नवे एअर चीफ मार्शल मराठवाड्याचे आहेतच शिवाय त्यांना राफेल डीलचा शिल्पकार म्हटलं जातं..

 

मराठवाडा म्हणलं कि, मनात मागासलेपणाची भावना येते. कारण विकास असो, शिक्षण असो कोणत्याही दृष्टीकोनातून मराठवाडा नेहेमीच दुर्लक्षित राहिला आहे. पण अधेमध्ये अशा काही सकारात्मक बातम्या कानावर पडतात आणि मराठवाड्याला अभिमान वाटावा अशी भावना मनात येते.

आज सर्वात महत्वाची बातमी आली आहे, ती अशीय कि, आपल्या देशाच्या भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून एअर मार्शल व्हीआर चौधरी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

खासकरून मराठवाड्याची बातमी यासाठी म्हणावं लागेल कि, व्हीआर चौधरी हे मुळचे मराठवाड्याचे आहे.

व्हीआर चौधरी यांचे कुटुंब मुळचे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील आहे. चौधरी यांचे वडील हैदराबाद येथे उद्योजक असून, विवेक चौधरी यांचा मुलगाही हवाई दलात आहे.

व्हीआर चौधरी भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख असणार आहेत. सद्या ते हवाई दलाचे उपप्रमुख आहेत. सध्याचे हवाईदल प्रमुख, एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्याच्या जागी आता चौधरी यांची नियुक्ती केली जाणार आहे.

राफेल डील मध्ये त्याचा मुख्य रोल होता.

हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कार्यरत असतांना चौधरी यांनी राफेल खरेदीच्या व्यवहारात त्यांची महत्वाची भूमिका होती. फ्रान्समधील लढाऊ विमान प्रकल्पाचा पाठपुरावा करणारे द्विपक्षीय उच्चस्तरीय गटाचे चौधरी हे प्रमुख होते.

व्ही.आर चौधरी यांची कारकीर्द,

चौधरी यांची एकूणच कारकिर्द पाहायला गेलं तर व्ही.आर. यांची गणना अत्यंत हुशार अधिकार्‍यांमध्ये केली जाते. चौधरी यांना २९ डिसेंबर १९८२ रोजी लढाऊ वैमानिक म्हणून भारतीय हवाई दलात दाखल करण्यात आले. तसेच ते एक फ्लाइट इंस्‍ट्रक्‍टर देखील आहेत.

त्यांना मिग -२१, मिग -२३, एमएफ, मिग -२९ आणि सुखोई -३० एमकेआय यासह विविध लढाऊ विमानांवर ३८०० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे.

चौधरी यांना त्यांच्या एकूण कारकिर्दीत त्यांच्या कामाची दखल घेत  त्यांना २००४ मध्ये वायू सेना मेडल, तर  २०१५ मध्ये अति विशिष्ट सेवा पदक, तसेच २०२१ मध्ये परम विशिष्ट सेवा पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहेत. एअर मार्शल हरजितसिंग अरोरा यांच्यानंतर १ जुलै २०२१ रोजी ते हवाई दलाचे ४५ वे उपप्रमुख झाले.

३० सप्टेंबर २०२१ रोजी एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांच्या सेवानिवृत्तीनंतर ते हवाई दलाचे २७ वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. त्यांनी यापूर्वी वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (एओसी-इन-सी) म्हणूनही काम केले आहे.

चौधरी हे राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे (एनडीए) विद्यार्थी आहेत. ते संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयातून पदवीधर देखील आहेत.

विवेक राम चौधरी यांनी विविध प्रकारची लढाऊ विमाने हाताळण्यात प्राविण्य मिळवले आहे. ते हवाई दलाच्या काही महत्त्वाच्या मोहिमांचा भाग राहिले आहेत. 

ऑपरेशन मेघदूतमध्ये सहभागी होते.

३७ वर्षांपूर्वी मेघदूत ऑपरेशन झाले होते त्यात हवाई दलाने यात महत्त्वाची भूमिका बजावली. यात त्यांचा मुख्य सहभाग होता. ऑपरेशन मेघदूत भारतीय सशस्त्र दलाचे यशस्वी ऑपरेशन होते. आणि याच ऑपरेशन द्वारे भारतीय लष्कराने काश्मीरमधील सियाचीन ग्लेशियरवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले होते. आणि परिणामी पाकिस्तानी सैन्याला माघार घ्यायला लागली होती. 

ऑपरेशन सफेद सागरमध्ये देखील त्यांची महत्वाची भूमिका होती.

ऑपरेशन सफेद सागर हे देखील सैन्यासह हवाई दलाचे संयुक्त ऑपरेशन होते.

१९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान त्याची जबाबदारी लष्कराकडे सोपवण्यात आली होती. ते एक कोड नेम होते. त्याचा उद्देश कारगिल सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरील भारतीय चौकी पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त करायचा उद्देश होता. पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना फसवणूक करून पकडले होते. भारत-पाकिस्तान युद्धानंतर जम्मू-काश्मीर क्षेत्रातील हवाई शक्तीचा हा पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर वापर होता. यातही विवेक राम चौधरी यांची मोठी भूमिका होती.

त्यांनी मिग -२९ स्क्वाड्रनचे कमांडिंग, फॉरवर्ड बेस आणि नंतर एअर फोर्स स्टेशन पुणेच्या कमांडसह विविध क्षेत्रीय पदांवर काम केले आहे. त्यांनी डीएससीसी वेलिंग्टन तसेच लुसाका, झांबिया येथे डीएससीएससी प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.