जवळपास २४०० कोटी रुपये किंमतीला पडणाऱ्या एअर इंडिया इमारतीचा इतिहास असा आहे…

एअर इंडिया बिल्डिंग. मुंबईतल्या नरिमन पॉईंट इथं असलेली ही इमारत शहराच्या प्रतिष्ठित उंच इमारतींपैकी एक.  गेल्या वर्षीच या इमारतीने आपली ५० वर्षे पूर्ण केलीत. दरम्यान सध्या ही आयकॉनिक बिल्डिंग चर्चेत आलीये.

महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा ही २३ मजली एअर इंडियाची इमारत खरेदी करण्यासाठी चर्चा सुरू केलीये.  खरं तर, महाराष्ट्राच्या महाविकासआघाडी सरकारला ही इमारत १४०० कोटी रुपयांना विकत घ्यायचीये. पण एअर इंडियाने या इमारतीचे अंतर्गत मूल्यांकन २००० कोटी रुपये असल्याचे म्हंटलंय. याचप्रकारणी  चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्य सचिव एस.जे. कुंते यांनी मंगळवारी एअर इंडियाचे सीएमडी राजीव बंसल यांची भेट घेतली.

राज्य सरकारी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार ही इमारत सरकारी जमिनीवर उभी असून ती राज्य सरकारच्या मालकीची आहे. यासोबतच एअर इंडियाला विविध मानधनांतर्गत ४०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे, सगळी डील २४०० कोटी रुपयांना पडेल.

दरम्यान, आर्थिक संकटात सापडल्याने कंपनीने डिसेंबर २०१८ मध्येच इमारत आणि त्याची जमीन विकण्याचा निर्णय घेतला होता. आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने देखील इमारत खरेदी करण्यात इन्स्ट्रेस्ट दाखवला होता, जेणेकरून सगळ्या मुंबईत पसरलेली विविध राज्य सरकारी कार्यालये एकाच ठिकाणी येतील.

त्याकाळच्या सगळ्यात उंच इमारतींपैकी एक 

तर, न्यूयॉर्क सिटी आर्किटेक्चरल फर्म जॉन्सन/बर्जीचे जॉन बर्गी यांनी इमारतीची रचना केली होती. १९७४ मध्ये एअर इंडियाची इमारत पूर्ण झाली. ही नरिमन पॉईंट भागातील सर्वोत्तम रिअल इस्टेट ठिकाणांपैकी एक आहे. जी मुख्यतः एअर इंडियाच्या मालकीची. यात सुरुवातीला ३० कंपन्या भाड्यानं होत्या, आता त्या फक्त २ आहेत.

मरीन ड्राइव्हच्या किनाऱ्यावर असलेली ही इमारत भारतातील पहिली एस्केलेटर इमारत होती, जी स्ट्रीट लेव्हलपाससून ग्राहकांना एअरलाइनच्या मेन बुकिंग ऑफिसपर्यंत घेऊन जायची.

माहितीनुसार, १९७० मध्ये सहा लिफ्ट असलेली ही कदाचित एकमेव इमारत होती. सोबतच पाईप म्युझिकने सुसज्ज होती. त्याकाळी दोन मजल्याची अंडरग्राउंड पार्किंग असलेली ही इमारत नक्कीच खास होती.

१,५०२ खिडक्या असणाऱ्या या इमारतीतून अथांग समुद्र दिसतो. त्यावेळीही सुरक्षा लक्षात ठेवून अग्निशामक क्षमतांनी सुसज्ज अशी  ही इमारत बनवण्यात आली होती.

लँग जॉन टी. यांनी आपल्या  कॉन्साइज हिस्ट्री ऑफ मॉडर्न आर्किटेक्चर इन इंडिया (२००२) या पुस्तकात, एअर इंडियाच्या इमारतीला ‘पोस्ट-मॉडर्न’ म्हंटले होते.

इमारतीच्या छतावर लावण्यात आलेला एअर इंडियाचा लोगो, मुंबईच्या आकाशाचा आयकॉन राहिला, ज्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये पार्श्वभूमी निर्माण केली, जे भूतकाळ आणि वर्तमान मुंबईचे प्रतिनिधित्व करते.

ही इमारत १९९३ च्या बॉम्बस्फोटाच्या टार्गेट पैकी एक होती. १२ मार्च १९९३ ला दुपारी इमारतीच्या तळघराच्या गॅरेजमध्ये कारबॉम्ब स्फोट झाला. या हल्ल्यात २० जण ठार झाले आणि गॅरेजच्या वर असलेल्या बँक ऑफ ओमानच ऑफिस नष्ट झाले. या हल्ल्यात जवळजवळ १०० जण जखमी झाले होते. 

त्यांनतर जून २०११ मध्ये या इमारतीचा तळमजला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या ताब्यात होता, तर ७ मजले एअर इंडियाचे होते आणि बाकीचे १५ मजले रिकामे होते. यानंतर आर्थिक चुणचुण भासू लागल्याने  एअर इंडियाने आपले  मुख्यालय दिल्लीला हलवण्याची योजना सुरू केली, जेथे भाडे स्वस्त आहे.

२०१३ पर्यंत ही एअर इंडिया बिल्डिंग भारतीय राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाचे कॉर्पोरेट मुख्यालय होती. फेब्रुवारी २०१३ मध्ये, एअर इंडियाने ही इमारत रिकामी केली आणि त्याचे कॉर्पोरेट कार्यालय नवी दिल्लीला हलवले होते. 

आता फडणवीस नंतर ठाकरे सरकारही या इमारतीच्या मागे लागलंय. यामागचं कारण म्हणजे या इमारतीचे लोकेशन आणि ती मंत्रालयाच्या जवळ असल्यामुळे राज्य सरकारला ती खरेदी करायचीये. पण एका अधिकाऱ्यानं  इमारतीची स्थिती गुंतवणुकीसाठी योग्य नसल्याचं म्हटलंय. कारण, १९९३ मध्ये या इमारतीत स्फोट झाला आणि इमारतीच्या पायावर परिणाम झाला.”

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.