‘ऐश्वर्या राय’ होणार लालू प्रसाद यादवांची सून …!!!

बातमीचं हेडलाईन वाचून तुम्हाला धक्का बसण्याची शक्यता असली तरी ही बातमी अगदी खरी आहे, शत-प्रतिशत. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यांचा मोठा मुलगा ‘तेज प्रताप यादव’ यांचा साखरपुडा आज पार पडलाय. पाटण्यातील ‘मौर्या’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला असून, पुढच्या महिन्यातील १२ तारखेला ते विवाहबद्ध होणार आहेत. तेजप्रताप यांच्या आई म्हणजेच बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी गेल्या बऱ्याच दिवसांपासून एका संस्कारी सुनेच्या शोधात होत्या. त्यांचा शोध ‘ऐश्वर्या’वर येऊन थांबला आणि दोन्ही कुटुंबांनी लग्नाचा बार उडवून देण्याचा निर्णय घेतला. अर्थात या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तेजप्रताप आणि ऐश्वर्या या दोघांचीही ‘राय’ लक्षात घेतली गेली.

तेजप्रताप यांच्याविषयी तर बहुतेक सर्वांनाच माहिती आहे. ते लालू प्रसाद यांचे मोठे चिरंजीव असून महुआ येथून बिहार विधानसभेचे सदस्य आहेत. २०१५ च्या विधानसभा निकालानंतर स्थापन करण्यात आलेल्या नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री राहिलेले आहेत. ऐश्वर्या सुद्धा राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घरातूनच येतात. बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांची नात किंवा बिहारचे माजी मंत्री चंद्रिका राय यांची कन्या अशी त्यांची ओळख सांगता येईल. ऐश्वर्या यांनी आपले पदवी पर्यंतचे शिक्षण दिल्लीतील मिरांडा हाउस कॉलेजमधून पूर्ण केले असून अमेठी युनिव्हर्सिटीमधून त्या एम.बी.ए. झाल्या आहेत.

तेजप्रताप याचं लग्न होत असल्याने आता बिहारचे उप-मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सुशील मोदी यांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडला असणार. काही दिवसांपूर्वी माध्यमांनी तेजप्रताप यांना त्यांच्या लग्नाविषयी छेडलं असताना त्या प्रश्नावर उत्तर देताना तेजप्रताप यांनी आपल्यासाठी मुलगी शोधण्याची जबाबदारी सुशील मोदी यांच्यावर टाकली होती. सुशील मोदींनी मुलगी शोधून आणावी, ती जर आपल्या घरच्यांच्या पसंतीस उतरली तर आपण तिच्याशी लग्न करू असं तेजप्रताप यांनी माध्यमांना सांगितलं होतं. आता ऐश्वर्याला शोधण्यात सुशील मोदी यांचा काही हात आहे का, याविषयी काही एक ठोस माहिती मात्र आम्हाला मिळू शकलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.