अजित पवारांनी ऑफर दिली त्याच वसंत मोरेंनी मनसेची ब्ल्यू प्रिंट अंमलात आणलेली
पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांची भेट झाली. या भेटीमध्ये अजित पवारांनी वसंत मोरेंना राष्ट्रवादीमध्ये येण्याची ऑफर सुद्धा दिली, ही माहिती खरी असल्याचं स्वतः वसंत मोरेंनीच माध्यमांशी बोलतांना सांगितलं आहे.
राज्यातील भोंग्यांच्या प्रकरणानंतर वसंत मोरे आणि त्यांचा समर्थक गट मनसेमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे आता वसंत मोरे मनसेला सोडून जातील का अशी चर्चा सुरु आहे.
या प्रकरणावर माध्यमांशी बोलतांना वसंत मोरेंनी स्वतः खुलासा केला आहे.
ते म्हणाले की,
“अजित पवार राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत. अशी ऑफर देणे त्यांचा मोठेपणा आहे, पण मनसे सोडण्याचा कोणताही निर्णय मी घेतलेला नाही”
वसंत मोरेंना राष्ट्रवादीतून ऑफर आली असली तरी ते मनसेसाठी किती महत्वाचे आहेत ते त्यांनी अंमलात आणलेल्या मनसेच्या ब्ल्यू प्रिंट मधून कळते.
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवुया… हो हे शक्य आहे…
आज ही मनसेची ब्ल्यू प्रिंट म्हणून गुगल केलं तर मनसेची साईड ओपन होते. भल्ली मोठ्ठी यादी असणारी ही ब्लू प्रिंट समोर दिसते. यात महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्षेत्राची, प्रत्येक विभागाची माहिती आहे. इतिहास आणि भविष्य याची मांडणी आहे. एखादा शिकल्या, सवरलेला माणूस मग तो कोणत्याही राजकीय विचारांचा असो या ब्ल्यू प्रिंटला वाईट म्हणू शकत नाही की रद्दीत काढू शकत नाही..
मनसे नेते अनिल शिदोरे यांच्या नेतृत्वाखाली ही ब्ल्यू प्रिन्ट तयार व्हायला तब्बल सहा वर्ष लागली होती. २००८ साली राज ठाकरेंनी ब्लू प्रिन्टची घोषणा केल्यानंतर ती २०१४ साली जाहीर करण्यात आली होती.
तो काळच राज ठाकरेंच्या वाऱ्याचा होता.
नव्याने आलेल्या मल्टिमिडीया फोनवर राज ठाकरेंच्या MP3 वाजायच्या. पोरगा वाया गेला नाय माझा असो की असा महाराष्ट्र घडवायचाय असो राज यांच्या प्रत्येक वाक्यांनी रिंगटोनचं रुप घेतलेलं.
असो तर याच काळात झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत राज ठाकरेंच्या पक्षाला १३ जागांवर यश मिळालं. मनसे ही भविष्यातली पार्टी आहे याबद्दल कुणाचच दुमत नव्हतं.
कट टू २०१७ च्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणूका..
राज्यात भाजप सेनेची सत्ता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री. मनसेचं वार बऱ्यापैकी निवळलेलं. तेव्हा राज ठाकरेंची सभा होती. महापालिकेचा प्रचार चालू होता. सभेत काहीतरी दाखवायचं होतं. ते देखील राज ठाकरे स्टाईलनं.
तेव्हा राज ठाकरेंनी भर सभेत प्रोजेक्टरवर वसंत मोरेंच काम दाखवलं होतं. जाहीरपणे वसंत मोरेंच कौतुक करण्यात आलं होतं. त्याला कारण म्हणजे जी ब्ल्यू प्रिन्ट राज ठाकरेंनी मांडली होती त्याच ब्ल्यू प्रिंटवर वसंत मोरेंनी केलेलं काम..
वसंत मोरे २००७ साली पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेत निवडून आले.
त्यानंतर २०१२ व २०१७ असे सलग तीन वेळा निवडून गेले. सलग तीन वेळा मनसेच्या तिकीटावर निवडून गेलेले वसंत मोरे हे एकमेव नगरसेवक आहेत. यातील १५ वर्ष नगरसेवक, २ वर्ष स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता अशा भूमिका त्यांनी पार पाडलेल्या आहेत म्हणून वसंत मोरेंनी आज केलेला भोंग्याना विरोध हा महत्वाचा आहे.
वसंत मोरंनी ब्ल्यू प्रिन्ट कधी अंमलात आणली.
पुण्याच्या ऐतिहासिक कात्रज तलावाची हानी झाली होती. कधीकाळी संपूर्ण पुण्याला पाणी पुरवठा करणारा हा तलाव ओस पडला होता. तेव्हा तलाव पुर्नजीवित करण्याची योजना वसंत मोरेंनी मांडली. त्या तलावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला. संगीत कारंजे, ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणारा पाटलांचा वाडा, छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्राची ओळख करुन देणारे ग्रॅंथसंग्रहालय अशा गोष्टी उभारण्यात आल्या.
मनसेच्या ब्लू प्रिन्टमध्ये गेल्यानंतर प्रगतीच्या संधी असा विभाग येतो. त्यामध्ये पर्यटन हा विभाग आहे. यातलं पहिलं वाक्य आहे,
स्थानिक संस्कृती जोपासताना, स्थानिक उद्योजनांना प्रोत्साहन आणि आर्थिक पातळी उंचावण्यासाठी पर्यटन.
हे वाक्य शब्दश: या प्रोजेक्टमुळे अंमलात आले. हे काम पाहण्यासाठी राज ठाकरे पुण्यात आले व त्यांनी वसंत मोरेंच कौतुक देखील केलं.
असचं दूसरं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानाचे..
पुण्यातील कात्रज परिसरात वसंत मोरे यांच्या विकास निधीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यान बांधले आहे. या उद्यानाचे उद्घाटन सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे हस्ते २०१८ मध्ये करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले होते की, आमचे नगरसेवक, लोकप्रतिनिधी इतकी चांगली काम करतात पण त्यांना लोक मतदान करत नाही.
तिसरं वसंत मोरंचं महत्वाच काम म्हणजे फुलराणी मिनी ट्रेन..
लहान मुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली कात्रज तलावा शेजारी असणारी फुलराणी मिनी ट्रेन अनेक वर्ष बंद होती. २०१४ ला वसंत मोरे यांच्या विशेष प्रयत्नातून ही मिनिटर्न धावली. वसंत मोरे यांनी फुलराणीचे पुनर्जीवन केल्याने पुणे महापालिकेला ३० लाख रुपये वर्षाला उत्त्पन्न मिळते असे जाहीर कौतुक राज ठाकरे यांनी केले होते.
आत्ता ही झाली पर्यटन क्षेत्रातील काम. मनसेच्या ब्लू प्रिंट आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतुदी होत्या. देशभरात कोरोना बळावला तेव्हा पुण्यात वसंत मोरेंनी प्रभागाबाहेर जावून काम करण्यास सुरवात केली. पुण्यातीलच नाही तर अगदी इंदोरहून येणाऱ्या कॉलच रेकॉर्डिंग व्हायरल झालं होतं.
वसंत मोरेंनी अवघ्या तीन दिवसात ४० बेडचं कोव्हिड हॉस्पीटल उभारलं होतं.
कोरोनात मृत्यू झालेल्या लोकांचे पार्थिव घेवून जाण्यासाठी गाडी मिळत नव्हती अशा वेळी मनसे स्टाईल हिसका दाखवून वसंत मोरेंनी पालिका अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडल्या होत्या. कोरोनात जेव्हा लोकांना बेड मिळत नव्हते तेव्हा वसंत मोरे हा पर्याय लोकांपुढे होता व वसंत मोरेंनी ते काम सक्षमपणेच केलं.
गेल्या पंधरा वर्षात वसंत मोरेंनी एका नगरसेवकाने जी कामे करायची असतात ती कामे त्यांनी केली. या कामातून कधीकाळी राज ठाकरेंनी मांडलेली ब्ल्यू प्रिंट तयार होत गेली. किमान एका प्रभागापुरती का होईना पण ती प्रत्यक्षात अंमलात आणणारे नगरसेवक म्हणून वसंत मोरेंचच नाव घेतलं जाईल हे नक्की..
आता वसंत मोरेंना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिलीय. त्यावर मोरे यांनी सध्या तरी मनसे सोडून राष्ट्रवादीत जाण्याचा प्लॅन नसल्याचे सांगितले आहे. परंतु वसंत मोरे समोर काय निर्णय घेतील याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
हे ही वाच भिडू
- एका पत्रकारामुळे ८ वर्षांपूर्वी मनसे आणि भाजपची संभाव्य युती फसली होती…
- मनसेच्या खळ्ळ-खट्याक आवाजामुळं कित्येक दुकानांच्या पाट्या मराठीत झाल्या होत्या…
- मनसैनिकांची तुकडी ‘नाझी सॅल्यूट’ करुन राज ठाकरेंचं स्वागत करणार होती…