अजय-अतुलनं फक्त सैराटची गाणीच नाहीत तर देवाच्या आरत्या सुद्धा सिंफनी वापरुन बनवल्या होत्या…

भारतीय संगीत सृष्टी पूर्वीपासूनच अभिजात आहे. सर्व भाषांमध्ये उत्तमोत्तम संगीत आपल्या भारतात बनवलं जातं. कोणत्याही भाषेतलं गाणं असलं तरी आपण ते आवडीने ऐकतो, शब्द म्हणता येत नसले तरी गुणगूणत का होईना गाण्यांची चाल लक्षात ठेवतो आणि याचं क्रेडिट संगीतकारांना जातं.

कुठल्याही चांगल्या गाण्याची चाल लक्षात ठेवायला आपल्याला कष्ट घ्यावे लागत नाहीत, ती चाल आपल्या आपोआप लक्षात राहते कारण संगीतकारांनी त्या चालीवर तगडं काम केलेलं असतं.

भारतात सगळ्यात आघाडीवर असणाऱ्या संगीतकारांमध्ये आवर्जून घेतलं जाणारं नाव म्हणजे अजय-अतुल या जोडीचं. 

पार्ट्यांपासून, देवांच्या आरत्यांपर्यंत सगळ्या ठिकाणी, गावा गल्लीतल्या प्रत्येक स्पीकरवर हे दोघं जाऊन पोहोचलेत आणि आज आपल्याला ते ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर सुद्धा गाताना, गप्पा मारताना, विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देताना आणि धमाल करताना आज रात्री दिसणार आहेत.

आता मी ज्या पार्ट्या आणि आरत्यांचा उल्लेख केला ती गोष्ट खोटी नाही बरं.

सगळ्या कार्यक्रम समारंभात, लग्न आणि हळदीत, सणवारांच्या गर्दीत आणि कुठल्याही शाळा कॉलेजच्या पार्टीत अजय अतुलचं झिंगाट वाजल्याशिवाय सोहळा सुफळ संपूर्ण होत नाही आणि झिंगाट हे गाणं या गर्दीतल्या कोणाला माहीत नाही असंही होत नाही.

हे झालं पार्ट्याचं.. पण मी आरत्यांचाही उल्लेख केला त्यालाही एक कारण आहे.

आपण अनेक आरत्या आणि त्यांचे संग्रह यू ट्यूबवर कायम पहात आणि ऐकत असतो. गायक, गायिकांनी अनेक वेगवेगळ्या आरत्या साधारण सेमच चालीत म्हटलेल्या असतात. तरी आपण त्या देवाच्या म्हणून ऐकत राहतो.

पण काही वर्षांपूर्वी मात्र अजय अतुल यांनी आरती संग्रह संगीतबद्ध केला होता आणि तोही आपल्या हटके स्टाइलमध्ये. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेला आरती संग्रह तूफान गाजला होता आणि उजवा ठरला होता. विशेष म्हणजे सैराटच्या गाण्यांमध्ये वापरलेली गेलेली विदेशातली सिंफनी या आरत्यांमध्ये सुध्दा वापरली गेली होती.

अजय-अतुल यांना लहान वयापासूनच संगीताची आवड होती. 

चांगलं संगीत ऐकणं आणि वेगवेगळ्या चाली ऐकून त्यात बदल करणं, एक्सपिरीमेन्ट करणं हे त्यांच्या सवयीचं बनलं होतं. पण हे सगळे प्रयोग, मेहनत ही त्यांच्यापुरतीच मर्यादित राहिली होती. त्यांना फेम मिळत नव्हतं, खूप प्रयत्न चालले होते पण म्हणावं तितकं यशही कशात मिळत नव्हतं.

एका मुलाखतीत अजय अतुल म्हणतात की,

“तुम्ही जेव्हा नवीन असता, काम मिळण्यासाठी धडपडत असता तेव्हा तुम्हाला कमी लेखणारी आणि मागे खेचणारीच लोकं जास्त भेटत राहतात. तुम्हाला काहीच जमणार नाही, तुम्ही इथे येऊन चूक करताय अशा पद्धतीचंच कायम तुमच्या आजू बाजूला बोललं जात असतं. पण तरीही नं डगमगता लाऊन धरणं आणि आहात तिथून मागे नं फिरणं हे फार महत्वाचं असतं.”

त्यावेळी अजय-अतुल या दोघांनी सुद्धा लाऊन धरलं. म्युझिक डायरेक्शन नाही तरी म्युझिक अरेंजर म्हणून काम करणं त्यांनी सोडलं नाही, छोटे मोठे प्रोजेक्ट घेणं सोडलं नाही आणि त्यावेळीच टाइम्स म्युझिकमध्ये काम करणाऱ्या एकाने या दोघांचं काम पाहिलं. 

अजय अतुल यांच्या कामावर टाइम्स म्युझिकचा तो कार्यकर्ता खूप प्रभावित झाला आणि त्यांनी पहिल्यांदा या दोन नवोदित कलाकारांवर विश्वास टाकला. त्यांनी अजय अतुल यांना नेमकं काय करायचंय असं विचारलं तेव्हा अजय अतुल यांनी एक इच्छा बोलून दाखवली. 

अजय-अतुल यांना देवाच्या आरत्या सिंफनी वापरुन बनवायच्या होत्या.

आता सिंफनी म्हणजे काय तर हा प्रकार बाहेरच्या देशात जास्त वापरला जातो. खूप मोठा वाद्यवृंद जेव्हा एकसंध म्युझिक सादर करतो तेव्हा त्याला सिंफनी म्हटलं जातं. वाद्यवृंद कितीही मोठा असला तरी त्यात वाजणारं एकही वाद्य इकडे तिकडे वाजत नाही, त्यांचं सगळं अगदी परफेक्ट असतं आणि अशातनं जे संगीत तयार होतं ते वेड लावणारं असतं. 

ही सिंफनी आपण सैराट पिक्चरच्या गाण्यांमध्ये ऐकलीच आहे. सैराट पिक्चरमध्ये वापरल्या गेलेल्या सिंफनीची किंवा एकंदरीतच म्युझिकची किती चर्चा झाली हेही आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. पिक्चर तर बाप होताच पण सैराटच्या गाण्यांनी जनतेला अक्षरशः नाद लावला होता. 

हीच ती सिंफनी जिचा अजय अतुल यांना आरत्यांमध्ये वापरण्याचा प्रयोग करून पाहायचा होता. त्यांची ही आयडिया त्या टाइम्स म्युझिकमध्ये काम करणाऱ्या माणसाला तूफान आवडली. शंकर महादेवन यांच्या आवाजात हा अल्बम बनला, रिलीज झाला आणि अर्थातच हिट झाला. लोकांना त्या अल्बम मधल्या आरत्या कायम गाणी असल्या सारख्याच वाटायच्या, आजही वाटतात. 

त्यातल्या त्यात ‘एकंदांताय वक्रतुंडाय’ ही आरती तर त्यांची सगळ्यात जास्त गाजलेली आरती आहे.   

प्रत्येक संधीकडे, साध्याशा कामाकडे सुद्धा, एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं फार फार कठीण असतं पण हेच अजय अतुल यांनी करून दाखवलं आणि प्रेक्षकांची कायम दाद मिळवली. प्रगती करत असताना त्यांनी कधीच मागे वळून नाही, जी परिस्थिती असेल त्या प्रत्येक परिस्थितीला हसत हसत तोंड दिलं. आज रात्री ९ वाजता पाहूया की हेच दोघे आता ‘कोण होणार करोडपती’च्या विशेष भागात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना कसे सामोरे जातायत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.