बदलण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंनी राष्ट्रीयकरणाचा जो घाट घातला त्यातून टाटांची एअरलाईन्स पण सुटली नाही. भारत सरकारने एअर इंडियाचे ४९ टक्के शेअर्स विकत घेवून ती शासनाचे नियंत्रण असणारी कंपनी बनवण्यात आली.

पुढं १९५३ मध्ये भारत सरकारने एयर कॉरपोरेशन एक्ट पास केला. यामुळे झालं काय तर एयर इंडिया सोबत सात अशा प्रायव्हेट एयरलाइंस पण सरकारी कंपन्या बनल्या.

पण एयर इंडियाच्या राष्ट्रीयकरणामुळ जेआरडी टाटा नेहरूंवर नाराज झाले. 

त्याकाळात जेव्हा एयर इंडिया सरकारी कंपनी बनली तेव्हा जेआरडी टाटा आणि नेहरूंच्या वादाच्या बातम्या वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरून यायच्या. खरं तर भारत सरकारने जेव्हा उड्डाण क्षेत्रातल्या हवाई कंपन्यांचं राष्ट्रीयकरण करण्याचा घाट घातला तेव्हाच जेआरडी नेहरूंना त्यांच्या तोंडावर म्हंटले होते,

राष्ट्रीयकरणाच्या मुद्द्या आडून तुम्हाला खाजगी कंपन्या दाबायचा आहेत. त्यातल्या त्यात आणि तुमचा सर्वात जास्त रोष टाटाच्या एअरलाईन्सवर असल्यासारखा दिसतोय. कोणत्याही चर्चेशिवाय एखाद्या खाजगी कंपनीचे सार्वजनिकीकरण करणे निराशाजनक आहे. 

त्यावेळी असं म्हंटल जायचं की टाटांचं म्हणणं होत की,

नव्या सरकारला एअरलाईन्स चालवण्याचा काहीच अनुभव गाठीशी नव्हता. राष्ट्रीयकरण झाल्यावर या कंपन्या सरकारी बाबूशाहीला बळी पडून बंद पडतील. या उड्डाण सेवेत फक्त नोकरशाही आणि सुस्तपणाचं दिसून येईल. यामुळे कर्मचाऱ्यांचं मनोबलच्या मनोबल ढासळेल, त्याशिवाय ग्राहकांना ज्या सेवासुविधा दिल्या जायच्या त्यासुद्धा काही दिवसानंतर बंद पडतील.

जेआरडी टाटांच्या विरोधानंतर सुद्धा कंपनीचं अधिग्रहण करण्यात आलं. पण नेहरूंनी टाटांचा राग जावा यासाठी १९५३ च्या संपुर्ण राष्ट्रीयकरणानंतर जेआरडी टाटांना राष्ट्रीय वाहकचे अध्यक्ष करण्यात आलं. खरं तर टाटा या पदासाठी इच्छुक नव्हतेच. पण एवढ्या मेहनतीने उभी केलेली कंपनी बंद पडायला नको म्हणून त्यांनी ते पद स्वीकारलं.

त्यांनी सलग २५ वर्ष सफलतापूर्वक एअर इंडियाच्या प्रगतीकडे लक्ष केंद्रित केलं. आणि टाटांच्या याच मेहनतीमुळे की काय जेव्हा सिंगापूरची एअरलाईन्स सुरु झाली तेव्हा त्यांनी एअर इंडियाला आपला पार्टनर म्हणून निश्चित केलं.

टाटा जस म्हंटले होते की, कंपनी सरकारी बाबूशाहीला बळी पडेल आणि झालं हि अगदी तसंच. एअर इंडिया अतिरिक्त कर्जाच्या बोजामुळे इतकी वाकली की सरकारला तिचा लिलाव करावा लागला. आणि विशेष म्हणजे कंपनी आता तिच्या तिच्या मालकाकडे परत आली आहे.

आता इथून पुढं तिची नवी इनींग सुरु झालीय असं म्हणायला हरकत नाही.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.