टाटांकडून हरले पण याच अजय सिंग यांनी एकेकाळी मोदींना जिंकून दिलं होतं…

आज निकाल लागला. निवडणुकीचा नाही तर एअर इंडियाच्या बोलीचा. गेली अनेक वर्षे चर्चा चालू होती की सरकारला एअर इंडियाचा पांढरा हत्ती परवडत नाहीय. मोदी एअर इंडियाला विकणार आहेत वगैरे वगैरे. एअर इंडियाच्या लिलावात अनेक मोठमोठ्या कंपन्या उतरल्या होत्या. पण फायनल पर्यंत टाटा सन्स आणि स्पाईस जेट मजबूत दावेदार म्हणून स्पर्धेत टिकून राहिल्या.

अखेरीस आता टाटा सन्सने एअर इंडियाची बोली जिंकली आहे. तर स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. आता अजयसिंग आज जरी टाटांकडून हरले असले तरी त्यांनी एकेकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिंकवलं आहे.

होय, आज मोदी देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान आहेत त्याच क्रेडिट अजयसिंग यांना देखील द्यावं लागतं.

आता कसं तर? आपल्याला सगळ्यांनाच २०१४ मध्ये एक सुप्रसिद्ध टॅगलाईन आठवत असले,

बहुत हुई मेहंगाई कि मार, अबकी बार मोदी सरकार…

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी हि टॅगलाईन बरीच व्हायरल झाली होती. अनेकांच्या अगदी तोंडपाठ झाली होती. भाजपच्या निवडणुकीच्या प्रत्येक जाहिरातीमध्ये, प्रत्येक पोस्टरवर, भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर या टॅगलाईनची रिंगटोन वाजत होती. या टॅगलाईनमुळे देशात मोदींच्या बाजूने एक सकारात्मक वातावरण तयार झालं,आणि त्यांना सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी याची मदत झाली.

भाजपच्या याच सुप्रसिद्ध टॅगलाईनचे निर्माते अजयसिंग होते…

अजयसिंग हे अगदी १९९५ पासून दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आपल्या कामामुळे ओळखले जातात. १९९५ साली ते दिल्लीच्या दिल्ली परिवहन महामंडळाचे संचालक झाले. सार्वजनिक असलेली हि संस्था त्यावेळी बरीच तोट्यात होती. ४० हजार कर्मचारी आणि रस्त्यावर बस होत्या केवळ ४००. सिंह यांच्या प्रयत्नांनी पुढच्या अवघ्या २ वर्षात या संस्थेची परिस्थिती बदलली आणि संस्था फायद्यात आली.

त्यानंतर एनडीए सरकारच्या काळात सिंग टेलिकॉम मंत्रालयात ओसीडी म्हणून आले, टेलिकॉम धोरण तयार करण्यात त्यांचं महत्वाच योगदार मानलं जातं. त्यानंतर ते दूरदर्शनमध्ये गेले. पुढे २००७ मध्ये त्यांनी देऊ मोटर्सच्या ग्रेटर नोएडाच्या एका बंद पडलेल्या कारखान्याला ७५० कोटी रुपयांना खरेदी केले. यात त्यांनी ५०० कोटींचे गुंतवणूकदार उभे केले. अल्पावधीमध्येच त्यांनी या कारखान्याला कार बनवणारा जागतिक दर्जाचा कारखाना बनवला.

खूपच कमी लोकांना माहित आहे कि अजयसिंग २०१३-२०१४ च्या दरम्यान भाजपच्या निवडणूक अभियान समितीचे सदस्य होते. त्यावेळी भाजपचे नेते आजचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि अजयसिंग यांनी मिळून भाजपची संपूर्ण माध्यमांमधील प्रचार यंत्रणा सांभाळली होती. त्यांनी त्यासाठी जाहिरात क्षेत्रातील अनेक तज्ञ लोकांची एक टीम तयार केली.

यात गीतकार आणि लेखक प्रसून जोशी यांनी पक्षाचं निवडणूक गीत लिहिले, तर दिल्लीच्या ग्रापीसऍडच्या सुशील गोस्वामी यांना देखील आपल्या आपल्या टीममध्ये घेतले. गोस्वामी यांच्यावर रेडिओच्या जाहिराती आणि जिंगल्स बनवण्याची जबाबदारी होती.

या सगळ्या टीमने त्यावेळी देशभरातून जाहिरातीमध्ये काय असावे याबाबत माहिती मागवली होती. हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, तेव्हा भाजपचे काही मोठे नेते, स्वतंत्र जाहिरातदार आणि काही ब्रँड स्ट्रॅटेजिस्टनी काही टॅगलाईन पाठवल्या. यात ‘देश की पुकार, भाजप सरकार’ आणि ‘इस बार-मोदी सरकार’ अशा टॅगलाईन होत्या. 

या सगळ्या जवळपास अंतिम झाल्या होत्या. पण अजयसिंग यांनी अजून देखील यासाठी हिरवा कंदील दाखवला नव्हता. अजयसिंग यांना त्यावेळी या टॅगलाईन ऐकता ऐकता रात्री यात एक बदल सुचला. यात ‘इस बार’ या शब्दाऐवजी त्यांनी ‘अब कि बार’ हा शब्द वापरून बघितला, तो बदल वापरून टॅगलाईन तयार झाली,

‘अब कि बार मोदी सरकार….’

सर्वांनाच हि टॅगलाईन आवडली, आणि अंतिम देखील झाली. २०१४ मध्ये या टॅगलाईनचा मोदींना सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवण्यात सिंहाचा वाटा मनाला जातो. पुढे निवडणूकीनंतर उद्योगपती म्हणून पुन्हा कामाला सुरुवात करत अजयसिंग यांनी स्पाईसजेट या विमान कंपनची सूत्र हातात घेतली.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.