म्हणून ऐश्वर्या रायने ट्रॉय मध्ये काम करायची संधी सोडली होती…
आपल्याकडे जसं महाभारत तसं पाश्चात्य जगासाठी होमरने लिहिलेल इलियड. आपल्या इथे जसा कुरुक्षेत्रावर झालेलं कौरव पांडवांचं युद्ध अजरामर झालं तस इलियड मधलं ट्रोजन युद्ध फेमस झालंय.
बेसिक स्टोरी काय ग्रीस मधला एक म्हातारा दारुडा राजा असतो, त्याची अति तरुण बायको हेलन हि जगातली सर्वात सुंदर स्त्री म्हणून फेमस असते. पण हि हेलन त्यांच्याकडे पाहुणा म्हणून आलेल्या ट्रॉयच्या तरुण राजपुत्राच्या प्रेमात पडते आणि नवऱ्याला सोडून त्याच्यासोबत पळून जाते.
इथून सुरु होतो बदल्याचा नवा खेळ. स्पार्टा आणि ट्रॉय या दोन देशातील महायुद्ध. असं म्हणतात कि ट्रॉय या अजिंक्य शहराला हरवण्यासाठी सर्व ग्रीक योद्धे या युद्धात सहभागी झाले, घनघोर लढाई झाली. स्पार्टा वाल्यांनी आयडिया करून युद्ध आणि आपली राणी पुन्हा जिंकली. पण ज्याच्यासाठी हे घडलं तो राजाच मेलेला असतो.
या युद्धात कित्येक घरे उध्वस्त झाली, साम्राज्ये खालसा झाली. सगळं घडलं ते महाराणी हेलनमुळे.
या महाकाव्यावर हॉलिवूडमध्ये सिनेमा बनणार म्हटल्यावर सुरवातीपासून हवा झाली होती. त्यात ब्रॅड पिट हिरो असणार आहे हे कळल्यावर तर सिनेमाची उत्सुकता प्रचंड वाढली. हाय बजेट हाय व्होल्टेज सिनेमा बनणार होता. ब्रॅड पिट सोबत एरीक बाना (आपला हल्क ), ओरलँडो ब्लूम (लॉर्ड ऑफ द रिंग्ज, पायरेट्स ऑफ कॅरिबियन वाला गडी), शॉन बिन(आपल्या गेम ऑफ थ्रोन्स मधला नेड स्टार्क)
असली गच्च टीम असल्यावर पिक्चर तर भारी बनणारच. पण या सगळ्या टीम मध्ये आणखी एक नाव दिसणार होतं, ते नाव म्हणजे विश्वसुंदरी ऐश्वर्या राय.
तसंही मिस वर्ल्ड झाल्यापासून ऐश्वर्या रायच्या बद्दल संपूर्ण जगभरात क्रेझ होती. इंडियन ब्युटी वगैरे म्हणून तीचं कौतुक केलं जात होतं. त्यात तेव्हा तिच्या करियरचा हा सुवर्णकाळ सुरु होता. देवदास वगैरे सिनेमे सुपरहिट झाले होते. ब्राईड अँड प्रेज्युडीस वगैरे इंग्रजी सिनेमामध्ये सुद्धा ती काम करत होती.
अशातच ऐश्वर्याला ट्रॉयची ऑफर आली. पण गंमत म्हणजे ही ऑफर जगातील सर्वात सुंदर स्त्री असलेल्या हेलनच्या रोल साठी नव्हती. तर हि ऑफर होती ब्राइसीइस या रोल साठी. ब्राइसीइस हि सिनेमाची मुख्य हिरोईन जरी नसली तरी हा महत्वाचा रोल होता. विशेष म्हणजे थेट ब्रॅड पिटची लव्ह इंटरेस्ट म्हणून काम करायचं होतं.
ऐश्वर्याला ट्रॉयच्या निर्मात्यांकडून विचारणा करण्यात आली. ही फक्त तिच्यासाठीच नाही तर संपूर्ण भारतीय फिल्म इंडस्ट्रीसाठी एक ब्रेकिंग पॉईंट ठरणार होता. कारण यापूर्वी कधी कोणत्या भारतीय कलाकाराने एवढ्या मोठ्या सिनेमामध्ये असा महत्वाचा रोल कधी केला नव्हता. ऐश्वर्याच्या रूपात पहिल्यांदाच अशी संधी चालून आली होती.
पण ऐश्वर्याने चक्क ट्रॉयला नकार कळवला.
कित्येकांना आश्चर्याचा धक्का बसला. हि लाइफटाइम ठरेल अशी संधी ऐश्वर्या का वाया घालवतेय हे न उलगडणारं कोडं होतं. अनेकांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ऐश्वर्या ठाम होती.
ऐश्वर्या आपल्या एका मुलाखती मध्ये सांगते की,
असं नव्हतं कि मी ट्रॉय बद्दल एक्सआयटेड नव्हते. पण हॉलिवूड मध्ये काम करणे हे बॉलीवुड पेक्षा थोडे वेगळे असते. मी ६ ते ९ महिने बॉलिवूडच्या सिनेमाला सोडून जाऊ शकत नव्हते. आणि ट्रॉय ही मोठी फिल्म असल्यामुळे तब्बल १ वर्ष वेळ द्यावा लागणार होता. हे सोडून तिथे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट करावे लागणार होते. त्यासाठी देखील मी तयार नव्हते.
असं म्हणतात की या सिनेमासाठी ऐश्वर्याला ब्रॅड पिट सोबत काही इंटिमेट सिन करावे लागणार होते. त्या सिन साठी ऐश्वर्या तयार नव्हती. फक्त या एकाच कारणामुळे तिने ट्रॉय नाकारला.
२००४ साली ट्रॉय हा सिनेमा रिलीज झाला. त्याने संपूर्ण अमेरिकेत धुमाकूळ घातलाच शिवाय जगभरात विशेषतः भारतीय पब्लिकमध्ये त्याने जबरदस्त बिझनेस केला. ऐश्वर्याने पुढे काही हॉलिवूड सिनेमे केले पण त्यांनी ट्रॉय प्रमाणे यश मिळवलं नाही.
पुढे एकदा ब्रॅड पिट आपल्या मुलाखती मध्ये म्हणाला,
“संधी दिल्यावर, मला ऐश्वर्या राय बच्चनसोबत काम करायला आवडेल, कारण ती एक बहुमुखी अभिनेत्री आहे. ती बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी आपल्या शैली, सौंदर्य आणि अभिनयासाठी पाश्चिमात्य देशांत प्रचंड प्रशंसा मिळवली आहे. मला वाटते की आम्ही ट्रॉयसाठी एकत्र येण्याची संधी गमावली. ”
हे हि वाच भिडू :
- तो सलमान आणि ऐश्वर्याचा पडद्यावरचा शेवटचा सिन ठरला!!
- वास्तवच्या चाळीवर खर्च केलेले पैसे वसूल व्हावेत म्हणून अजून एक सिनेमा बनवावा लागला.
- त्याकाळात चर्चा होती ,सलमान खानपेक्षा भारी बॉडीबिल्डर आलाय.
- कापड गिरण्यांनी गजबजणार गिरणगाव, डॉक्टरांच्या एका हाकेवर शांत व्हायला लागलं..