धोनीच्या आधी ६ विकेटकिपर अजमावून पाहिले पण अजय रात्रा हटके होता……

क्रिकेट हा असा खेळ आहे जिथं कधी काय घडेल, कधी कोण हिरो होईल तर कधी कोण झिरो होईल काहीच सांगता येत नाही. भारत हा असा देश आहे जिथे सगळ्यात जास्त क्रिकेट खेळलं जात, पाहिलं जातं आणि विशेष म्हणजे जगलं जातं. ज्या देशाने क्रिकेटचा शोध लावला तो देशसुद्धा भारताचं हे वेड बघून चकित झाला होता.

तर या अनिश्चितता असलेल्या खेळात एखादा खेळाडू सुरवातीला खतरनाक खेळतो आणि निवड समितीला आपल्या नावाची दस्तक देतो. पण जेव्हा संघात स्थान मिळतं तेव्हा परफॉर्मन्स चांगला होतो किंवा एकदमच बिघडून जातो. आजचा किस्सा आहे अजय रात्राचा.

अजय रात्रा हा असा प्लेयर होता जेव्हा भारतीय संघ विकेटकिपरच्या शोधात होता आणि रात्राचं पदार्पण झालं. पण याआधी अजय रात्राची पार्श्वभूमी जाणून घेऊ. उजव्या हाताने अजय बॅटिंग करायचा आणि तो उपयुक्त विकेटकिपर सुद्धा होता. १९ जानेवारी २००२ रोजी अजय रात्राने इंग्लंडविरुद्ध डेब्यू केला. 

२००० मध्ये अजय रात्राची निवड हि नॅशनल क्रिकेट अकादमीला झाली. चांगल्या खेळाच्या जोरावर तो सतत चर्चेत होता. त्यावेळी रात्रा अंडर १९ संघाचा सदस्य होता. तेव्हा अंडर १९ च्या संघाने २००० सालचा युथ वर्ल्ड कप जिंकला होता. पण या स्पर्धेच्या अंतर्गत भारतीय निवड समिती त्यावेळी विकेटकिपरच्या शोधात होती.

६ विकेट किपर त्यावेळी ट्रेनिंग सेशनमध्ये सहभागी होते. हा तो काळ होता जेव्हा महेंद्रसिंग धोनीने आपल्या आगमनाचं बिगुल वाजवलं नव्हतं. तब्बल वर्षभर हा विकेटकिपरचा शोध सुरूच होता आणि त्यावेळी भारतीय निवड समितीला मिळाला अजय रात्रा नावाचा सगळ्यात युवा विकेटकिपर. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा गोवाकडून खेळताना त्याने आपली क्षमता दाखवून दिली होती. 

भारतीय संघात अजय रात्राची निवड झाली आणि त्याला संघात स्थान मिळालं. १२ मे २००२ मध्ये आहै रात्राने वेस्ट इंडिज विरुद्ध ११५ धावांची नाबाद खेळी केली आणि आपली क्षमता दाखवून दिली. अजय रात्रा आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या दोघांनी त्या दिवशी जबरी खेळी केली. १३० धावांची व्हीव्हीएस लक्ष्मणने  केलेली खेळीसुद्धा अप्रतिम होती. ८ व्या विकेटसाठी दोघांनी मिळून अभेद्य २०५ धावांची पार्टनरशिप केली होती.

अजय रात्राने या खेळीच्या जोरावर एक विक्रम तयार केला होता. तो विक्रम होता कि सगळ्यात युवा विकेटकिपरने सेंच्युरी करणे. हा विक्रम करणारा अजय रात्रा पहिला खेळाडू होता.

या दिवसानंतर भारताची विकेटकिपर शोधण्याची चाललेली धडपड थांबली. या मॅचचा दिवस एका अर्थाने खास होता कारण या दिवशी सौरव गांगुलीने भारताच्या सगळ्या खेळाडूंना बॉलिंग करायला लावली होती. 

कप्तान गांगुलीला वाटलं होतं भारताला भावी गिलख्रिस्ट सापडला पण तस घडलं नाही.

अजय रात्राचं करियर काय लांबवर चाललं नाही. दुखापतीमुळे तो संघाच्या बाहेर फेकला गेला आणि पुन्हा कधी त्याला संघात येताच आलं नाही.

रात्राच्या जागी पार्थिव पटेल आला त्यानंतर दिनेश कार्तिक आणि महेंद्रसिंग धोनी असे विकेटकिपर बॅट्समन भारताला मिळत गेले.

फक्त ६ टेस्ट आणि १२ वनडे इतक्यावरच अजय रात्राचं करियर संपुष्टात आलं. ९९ फर्स्ट क्लास सामने खेळून त्याने ४ हजार २९ धावा केल्या होत्या ज्यात ८ शतकं आणि एका द्विशतकाचा समावेश होता.

दुखापतीमुळे त्याचं करियर संपलं पण त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध ११५ धावांची केलेली खेळी आजही क्रिकेट प्रेमींच्या मनात ताजी आहे. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.