दोन छोटी मुलं तानाजीचा पोवाडा गात होती आणि बाळासाहेब पूर्ण वेळ उभं राहून ऐकत होते !!

गोष्ट आहे १९८४-८५ ची. शिरूर मध्ये शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन होतं. या उद्घाटनाला खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे येणार होते. तस बघायला गेल तर त्याकाळात शिरूर म्हणजे छोटसं गाव. त्या गावात बाळासाहेब ठाकरे, दादा कोंडके येणार म्हणजे अप्रूपच होतं. जोरदार तयारी करण्यात आली.

बाळासाहेबांच स्वागत शिवरायांच्या पोवाड्याने करायचं अस ठरल.

कोणी तरी सांगितल कि गावातल्या मराठी शाळेतले दोन सख्खे भाऊ शिवरायांचा पोवाडा छान गातात. मोठा अतुल गोगावले चौथीत होता तर धाकटा अजय गोगावले दुसरीत असेल. ही दोन छोटी मुल शाहीर बाबासाहेब देशमुखांचा ‘गड आला पण सिंह गेला’ हा पोवाडा ज्या त्वेषाने तोंडपाठ म्हणायचे त्याची चर्चा फक्त शाळेतच नाही तर अख्ख्या शिरूर मध्ये होती.

म्हणूनच कौतुकाने त्या दोघांना नेहरूशर्ट सलवार, कमरेला शेला, डोक्यावर फेटा अशा वेशात सजवून कार्यक्रमात पोवाडा म्हणण्यासाठी उभं केल.

शिवसेनाप्रमुखांना अजून कार्यक्रमस्थळी पोहचले नव्हते. दादा कोंडकेंच आगमन झाल होतं.

त्यांनी स्टेजवर पाउल ठेवल्यापासून आपल्या गंमतीने जमलेल्याना खूप हसवल. बाळासाहेबांना येण्यास काही कारणामुळे उशीर होत होता. तोपर्यंत आयोजकांनी छोट्या अजय-अतुलना पोवाडा गाण्यास सांगितल. त्या वयातही आपल्या पहाडी आवाजात त्यांनी ललकारी दिली,

“ओम नमो श्री जगदंबे नमन तुज अंबे करून प्रारंभे

डफावर थाप तुनतुण्याचा

शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण

शिवप्रभूचं गातो गुणगान हे जी जी जी “

दादा कोंडकेंच्या सकट सगळी सभा थरारून गेली.

बाबासाहेब देशमुख म्हणजे सांगली जिल्ह्यात जन्मलेले महान शाहीर. त्यांनी अनेक पोवाडे रचले, राज्यात प्रत्येक शिव जयंतीपासून प्रत्येक कार्यक्रमात वाजणाऱ्या पोवाड्यापैकी ९० % पोवाडे त्यांनी गायलेले असतात. त्यातही हा तानाजीचा पोवाडे अतिशय सुप्रसिद्ध.

तब्बल एक तासाचा हा पोवाडा गायला सुद्धा तितकाच दम लागतो. मात्र शाळकरी वयातल्या अजय अतुलनी शिवधनुष्य उचललं होतं.

अजयला थकला कि अतुल गात होता, अतुलला दम लागला कि अजय गात होता.

या पोवाड्याने सगळ्यांना मंत्रमुग्ध केल होतं. अर्धा निम्मा पोवाडा झाला होता अचानक स्टेजच्या जवळ काही गडबड सुरु झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आले होते. कोणीतरी अजय अतुल ला पोवाडा थांबवण्यास सांगत होतं तेवढ्यात बाळासाहेब गरजले.

“महाराजांचा पोवाडा गात आहेत ना? त्यांना थांबू नका.”

त्यांनी खुणेने या दोन्ही मावळ्यांना गायची सूचना केली. दोघे गात गेले. जवळपास अर्धा तास पोवाडा चालला. बाळासाहेब स्टेजच्या जवळ या पोरांचं कौतुक करत संपूर्ण पोवाडा संपेपर्यंत उभे होते.

पोवाडा सुरु असताना थांबणे म्हणजे राजांचा अपमान आहे हे बाळासाहेबांना ठाऊक होतं. 

आज अजय अतुल म्हणतात, तेव्हा आम्ही बाळासाहेबांना ओळखत देखील नव्हतो. काही कळायचं आमच वय पण नव्हत. पण बाळासाहेबांची ती छोटी कृती आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही. त्यातून आम्ही खूप काही शिकलो.

या दोन्ही छोट्या शाहिरांचा बाळासाहेबांच्या हस्ते हार घालून सत्कार करण्यात आला. तो फुलांचा हार या दोन्ही भावांनी अनेक दिवस जपून ठेवला.

मागच्या वर्षी सर्वत्र गर्दी खेचणाऱ्या गड आला पण सिंह गेला ची कथा जगभरात पोहचवणाऱ्या ‘तान्हाजी’ सिनेमाच संगीत देखील याच अजय अतुलनी दिलय. त्यांच्या संगीताच्या करीयरची सुरवातच वयाच्या सातव्या आठव्या वर्षी बाळासाहेबांच्या समोर तानाजीचा पोवाडा म्हणून झाली होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.