अजय जडेजा आणि माधुरीचं प्रकरण लग्नापर्यन्त गेलेलं पण एक घोळ झाला…

क्रिकेटर आणि बॉलीवूड सेलिब्रिटी यांचं जुळणं आपल्यासाठी काही नवं नाही. अगदी सध्याची उदाहरणं घ्यायची झाली तर विराट कोहली-अनुष्का शर्मा , झहीर खान-सागरिका घाटगे अशा कित्येक जोड्या बघायला मिळतील. क्रिकेटर-ॲक्टर या दोघांचं जेव्हा जुळतं तेव्हा कायम एक वेगळीच चर्चा होत असते. न्यूज पेपर, टीव्ही अशा अनेक माध्यमांमध्ये त्यांचीच चर्चा सुरू असते.

अशीच एक मोठी चर्चा झाली होती एका अभिनेत्री आणि क्रिकेटपटूच्या जोडीची. एका क्षणाला दोघं लग्न करणार याची दाट शक्यता होती. परंतु नशीबाचे फासे उलटे पडले आणि दोघांची प्रेम कहाणी अधुरी राहिली.

हा किस्सा आहे अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि क्रिकेटर अजय जडेजा यांचा.

याची सुरुवात झाली १९९८ साली. अजय जडेजा आणि माधुरी दीक्षित एका मॅगझिनच्या फोटोशूट साठी पहिल्यांदा एकत्र आले. दोघेही त्यांच्या क्षेत्रात अगदी टॉपवर. त्यामुळे दोघंही एकमेकांना साहजिक ओळखत होते. परंतु भेट कधी झाली नव्हती.

या फोटोशूट निमित्ताने माधुरी – अजय पहिल्यांदाच एकमेकांना भेटले. फोटोशूट छान झालं.

दोघांचीही ओळख झाली.
या पहिल्याच भेटीत अगदी अल्पावधीत दोघांची मैत्री झाली. गप्पागोष्टी झाल्या. एकमेकांबद्दल विचारपूस झाली. या भेटीत माधुरीला अजयच्या व्यक्तिमत्त्वाने आकर्षित केले.

निमित्त फोटोशूटचं होतं. पण यानंतर सुद्धा दोघे एकमेकांना भेटत राहीले.

यामुळे दोघांच्या अफेयरची जोरदार चर्चा झाली. तेव्हा मीडिया हे क्षेत्र इतकं विस्तारलं नव्हतं. तरीही माधुरी – अजय संबंधी बातम्या येणं सुरू झालं.

माधुरी – अजय मात्र बिनधास्त होते. त्यांना कोण काय बोलतंय याची फिकीर नव्हती.

दोघेही वेळ मिळेल तसं एकमेकांना भेटत होते. एका बाजूला माधुरीची सिनेमातली कारकीर्द जोरात सुरू होती. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे माधुरी करत होती. परंतु अजयच्या क्रिकेट कामगिरीवर मात्र परिणाम झाला.

त्या दरम्यान अजयचा फॉर्म उतरत जात होता.

इतका चांगला खेळणारा अजय, अचानक असा वाईट खेळू लागल्यामुळे त्याचे कुटुंबीय नाराज झाले. अजय – माधुरीच्या नात्याबद्दल कुटुंबियांना कल्पना होती. परंतु या दोघांच्या नात्याबद्दल अजयच्या कुटुंबीयांनी इतका रस घेतला नाही.

याला कारण असं होतं की, अजयचं कुटुंब हे रॉयल खानदानी कुटुंब होतं. तर माधुरी मध्यमवर्गीय कुटुंबाशी संलग्न होती. त्यामुळे अजयसाठी माधुरी योग्य नाही , असं अजयच्या कुटुंबीयांची ठाम भूमिका होती.

आणि या सगळ्या गोष्टीमध्ये अजयची क्रिकेटमधील वाईट कामगिरी त्यांना खुपत होती.

भिडूंनो, माणूस जेव्हा प्रेमात असतो तेव्हा त्याला कोण काय बोलतंय, याची अजिबात पर्वा नसते. अजय – माधुरी एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत होते.

इतकंच नव्हे, तर माधुरीने कोणा एका निर्मात्याला सोबत घेऊन एक सिनेमा बनवायचा ठरवला. ज्या सिनेमात ती आणि अजय दोघे हिरो – हिरोईन असणार होते.

या दोघांचं नातं इतकं पुढे गेलं होतं, की दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

इतक्या छान नात्याचा शेवट मात्र असा होईल याचा कोणी विचार केला नव्हता. गोड बासुंदी मध्ये मिठाचा खडा पडावा, तसं काहीसं झालं. मॅच फिक्सिंग प्रकरणात अजयचं नाव आलं.

अजयला कोर्टाने दोषी ठरवलं. कोर्टाने दिलेल्या शिक्षेनुसार अजय ५ वर्ष क्रिकेट खेळू शकत नव्हता. काही क्षणात अजयची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली. मॅच फिक्सिंग प्रकरणात अजय दोषी आढळल्यामुळे माधुरीला मोठा धक्का बसला.

तिने अजयशी नातं तोडलं. आणि पुढे १९९९ साली माधुरीने श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं.

जितक्या सहज माधुरी – अजय एकत्र आले होते तितक्या सहज हे दोघे वेगळे झाले. अजयचं जर मॅच फिक्सिंग प्रकरणात नाव आलं नसत तर कदाचित आज चित्र वेगळं असतं. असो !

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.