आणि साबण बनवणारी कंपनी सॉफ्टवेअर कंपनी झाली…

स्वातंत्र्यपूर्वकाळात मोहम्मद हाशीम प्रेमजी नावाचे गृहस्थ बर्मा देशातून भारतात तांदळाच्या व्यापारासाठी आले होते. बर्मामध्ये त्यांना “राईस किंग ऑफ बर्मा” म्हंटले जायचे. गुजरात मधील कच्छ भागात हे कुटुंब राहू लागलं. हाशीम प्रेमजी यांनी काही वर्षातच भारताच्या तांदळाच्या व्यापारात चांगली पकड मिळवली. पण दुर्दैवाने ब्रिटिशांनी व्यापारातील धोरणांमध्ये काही बदल केले आणि प्रेमजीना व्यापाराची लाईन बदलण्याची वेळ आली.

हाशीम यांनी त्यानंतर वनस्पती तेल बनवणारी कंपनी काढायचे ठरवले. १९४५ मध्ये त्यांनी वेस्टर्न इंडिया वेजिटेबल प्रोडक्ट्स लिमिटेड ही कंपनी सुरु केली. याच वर्षी २४ जुलैला अझीम प्रेमजी यांचा जन्म झाला. एव्हाना प्रेमजी कुटुंब मुबई मध्ये राहू लागले होते. १९४६ साली मुंबई पासून ४०० किलोमीटर वर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मध्ये कंपनीचं पहिला प्लांट सुरु केला.  

अनुभवी हाशीम प्रेमजी यांनी हि कंपनी सुरवातीपासूनच चांगली चालवली. दोनच वर्षात कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. ते प्रामाणिक व्यापारी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव दिला. त्यामुळे लोक आदराने त्यांना हाशीम शेठ म्हणून बोलवत. यानंतर १९४७ मध्ये फाळणी झाली.

मोहम्मद अली जिना यांची इच्छा होती की हाशीम प्रेमजी सारखा प्रामाणिक व दूरदृष्टीचा उद्योगपती पाकिस्तानात यावा. पण ते ऐकले नाहीत. त्यांनी भारतातचं रहाण्याचा निर्णय  घेतला.

काळ पुढे सरकत राहिला कंपनी आता किसान सनफ्लॉवर तेला बरोबर ७८७ बार नावाचा साबण पण बनवत होती.

हाशीम यांच्या मुलाचं नाव अझीम प्रेमजी. तो इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी अमेरिकेत स्टॅनफोर्ड मध्ये होता. साल होतं १९६६. एकदिवस अझीमला त्याच्या आईचा गुलाबानोची तार आली,

” अझीम, तुझे वडील आता राहिले नाहीत तू परत ये “

हा फोन ऐकून अझीम प्रेमजीना आयुष्यातला सर्वात मोठा धक्का बसला. कधी स्वप्नात देखील विचार केलं नव्हत अशी परिस्थिती ओढवली होती. वयाच्या एकविसाव्या वर्षी शिक्षण अपूर्ण सोडून अझीम प्रेमजी भारतात परत आले. त्यांनी कंपनीची धुरा सांभाळली. खर पाहिलं तर त्यांना बिझनेसचा काहीच अनुभव नव्हता. त्यांनी जेव्हा कंपनी हातात घेतली तेव्हा कंपनीचे एकूण मुल्यांकन सात कोटी इतके होते, त्यामानाने कंपनी मोठी होती. त्यांनी शून्यापासून सुरवात केली. चुकातून शिकत गेले, मेहनत घेतली. कंपनीची घडी वडिलांच्या पाठीमागे विस्कटू दिली नाही.

पण अझीम त्यात समाधानी नव्हते.त्यांना आपली कंपनी फक्त तेल साबण बनवणारी ठेवायची नव्हती. त्यांची स्वप्नं मोठी होती. त्यांना आपल्या कंपनीला MNC मल्टी नॅशनल कंपनी बनवायचं होतं. येणाऱ्या काळाचा अभ्यास करून त्यांनी कंपनीमध्ये अनेक बदल केले, प्रोडक्ट्स वाढवले.

१९७७ मध्ये अझीम प्रेमजी यांनी कंपनीचे नाव बदलून सुटसुटीत असे ‘विप्रो’ असे ठेवले. 

त्याकाळात भारतातले व्यापाराचे नियम खूप कडक होते. मोरारजी देसाई यांच्या पंतप्रधानकीच्या काळात लालफितीच्या कारभाराला कंटाळून IBM कंपनी भारतातून गेली. दूरदृष्टीच्या अझीम प्रेमजीना यामध्ये संधी दिसली. त्यांनी भारतात स्वतःचा पर्सनल कंप्युटर बनवण्याचा धाडसी निर्णय घेतला. इतकेच नाही तर कंपनीने त्यासोबतच सॉफ्टवेअर बनवून विकण्यास हि सुरवात केली.

अझीम यांचा एक गुण आहे त्यांना चांगली माणसे हेरता येतात तेच, त्यांनी कंपनी चालवत असताना हि केले चांगलात चांगली माणसाना त्यांनी कंपनीत आणले. अझीम त्यांना कंपनीत घेतल्यावर ट्रेनिंग देत आणि त्यांची कार्यक्षमता वाढवत. भारतात त्याकाळी अनेक कुशल इंजिनियर होते अमेरिकन इंजिनियर्स पेक्षा भारतीय इंजिनियर कमी पैश्यात काम करत अझीम यांनी या गोष्टीचा एक व्यवसायिक म्हणून फायदा उचलला.

त्यानंतर ऐंशीच्या दशकात मध्ये अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिकल बरोबर विप्रोने अनेक करार केले दोन्ही कंपन्या मेडिकल क्षेत्रात लागणारी अवजारे बनवू लागल्या. कंपनी मोठ मोठे हार्डवेअर ही बनवू लागली. पण कालांतराने हार्डवेअर मागे पडले आणि कंपनी सोफ्टवेअर मध्ये बरेच नाव कमावले.

अझीम यांना आपले शिक्षण अर्धवट राहिल्याचे खूप शल्य होते त्यामुळे १९९५ साली त्यांनी परत आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करायचे ठरवले आणि त्यांनी करस्पोन्डन्स एजुकेशनच्या माध्यमातून स्टँनफोर्डमधून अखेर इंजिनियरिंगची डिग्री मिळवली.

अझीमजी यश टिकवू शकले याचे कारण ते कोणत्याच एका व्यवसायात अडकून पडले नाहीत. जिथे जिथे संधी दिसेल त्या त्या क्षेत्रात त्यांनी कंपनी वाढवली. २००० च्या आधी कंपनीने भारतात इंटरनेट सुविधा ही देण्यास सुरवात केली, विप्रो नेट लिमिटेड नावाने.

त्याच वर्षी न्यूयॉर्क स्टॉक मार्केट मध्ये कंपनी लिस्ट झाली ही फार मोठी गोष्ट होती.

 १९६६ ला अझीम यांच्या ताब्यात कंपनी आल्यापासून बरीच प्रगती केली होती. कंपनीच्या सॉफ्टवेअरला अनेक देशातून मागणी वाढली होती. अझीम यांच्या सामाजिक संवेदना फार तीव्र आहेत समाजातील शेवटच्या  स्तरापर्यंत आपण काहीतरी बदल करू शकलो पाहिजे असे त्यांना नेहमी वाटायचे. याच प्रेरणेतून  २००१ साली त्यांनी अजीम प्रेमजी फौंडेशन काढले. भारतातील शिक्षणावर हे फौंडेशन काम करू लागले. २००२ साली विप्रो सोफ्टवेअर आणि सर्विसेस देणारी भारतातली पहिली कंपनी झाली जिला iso14001 मिळाले.

कंपनी आत्ता flourosent बल्ब ही बनवू लागली. २००४ साली कंपनीची कमाई शंभर कोटी पेक्षा जास्त झाली. पुढच्या वर्षी अझीम प्रेमजी यांनी कंपनीचे CEO पद स्वीकारले. दोन वर्षानंतर त्यांचा मुलगा रिषद यांनी ही कंपनी जॉईन केली तो  financial services बघू लागला.

कंपनीने पुढील काळात ही अशीच घौड दौड चालूच ठेवली, भारतात आणि भारता बाहेर अनेक कंपन्यांशी करार केली. आज विप्रोचा आय.टी बिझनस एकशे दहा देशांमध्ये आहे. कंपनीत एक लाख साठ हजारा पेक्षा जास्त कामगार आहेत. याच वर्षी २०१९ मध्ये जून महिन्यात वयाच्या ७४व्या वर्षी अझीम प्रेमजी यांनी निवृत्ती घेतली.

अझीम प्रेमजी त्यांच्या सध्या राहणीमाना साठी अत्यंत प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे इतका पैसा आहे पण ते आजही एक जुनीच चार चाकी गाडी वापरतात आणि जवळच्या अंतरासाठी ते टॅक्सी वापरतात. नेहमी विमानाध्ये ईकोनोमी क्लास मधेच प्रवास करतात. अझीमजी जेव्हा बाहेर जातात तेव्हा महागड्या हॉटेल मध्ये रहात नाहीत ते कंपनीच्या गेस्ट हाउस मधेच राहतात.

याच त्यांच्या चिवट स्वभावामुळे त्यांनी विप्रोला सात कोटीं पासून एक लाख कोटीपेक्षा जास्त मोठी कंपनी बनवले.

अझीम प्रेमजी देशातील सर्वात दानशूर उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत. मार्च मध्ये बावन हजार सातशे पन्नास कोटींचे शेअर्स त्यांनी आपल्या फौंडेशनला दान केले. आजवर त्यांनी एक लाख कोटी पेक्षा ही जास्त संपत्ती दान केली आहे. २०१० साली त्यांनी  ना नफा न तोटा या धर्तीवर अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी ची पायाभरणी केली. जिच्यात आजवर हजारो गरीब मुलांनी दर्जेदार शिक्षण मिळवले आहे.

भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि २०११ साली पद्मविभूषण देऊन सन्मानित केले आहे. याशिवाय २००४ आणि २०११ साली TIME मॅगझिन ने त्यांना जगभरातील शंभर सर्व्शाक्तीशाली लोकांच्या यादीत समाविष्ट केले होते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.