एअर इंडियाचा सर्वात मोठा स्फोट पाकिस्तानी नव्हे तर कॅनडाच्या अतिरेक्यांनी घडवला होता.

२३ जून १९८५. रात्रीचे ८.४५ वाजले होते. एअर इंडियाच्या फ्लाईट नंबर १८२ “एम्परर कनिष्क” या विमानाने कॅनडाच्या मॉंन्ट्रेअल येथून दिल्लीला येण्यासाठी निघाले. नेहमीपेक्षा साधारण दीड तास विमान लेट झाले होते.

कनिष्क हे भारताच्या सर्वात मोठ्या विमानापैकी एक. बोईंग ७४७ या प्रकारच्या कनिष्क विमानाला एअर इंडियाच्या मुकुटमणी पैकी एक म्हणून ओळखल जात होतं. या विमानाने उड्डाण भरली की सगळ एयरपोर्ट स्तब्ध व्हायचं.

अख्ख्या भारताचा अभिमान असलेलं हे विमान.

त्या दिवशी विमानात ३०७ प्रवासी होते. तर २२ कर्मचारी होते. यातील बहुतांश लोक कॅनडाचे नागरिक होते. विमान लंडन इथे एक स्टॉप घेणार असल्यामुळे २७ ब्रिटीश नागरिक देखील होते. विमानाचे मुख्य पायलट होते कॅप्टन हंससिंग नरेंद्र, तर को पायलट सतविंदरसिंग बहादूर आणि दारा दुमासिया फ़्लाइट इंजीनियर.

विमानात कॅनडामध्ये राहणाऱ्या पंजाबी शीख लोकांचा समावेश होता. आपल्या गावी सुट्टीला पाहुण्यांची भेट घेण्यासाठी अनेक जण भारताला निघाले होते.

सकाळी ७.१५  वाजताची वेळ. प्रवासी अजून साखर झोपेत होते. विमान शांतपणे अटलांटिक महासागरावर ३१ हजार फुटांवरून उडत होते. आणखी एका तासाभरात विमान लंडनला लँड करणार होते.

अचानक तिथून जवळ असलेल्या आयरिश एयर ट्राफिक कंट्रोलच्या रडारवरून हे विमान गायब झाले. तिथल्या कर्मचाऱ्याने सिस्टीम चेक करून बघितले, विमानाला सिग्नल पाठवल. काही रिप्लाय येत नाही हे कळल्यावर मात्र गडबड उडाली.

आयर्लंडची विमाने अटलांटिक समुद्रात धाडली गेली.

त्यांना दिसल की कनिष्क विमानाला मोठी दुर्घटना झाली असून ते पाण्यात कोसळले आहे. जोरदार खळबळ उडाली. मदत कार्यासाठी जहाजे रवाना झाली पण दुर्दैवाने एकही प्रवासी जिवंत सापडला नाही.

विमानात झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटामुळे सर्वच्या सर्व ३२९ जणांना घेऊन कनिष्कने जल समाधी घेतली होती.

अगदी याच वेळी जपानच्या नरिता एयरपोर्टवर एका विमानात स्फोट झाला होता. या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध असल्याची शक्यता बोलून दाखवली गेली. भारत- कॅनडा आणि ब्रिटन या तिन्ही देशातील तपास यंत्रणा कामाला लागल्या.

ही आजवरची सर्वात मोठी घातपाती कारवाई होती.

झाल अस होत की १९८४ साली भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टार अंतर्गत अमृतसरच्या सुवर्णमंदिरावर लष्करी कारवाई केली. यामुळे जगभरातले शीख दुखावले. यातील अनेक तरुण दहशतवादी संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र आले. भारतात इंदिरा गांधींचा खून करण्यात आला. याशिवाय अनेक हल्ले केले. प्रचंड मनुष्य व वित्त हानी झाली.

अनेक वर्ष पंजाब धुमसत होता.  कॅनडामध्ये देखील शिखांचे प्रमाण भरपूर होते. तिथे त्यांनी भारतातून खलिस्तान फुटून निघावा यासाठी बब्बर खालसा इंटरनशनल नावाची अतिरेकी संघटना स्थापन केली. या संघटनेला तिथल्या मोठमोठ्या पंजाबी उद्योगपतींचा पाठींबा होता.

कॅनडामधून भारतातल्या अतिरेक्यांना पैसे व शस्त्रास्त्रे यांची मदत करणे असे उद्योग चालायचे.

ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा बदला घेण्यासाठी त्यांनी एयर इंडियावर हा हल्ला घडवून आणला. व्हँकूव्हर येथे तयार केलेला टाईमबॉम्ब मिस्टर सिंग नावाने रिझर्वेशन केलेल्या बनावट प्रवाशाच्या बगेत बेमालूमपणे लपवण्यात आला. अटलांटिक समुद्रावर याचा स्फोट झाला.

जगातला हा सर्वात मोठा विमान बॉम्बस्फोट होता. सर्वात जास्त मनुष्यहानी कॅनडाच्या नागरिकांची झाली होती. हे सगळ इतक्या जबरदस्त प्लॅनिंगने केल होत की जगातल्या कुठल्याच तपास यंत्रणेला अनेक वर्ष याचे धागेदोरे मिळू शकले नाहीत.

अखेर २००० साली व्हँकूव्हर येथील अब्जाधीश उद्योगपती रिपूदमनसिंग मलिक व कोलंबियाचे अजबसिंग बागरी यांना संशयित म्हणून अटक करण्यात आली.

पण त्यांच्या जवळ इंग्लंडच नागरिकत्व असल्यामुळे फाशी ऐवजी १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. या सगळ्या घटनेचा सूत्रधार म्हणून इंद्रजितसिंग रेयार यांचे नाव पुढे आले. त्याला देखील ५ वर्षांची शिक्षा झाली.

या घातपाताची चौकशी जवळपास २० वर्षे चालली. कॅनडाच्या इतिहासातला हा सर्वात महागडा तपास ठरला. तब्बल १३ कोटी कॅनडीयन डॉलर्स खर्च झाले. त्याहून ही विमान प्रवासात सुरक्षा यंत्रणांनी काळजी घ्यावी लागणार याचा सगळ्यात मोठा धडा भारतासह जगाला शिकायला मिळाला.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.