गोपीनाथ मुंडे म्हणाले होते, “अजित पवारांमुळे माझ्या पुतण्याने माझ्याविरुद्ध बंड केले.”

साल होतं २००९. लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. बीड मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे पहिल्यांदा खासदार झाले. परळी विधानसभा मतदारसंघ मोकळा झाला. आता मुंडेंनंतर कोण हा प्रश्न मुख्यतः विचारला जात होता.

एका अर्थे गोपीनाथराव मुंडेंचा वारसदार कोण हे त्या निवडणुकीत ठरणार होतं.

गोपीनाथ मुंडेंचे मोठे भाऊ पंडितराव मुंडेंचा मुलगा धनंजय कायम त्यांच्या शेजारी सावलीप्रमाणे असायचा. बोलायची स्टाईल वगैरे एकदम मुंडेसाहेबांप्रमाणे होती. युवकांच्यात त्याने संघटन ही बनवलं होतं.

गोपीनाथ रावांच्या नंतर परळी मतदारसंघातून आमदारकीची तयारी धनंजय मुंडेंनी सुरु केली होती. भाजप युवा मोर्चा अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य कार्याकाळातला अनुभव त्याच्या पाठीशी होता. त्यामुळे आपल्यालाच उमेदवारी मिळणार अशी खात्रीदेखील धनंजय मुंडेंना होती.

पण ऐनवेळी परळीतून पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. अन् इथूनच खऱ्या अर्थानं धनंजय मुंडेंच्या नाराजीला सुरूवात झाली. मागून येऊन पंकजाताई आपल्या पुढे जातात की काय याच धनंजय मुंडेना टेन्शन येऊ लागलेलं.

मात्र धनंजय काही तरी गडबड करणार हे ओळखून गोपीनाथ मुंडे यांनी आधीच त्यांची मनधरणी केली.

विधानपरिषदेवर घेतो म्हणून आश्वासन दिलं. त्यामुळे पंकजा मुंडेंचा प्रचार धनंजय मुंडेंनी जोरात केला अन् पंकजा मुंडे विक्रमी मताधिक्याने आमदार देखील झाल्या.त्यानंतर धनजंय मुडेंना विधानपरिषदेवर आमदारही करण्यात आलं,  पण त्यानंतरही धनंजय मुंडे यांचं नाराजी नाट्य सुरू होतं.

कारण विधानसभेला आपल्याला डावललं आहे आणि त्याचा सरळ अर्थ गोपीनाथरावांनी पंकजाताईलाच वारसदार निवडलंय याची बोच त्यांना जास्त होती.

त्यांनी अद्यापतरी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात उघडपणे बंडाचं हत्यार उपसलं नव्हतं. मात्र धनंजय मुंडेंची त्यांच्या काकांवरची नाराजी अजित पवारांनी हेरली होती. धनंजय मुंडेंना आपल्या पक्षात घेण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न सुरू केले.

२०११ सालाच्या डिसेंबरमध्ये परळी नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या. पंकजा मुंडे आणि यांनी धनंजय मुंडे यांनी दोघांनी मिळून भाजपचे उमेदवार ठरवले.

शिवसेनेसाठी ज्या जागा सोडल्या गेल्या होत्या. त्या जागेवरही धनजंय मुंडे यांनी भाजपचे बंडखोर उमेदवार उभा केले. निवडणुक पार पडली. नगरपालिकेच्या ३२ जागेपैकी १७ जागा जिंकून भाजप पक्षाने बहुमत सिद्ध केलं. तर राष्ट्रवादीने काँग्रेसचे ८ तर काँग्रेसचे ६ नगरसेवक निवडून आले होते.

मात्र, याच वेळेस धनजंय मुंडे यांनी बंडखोेरी केली. १७ पैंकी ११ नगरसेवक आपले आहेत असा दावा करून त्यांचा स्वतंत्र गट स्थापन केला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा याला पाठिंबा मिळाला. त्यामुळे आपल्याकडे २५ नगरसेवक असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला.

आपल्या गटाच्य़ा दिपक देशमुख यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला. तर गोपीनाथ मुंडे यांनी नगराध्यक्षपदासाठी जुगल किशोर लोहिया यांचा अर्ज दाखल केला.

धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली भाजपच्या उमेदवारांनी बंड केल्यामुळे भाजप पक्षाकडून व्हिप जारी करण्यात आला आणि भाजपच्या उमेदवारालाच मतदान करण्याची सक्ती करण्यात आली. मात्र मतदानाच्या दिवशी धनजंय मुंडे गटाच्या उमेदवारांनी व्हिप झुगारून लावला त्यामुळे दिपक देशमुख यांना २६ मतं मिळाली. तर गोपीनाथ मुंडे यांच्या उमेदवाराला अवघे ६ मतं मिळाली होती. त्यामुळे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षही धनंजय मुंडे यांच्या गटाचा झाला होता.

हा पराभव गोपीनाथ मुंडे यांच्या जिव्हारी लागला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,

“मी ज्यांना मोठे केले. तेच माझ्यावर उलटले आहे. माझ्याच माणसांनी माझ्या डोक्यात धोंडा घातला आहे”

तसंच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच आपल्या पुतण्याला फूस लावल्याचा आरोपही गोपीनाथ मुंडे यांनी त्यावेळी केला.

परळीची नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर धनंजय मुंडे आणि त्याचे वडिल पंडित अण्णा राष्ट्रवादीत जाण्याची तयारी करत होते.

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची सूत्रे अजितदादा यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे सुरेश धस यांच्या होती. त्यांनीच धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाला दाबलं जातंय हा प्रस्ताव पवारांसमोर मांडला होता.

पंडित अण्णांनाही शरद पवारांच्या या काळात भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर सुरेश धस यांच्या निगराणीत आणि अजित पवारांच्या उपस्थितीत १९ जानेवारी २०१२ साली परळी येथे गोपीनाथ मुंडे यांचे जेष्ठ बंधू पंडित अण्णा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

भाजपकडून मिळालेली आमदारकी कायम राहावी यासाठी धनंजय मुंडे या प्रवेश सोहळ्यात व्यासपीठावर गेले. पण राष्ट्रवादीत गेले नव्हते. तेव्हापासून ते केवळ तांत्रिकदृष्ट्या भाजपमध्ये होते.

मात्र, जुलै २०१३ साली त्यांनी आपल्या भाजप आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आज अजित पवारांसोबत मंत्रीपदाची शपथ घेणारेही धनंजय मुंडेच होते…

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.