लय मनाला लावून घेऊ नका, कुंबळेशी बरोबरी केली असली, तरी पटेल आपल्या मुंबईचाच आहे
वानखेडे स्टेडियम. आपल्या भारतीय क्रिकेटची पंढरी. या ग्राऊंडवर भारतानं किती आनंदाचे क्षण पाहिले याची गिणतीच नाही. इथंच आपण वर्ल्डकप जिंकलो, इथंच सचिननं क्रिकेटला अलविदा केला. धोनीचा सिक्स, विराटचं शतक आणि डोमेस्टिक क्रिकेटमधल्या किमान हजार-एक आठवणी वानखेडेशी संबंधित आहेत.
आता वानखेडे आपलं होम ग्राऊंड आहे म्हणल्यावर इथं दादागिरीपण आपलीच चालली पाहिजे. कसंय ज्याची बॅट त्याची पहिली बॅटिंग असा रुल आता नसला, तरी ज्याचं पिच त्याची मजा असा अलिखित नियम क्रिकेटमध्ये आहेच. वानखेडेच्या पिचवर लय रन होतात, कसोटीत चारशे तर किरकोळीत. पण हे पिच कधी कधी बॉलर्सला आशिर्वाद देतं. तसा तिसऱ्या दिवसापासूनच बॉल फिरायला सुरू होता, पण खेळपट्टी रंगात असली… तर दुसऱ्या दिवशीच स्पिनर्सला म्हणणार…
कशी मी राखू तुमची… महर जी जी जी जी…
आता आपले बॅटर्स काय कच्चे खिलाडी नाहीत. लहानपणापासून त्यांना फिरणाऱ्या बॉलसमोर खेळायची सवय. त्यामुळं कितीही मोठा स्पिनर आला तरी आपले भिडू निवांत असतात. पण रोज रोज दिवाळी नसती.
कधीतरी असा बादशहा येतोच जो अशा गरबा खेळणाऱ्या पिचवर भारताचा बाजार उठवतो. सध्या सुरू असलेल्या वानखेडे टेस्टमध्ये असंच काहीसं झालंय. आपल्या कुंबळेनं आणि इंग्लंडच्या जिम लेकरनं डावात दहा विकेट घेण्याचा पराक्रम केला होताच. त्यांच्याशी बरोबरी कुणीच करू शकणार नाही, अशी चर्चा होती.
पण वानखेडेवर एक बादशहा आला, ज्यानं हे शक्य करून दाखवलं. तेही भारतात आणि भारताविरुद्ध. त्याचं नाव एजाज पटेल.
आता न्यूझीलंडचा स्पिनर भारतात येणार आणि भारताविरुद्ध दहाच्या दहा विकेट्स घेणार ही शप्पथ भरून न येणारी जखम आहे. कुंबळेमुळं ताठ असलेली आपली कॉलर आता काहीशी पडणार, पण भिडू लोक लय लोड घेऊ नका. रेकॉर्ड्स हे तूटण्यासाठीच असतात आणि एजाज पटेल आपलाच माणूस आहे.
अहो खरं, आपला म्हणतोय कारण गडी मुंबईत जन्मलाय, आपल्या मुंबईत.
आता त्याची लय भारी स्टोरी सांगतो. भारत आणि न्यूझीलंडमध्ये वानखेडेवर शेवटची टेस्ट मॅच झाली, तेव्हा एजाज होता पाळण्यात. आता मुंबईत जन्माला येणारी पोरं लोकलच्या गर्दीत कसं चढायचं आणि क्रिकेट कसं खेळायचं हे आईच्या पोटातून शिकून येतात. एजाज पण शिकलाच होता, पण किस्सा असा झाला की आठ-नऊ वर्षांचा असताना एजाजची फॅमिली गेली न्यूझीलंडला.
तिकडं गेल्यावरही त्यानं क्रिकेटची गोडी जपली. न्यूझीलंड छोटा देश असला तरी त्यांच्या टीममध्ये यायला स्पर्धा अजिबात कमी नाही. एजाजनं लय हार्ड मेहनत घेतली आणि टीममध्ये स्थान मिळवलं. पण यातही एक ट्विस्ट आहे. आता प्लेअर लोक कसे, वयाच्या २८-२९ व्या वर्षीपर्यंत वाट पाहतात आणि क्रिकेटमध्ये काय झालं नाय तर दुसरी लाईन पकडतात.
एजाज भावानं लाऊन धरलं आणि वयाच्या तिसाव्या वर्षी न्यूझीलंडच्या आंतरराष्ट्रीय संघात एन्ट्री मारली. तेही थाटात. पण असं असलं, तरी आपण मुंबईत टेस्ट मॅच खेळू असं एजाजच्या डोक्यातही आलं नव्हतं. पण त्याला भारत दौऱ्यात संधी मिळाली आणि त्यानं ती गाजवली.
कानपूर टेस्टमध्ये त्यानं भारताचा विजय हिरावून घेतला, तेव्हाच त्याचा लय बेक्कार राग आला होता. पण मनातल्या मनात म्हणलं की, ‘भावा वानखेडेवर ये मग तुला बघतो.’ पण वानखेडेवर भावानं गणितच बदललं. शुभमन गिलपासून सुरुवात केली, मध्ये कोहली, पुजारालाही खाल्लं, बॉलर्सची तर लाईन मांडली आणि मोहम्मद सिराजची विकेट घेत त्यानं डावात दहा विकेट्स घेण्याचा पराक्रम करून दाखवला. सगळ्या क्रिकेट विश्वात सध्या फक्त एजाजच्या नावाची चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे, २५ वर्षांनी भारतात आलेल्या एजाजच्या फॅमिलीमधले काही सदस्य वानखेडेवर मॅच बघायला येणार होते. घरच्यांसमोर भारी खेळावं असं कुणाला वाटत नसणार शेठ, एजाज भारी खेळला, पण खरं एवढं भारी खेळायची गरज होती व्हय मर्दा?
मॅचच्या आधी तो म्हणाला होता, मुंबईत आल्यावर घरात आल्यासारखं वाटतं, इथला वारा, इथल्या आठवणी आणि इथलं घर एकदम नॉस्टॅलजिक करतंय. आता भावाच्या या लिस्टमध्ये डावातल्या दहा विकेट्सची आठवणही ऍड झालीये.
खरं सांगायचं तर तसं वाईट वाटलं. भारताच्या दहा विकेट्स एखादा स्पिनर, भारताच्या ग्राऊंडमध्ये घेतो म्हणजे, ‘अपनी इज्जत गयेली भाई’. पण चालायचंच, विकेट्स काढणारा गडी आपल्या मुंबईचाच आहे. आणि मुंबई कसं सगळ्या जगाला आपलंसं करून घेते, तसं या कार्यकर्त्यालाही घेईलच की…
शेवटी मुंबईचं हृदय समुद्रासारखं आहे…
हे ही वाच भिडू:
- बाकीचे पीचवरुन राडे घालायचे, पण द्रविड गुरुजींनी पीच बनवणाऱ्यांना ३५ हजार दिलेत
- खरच सूर्यकुमार न्यूझीलंडकडून खेळू शकतो का..? यापूर्वी कोणते खेळाडू दूसऱ्या देशाकडून खेळलेत.
- ७० हजार उधारीवर घेत गाड्यांचा व्यवसाय सुरु केला, आज विराट-रोहित त्याचे ग्राहक आहेत
English summary: Ajaz Patel emulates Jim Laker and Anil Kumble, takes all 10 wickets in an innings
web title : Ajaz Patel equals world record takes all wickets in an innings