परमबीर सिंह यांच्यावर आधी खंडणीचे अन आता कसाबला मदत केल्याचे आरोप होतायेत.
महाराष्ट्रात काय सावळा गोंधळ चालूये हे आपल्याला रोज काही ना काही बातम्यांमध्ये कळूनच येतंय. त्यात समीर वानखेडे प्रकरण, नवाब मालिकांचे आरोपांचे बॉम्ब रोजच फुटत आहेत. पण गेल्या काही महिन्या पासून परमबीर सिंह प्रकरण अजूनही शांत होण्याचे नाव घेईना…
त्यात भर म्हणजे आता परमबीर सिंह यांच्यावर एक खळबळजनक आरोप होत आहे तो म्हणजे, २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातला आरोपी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवून ठेवला असल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय…नेमकं काय प्रकरण आहे बघूया…
परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परमबीर सिंह बेपत्ता होते. कोर्टानं फरार घोषित केलेल्या परमबीर सिंह यांचा पत्ताच मिळत नव्हता. अशातच काही वेळापूर्वी परमबीर सिंह मुंबईत दाखल झाले आहेत. परमबीर सिंह अचानक परतल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केला होता. यावर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना फरार घोषित केलं आहे.
फरार घोषित झालेले परमबीर सिंह चंदीगडमध्ये असल्याची माहिती समोर आलीये. कोर्टाने आदेश दिल्यास चौकशीला हजर राहणार आणि सहकार्य करणार अशी ग्वाही परमबीर सिंह यांनी दिली असल्याचे वृत्त आहे.
आधीच अनेक प्रकरणामध्ये गोवलेले परमबीर सिंहांवर आता आणखी एक गंभीर आणि खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. मुंबईच्या निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी हे आरोप केले आहेत. त्यांचं असं म्हणण आहे कि, परमबीर सिंह यांनी दहशतवाद्यांना मदत केली होती.
पठाण यांनी एक तक्रार अर्ज दिला आहे. या अर्जात म्हटलं आहे की, त्यांना अशी शंका आहे की, २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात परमबीर सिंह यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवून ठेवला होता किंवा कुणाला तरी दिला होता.
२६/११ च्या हल्ल्याच्या चौकशीदरम्यान परमबीर सिंग महाराष्ट्र ATS मध्ये कार्यरत होते. तेंव्हा या प्रकरणाची चौकशी मुंबई क्राइम ब्रांचकडे ट्रांसफ़र केली होती. त्याच दरम्यान सिंह यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल चौकशीसाठी घेतला होता. पण चौकशीनंतर सिंह यांनी तो मोबाईल क्राईम ब्रांचकडे दिलाच नाही, असा दावा पठाण यांनी केला आहे….त्यामुळे या चौकशीत काय काळबेरं आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी पठाण यांनी केली आहे.
कसाबचा मोबाईल हा पुरावा म्हणून खूप महत्वाचा होता, त्यातून अनेक धागेदोरे समोर आले असते, कारण त्या मोबाईलवरुन २६/११ च्या हल्ल्याच्या तयारीसाठी कसाबसह बाकी दहशतवादी पाकिस्तानातील आपल्या हॅन्डलरशी संवाद साधत होते. त्यानंतरच त्यांनी हा हल्ला घडवून आणला. पण तो मोबाईल आता कुठेय याची सविस्तर चौकशी होणे, खूप महत्वाचे आहे असं पठाण यांनी म्हटलं आहे.
आधीच खंडणीचा आरोप त्यात आता दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप झाला आहे, त्यामुळे हे प्रकरण आता साधारण प्रकरण राहिलं नसून, या प्रकरणाचा फायनल निकाल लावणे हे राज्य सरकारसमोरचं मोठं आव्हान असणार आहे.
पदावरुन बाजूला केलं जाणार का ? हाही प्रश्न तितकाच महत्वाचा आहे. परमबीर सिंह यांना आधी फरार घोषित केलं अन मग आता दोषी सिद्ध झाल्यानंतर त्यांना पदावरून दूर केलं जाणार का ? कारण ते जर दोषी आढळले तर त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार हा केवळ केंद्र सरकारकडे असणार आहे. कारण ते पदाने आयपीएस अधिकारी आहेत, जे लोकसेवा आयोगातून त्यांचे हे पद असल्याकारणाने त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारकडे असतो, पण मेख हि आहे कि, त्यांना पदावरून काढून टाकण्यात यावं यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तशा प्रकारची शिफारस करणं गरजेचं असते.
हे ही वाच भिडू
- एक असा गंड पत्रकार ज्याने दाऊदच्या हॉटेलवर ४.२८ कोटींची बोली जिंकली होती!
- भारतातून पळून गेलेला दाऊद मुंबईच्या अंडरवर्ल्डवर इकबालच्या रूपात राज्य करायचा
- मुख्यमंत्र्यांना ५ कोटीची लाच ऑफर झालेली, तरी दाऊदचा बंगला हातोड्याने पाडला..
- छोटा राजनने बाळासाहेबांना सल्ला दिला दाऊद देशद्रोही नाही, ठाकरेंनी लक्ष घालू नये