जेव्हा अजय-अतुलला कोणीच ओळखत नव्हतं तेव्हा राज ठाकरेंनी त्यांना हिंदी सिनेमा मिळवून दिला..

मुंबईत एक मराठी सिनेपुरस्कार सोहळा होणार होता. संगीतकार जोडी अजय अतुल यांना देखील नॉमिनेशन होतं. ते या कार्यक्रमात परफॉर्म देखील करणार होते. फ़ंक्शनसाठी दोघे थोडं लवकरच निघाले, अतुल गोगावले स्वतः ड्राइव्ह करत होते. अचानक कारमध्येच अजयला पॅनिक अटॅक आला. अतुलला धक्काच बसला. त्याला काय कराव कळेना.

अशा आणीबाणीच्या वेळी त्यांनी पहिला फोन केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना. त्यांनी देखील लागोलग मदत पाठवली आणि अजयला लीलावती हॉस्पिटल येथे भरती केलं. 

असं आहे राज ठाकरे आणि अजय अतुल यांचं नातं. अगदी कसलंही संकट असो , सुखदुःखाचे प्रसंग असो राज ठाकरे अजय अतुल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले दिसतात. मनसेचं पहिलं गाणं देखील अजय अतुल यांनीच संगीतबद्ध केलं होतं.

पण यांच्या मैत्रीस सुरवात कशी झाली याचा किस्सा देखील इंटरेस्टिंग आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली नव्हती त्याकाळची गोष्ट. राज ठाकरे तेव्हा शिवसेनेत होते. राज यांचे वडील मोठे दिग्गज संगीतकार असल्यामुळे त्यांना म्यूजिकमधलं चांगलं वाईट कळतं. त्यांच कान त्यात तयार झाला आहे असं म्हणतात. अनेकदा ते स्वतः दुकानात जाऊन आपल्याला आवडेल त्या सिनेमांची व गाण्यांची सीडी विकत घेऊन येतात.

असच त्यांना एकदा विश्वविनायक नावाचा अल्बम मिळाला. एस.पी.बालसुब्रमण्यम, शंकर महादेवनसारख्या मोठ्या गायकांनी  त्यातली गाणी गायली होती. राज ठाकरेंना उत्सुकता होती की याचे संगीतकार कोण? नाव पाहिल्यावर कळालं की अजय गोगावले आणि अतुल गोगावले या ग्रामीण भागातल्या मराठी तरुणांनी हि गाणी बनवली आहेत.

राज ठाकरे यांना हि गाणी प्रचंड आवडली होती पण त्यात ही गाणी या मराठी तरुणांनी बनवली आहेत हे कळल्यामुळे त्यांना अभिमान वाटला. पुढे योगायोगाने एकदा एका कार्यक्रमात त्यांची अजय अतुलशी भेट झाली. तिघांचे सूर जुळले. 

राज यांनीच त्यांना केदार शिंदेंचा अग बाई अरेच्चा मिळवून दिला. अगदी या सिनेमाची गाणी बनण्याच्या प्रोसेस पासून राज ठाकरे त्यांच्या सोबत होते. असं म्हणतात की सोनाली बेंद्रे यांच्यावर चित्रित झालेल्या चम चम करता है ये रसिला बदन या गाण्याच्या निर्मितीवेळी अजय अतुल यांना  काही अडचण अली होती तेव्हा राज ठाकरे यांनी स्वतः जेष्ठ संगीतकार प्यारेलाल यांना विनंती करून अजय अतुल यांना मदत करायला लावली होती.

अग बाई अरेच्चा बनतच होता पण राज ठाकरे यांच्या मनात आलं की या प्रतिभावान तरुणांना देशाच्या पातळीवर पोहचवायचं असेल तर त्यांना हिंदी सिनेमात देखील संधी मिळायला हवी. राज यांना मानणारे अनेकजण हिंदी फिल्म इंडस्ट्री आहेत. यातूनच त्यांनी अजय अतुल यांना राम गोपाल वर्मा यांच्याकडे घेऊन जायचं ठरवलं.

राम गोपाल वर्मा तेव्हा यशाच्या शिखरावर होते. रंगीला, सत्या, कंपनी वगैरे सिनेमे तुफान गाजले होते. शिवाय त्याने स्थापन केलेल्या फॅक्ट्री प्रोडक्शन या फिल्मकंपनीतून अनेक प्रायोगिक सिनेमे बनत होते. अनेक नव्या दिग्दर्शकांना कलाकारांना ते संधी देत होते. राम गोपाल वर्मा यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या सिनेमाच्या गाण्यातही अनेक प्रयोग केले होते. रहमानला हिंदीत त्यांनीच आणलं होतं. विशाल भारव्दाज, संदीप चौटाला अशा वेगळ्या धाटणीच्या संगीतकारांसोबत त्यांनी काम केलं होतं.

रामूचा सिनेमा म्हणजे तो डार्क असणार आणि त्यातलं म्युजिक देखील तितकंच जबरदस्त असणार याची खात्री असायची.

राज ठाकरे जेव्हा अजय अतुलला घेऊन रामूच्या घरी आले तेव्हा त्यांनी त्यांच्या अल्बमच नाव ऐकूनच नकार घंटा वाजवायला सुरवात केली. कारण असं होतं की रामगोपाल वर्मा हा सुरवातीपासून प्रचंड नास्तिक आहे. त्याला विश्वविनायकची  गाणी म्हणजे टिपिकल गुलशन कुमार टाईप असतील असा गैरसमज झाला. राज ठाकरे म्हणाले ऐकून तरी पहा. फक्त राज यांचा शब्द ऐकायचा म्हणून तो ती गाणी ऐकायला तयार झाला.

सुरवातीची काही गाणी ऐकली. रामूला ती विशेष आवडली नाहीत. पण राज यांचा आग्रह म्हणून तो ऐकत होता. त्याने नकार द्यायचं मनात पक्कच केलं होतं आणि त्याच्या म्युजिक सिस्टीलमवर पुढच गाणं लागलं.

शंकर महादेवन यांचा आवाज घुमला. विश्वविनायक अल्बमचे “गणेशाय धिमही’ हे गाणं सुरू झालं. ते गाणं त्यात वापरलेला ऑर्केस्ट्रा त्याची भव्यता शब्दाशब्दात जाणवत होती. रामूला लक्षात आलं कि हे नेहमीच देवाधर्माचं गाणं नाहीय. तो झटकन उठला आणि म्हणाला,

  “तर तो जो मुलगा आहे तो अदृश्य होत असतो’

अजय-अतुलला समजेचना कि नेमकं काय झालंय. रामूला त्यांचं गाणं प्रचंड आवडलं होतं म्हणून तो त्यांना आपल्या नव्या गायब या सिनेमाची स्टोरी सांगत होता. त्याने त्यांना साइन केलं होतं. ज्या वर्षी अजय अतुल यांचा पहिला मराठी सिनेमा आला त्याच वर्षी त्यांचा पहिला हिंदी सिनेमा देखील रिलीज झाला आणि तो ही राम गोपाल वर्मा यांच्या प्रॉडक्शनचा.

अजय अतुल या संगीतविश्वावर घोंगावणाऱ्या वादळाची हि सुरवात होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.