पांढऱ्या कपड्यातली शेवटची वनडे मॅच आणि आगरकरचा कधीच न मोडला गेलेला विक्रम!

भारताची टीम भगव्या कपड्यात वर्ल्डकप खेळणार ही बातमी आम्ही लय आधी फोडली होती, कॉन्टॅक्ट पॉवर भिडू. त्यात क्रिकेट जर्सीवर नंबर कधीपासून आला यावर पण आम्ही बोल भिडूवर लेख लिहिला. आता जर्सी या विषयावर आमची पीएचडी व्हायची बाकी होती.

त्यातच एका भिडूनं सांगितलं भारतानं पांढऱ्या ड्रेसमध्ये खेळलेल्या वनडे सिरीजबद्दल पण माहिती द्या. मग आम्ही सूत्र हलवली आणि माहिती घेतली.

तर गोष्ट आहे सोळाव्या शतकातली. तेव्हा क्रिकेटचा शोध लागला असं म्हणतात. जेव्हा आपल्या देशात मराठे मुघलांशी लढत होते, तेव्हा इंग्लिश साहेब पांढऱ्या कपड्यात बॅटबॉल खेळत होता. पुढे साधारण तीनशे वर्षांनी १९७८ मध्ये पहिल्यांदा पेकर्स क्रिकेटमध्ये रंगीत कपडे दिसले.

सत्तरच्या दशकात वनडे क्रिकेटही सुरू झालं होतं. पण क्रिकेटमधल्या खडूस कार्यकर्त्यांनी रंगीत कपडे स्वीकारले नाहीत.

शेवटी १९९२ च्या वर्ल्डकप पासून रंगीत कपडे आलेच.

पण सगळ्यांनाच काय रंगीत कपडे परवडायचे नाहीत. अधनं मधनं चांगले स्पॉन्सर्स मिळाले, मोठी टीम आली की पोरं नवीन कपड्यात खेळायची. सेम शाळेच्या युनीफॉर्मसारखं. मग मग आपली बीसीसीआय पण श्रीमंत झाली. कोकाकोला, विल्स असले भारी स्पॉन्सर्स मिळाले.

इतर टीम्सकडे पण पैसा आला होता. मग फायनली आयसीसीनंच पुढाकार घेऊन वनडेतला पांढरा ड्रेस गायब केला. याचाच अर्थ वनडेमधून लाल बॉलही गायब झाला. आता सगळ्या मॅचेस पांढऱ्या बॉलवर होऊ लागल्या.

या जंटलमन व्हाईट ड्रेस मधली शेवटची वनडे सिरीज झाली २००० सालच्या झिम्बाब्वेच्या भारत दौऱ्यामध्ये. पाच मॅचची सिरीज होती. भारतानं ती ४-१ नी मारली. पण शेवटची मॅच लई वांड झाली. त्याचं काय झालं, अझरूद्दीनचा काळ संपून गांगुलीचं साम्राज्य सुरु झालेलं.

त्याच्यामुळं झहीर, युवराज, सेहवाग अशा नवीन भिडूंना चान्स मिळालेला. झिम्बाब्वे सुद्धा त्याकाळात भारी होती. कॅप्टन हिथ स्ट्रीक, अँडी आणि ग्रँट फ्लॉवर बंधू, कॅम्पबेल हे भारी भिडू त्यांच्याकडे होते. पण नेमका या पांढऱ्या कपड्यातल्या शेवटच्या वनडेमध्ये आपला दादा गांगुली नव्हता.

मागच्या मॅच मध्ये त्याने जरा आगाऊपणा केलेला. सलग चार बॉलला गरज नसताना उगीचच अपील केलं. रेफ्रीनं फॉर्मातल्या दादाला पुढच्या मॅचमध्ये बाहेर बसवलं. लय रिक्षा फिरवली आता मुद्द्यावर येतो.

त्या मॅचसाठी पहिल्यांदाच द्रविडला कॅप्टन करण्यात आलं.

टॉस झिम्बाब्वेनं जिंकला आणि पहिली फिल्डिंग घेतली. गांगुली नसल्यामुळे एस. श्रीराम ओपनिंगला आला. पण तो काय चालला नाही. विश्वासू गडी सचिन पण मूड मध्ये नव्हता की काय, तोही लवकर आउट झाला. पाठोपाठ द्रविडची वॉल कोसळली.

कधी नव्हे ते हेमांग बदानी टिकला. त्यानं युवराजला घेऊन डाव सावरला. युवराजनंतर सहा नंबरला येणाऱ्या सेहवागचा फ्लॉप शो झाला. सात नंबरला येऊन रितींधर सिंग सोढीनं चांगली फिफ्टी मारली. सगळं ठीक चाललेलं ओ. पण तेवढ्यात बदानी ७७ वर आउट झाला आणि आगरकर आला. स्कोअर बोर्डवर २१६ चा आकडा लागला होता. सगळ्यांना वाटलं लईत लई २४०, डोक्यावरून पाणी.

अजित भालचंद्र आगरकर.

त्यादिवशी काय खाऊन आलेला माहित नाय. आल्यापासून त्यानं धुवायला सुरवात केली. जिथं सचिन, द्रविड, सेहवागसारखे बॅटसमन फेल गेले तिथं आगरकर तलवारीसारखी बॅट फिरवू लागला. बघता बघता गड्यानं फक्त २१ बॉल मध्ये फिफ्टी मारली. फक्त २१ बॉल. भारतातर्फे सगळ्यात फास्ट हाफ सेंच्युरी. त्या दिवशी झिम्बाब्वेचे बॉलर सोडा पण भारतीय खेळाडू, प्रेक्षक सगळे जण शॉकमध्ये होते.

विशेष म्हणजे भारतातर्फे यापूर्वीचा फास्टेस्ट हाफ सेन्च्युरीचा रेकॉर्डसुद्धा एका फास्ट बॉलरच्या म्हणजेच कपिल देवच्या नावावर होता. सतरा वर्षांनी आगरकरनं तो मोडला. भारताची इनिंग संपली तेव्हा सोढी आणि आगरकरनं स्कोअर ३०१ ला नेऊन ठेवलेला.

त्याकाळच्या मानानं झिम्बाब्वेला अशक्य. आगरकरनं ७ फोर आणि ४ सिक्स मारून २५ बॉलमध्ये ६७ रन्स काढले होते. झिम्बाब्वे आता फॉर्मलिटी म्हणून बॅटिंगला उतरली. त्यांनी काय चमत्कार केला नाय, पण मोठी पार्टनरशिप झालीच नाय आणि त्यांचा डाव २६२ मध्ये आटोपला.

आगरकरनं इथं पण आठ ओव्हर मध्ये २६ रन्स देऊन 3 विकेट घेतलेल्या. त्या दिवशीचा हिरोच तो होता. पांढऱ्या कपड्यातल्या गांगुलीने सिरीजची ट्रॉफी उचलली. आगरकरला सामनावीर तर गांगुलीला मालिकावीर मिळालं. आगरकरच्या हाणामारीमुळं झिम्बाब्वे आणि कसोटीच्या कपड्यातली शेवटची वनडे म्हणून आपण… ती मॅच विसरू शकत नसतोय, अगदी फिक्स.

विशेष म्हणजे एकोणीस वर्ष झाली, गंगेतून बरंच पाणी वाहून गेलं. धोनी, कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत सारखे अनेक मोठे खेळाडू आले. पण अजूनही आगरकरचा विक्रम मोडला गेला नाही. पांढरा ड्रेस आगरकरसाठी लकी होता बहुतेक.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.