एक लाजिरवाणा पराभव आणि भारताच्या महान कर्णधाराने थेट क्रिकेटला रामराम ठोकला

आज सकाळी भारतीय टीम ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये दुसऱ्या डावात अवघ्या ३६ रन्सवर ऑल आउट झाली आणि भारतीय टीमची हा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात नीचांकी स्कोर ठरला.

पण यामुळे इतिहासातील अशाच एका नीचांकी रन्सच्या आठवणींना उजाळा मिळाला.

साल होत १९७४. त्यावर्षी भारताने केलेला इंग्लडचा तो दौरा एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हता. अजित वाडेकरच्या नेतृत्वामध्ये सुनील गावस्कर, गुंडाप्पा विश्वनाथ, भगवत चंद्रशेखर, एस वेंकटराघवन यांच्यासारखे दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये भारत त्या दौऱ्यावर गेला होता.

सलग तीन सिरीज जिंकून अजित वाडेकर यांच्या यशाचे वारू चौफेर होते. गमतीची गोष्टमध्ये त्यातील दोन इंग्लंड विरुध्दचेच होते. आणि पुन्हा १९७४ ला भारत इंग्लंडमध्ये खेळायला गेला होता. पण त्या अख्या दौऱ्यात टीमचा झालेला पराभव हा ‘लाजिरवाणा’ असाच होता.

तोच दौरा अजित वाडेकर यांचा कॅप्टन आणि खेळाडू म्हणून शेवटचा दौरा ठरला. 

६ जून १९७४ ला भारत पहिली टेस्ट मॅच खेळायला मैदानात उतरला. पण शेवटच्या दिवशी म्हणजे ११ जूनला दोन्ही डाव आणि मॅच संपताना जवळपास ११३ रन्सने भारताचा पराभव झाला.

२० जूनला दुसरी टेस्ट मॅच लॉर्ड्सवर होती. इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेतली. ओपनर डेनिस एमिस १८८ रन्स, कॅप्टन माइक डेनिस ११८ रन्स, टोनी ग्रेग १०६ रन्स अशी वैयक्तिक शतक मारत आठवणीत राहील असा ६२९ स्कोर उभा केला.

पहिल्या डावात खेळायला आलेल्या भारतीय टीमने सुनील गावस्कर, फारूक इंजिनिअर, गुंडाप्पा विश्वनाथ, एकनाथ सोलकर यांच्या बॅटिंगवर ३०२ रन्स केल्या, इंग्लंडकडे ३०० पेक्षा जास्त रन्सची आघाडी असल्यामुळे त्यांनी भारतीय टीमला फॉलो-ऑन दिला.

पण चौथ्या दिवशी दुसऱ्या डावाच्या सुरवातीपासूनच भारताच्या टीमला नजर लागल्यासारखी अवस्था झाली होती. क्रिस ओल्ड आणि ज्योफ अर्नोल्ड या दोन्ही बॉलरच्या उसळ्या मारणाऱ्या बॉलिंग समोर एकही खेळाडूचा निभाव लागला नाही.

सुनील गावस्कर ५ रन्स, फारुख इंजिनिअर ०, अजित वाडेकर ३ असे सगळे एक आकडी रन्सवर माघारी फिरले. सगळ्यात जास्त १८ रन्स केल्या होत्या मुंबईच्या एकनाथ सोलकर यांनी.

सगळी टीम ४२ रन्स वर ऑल आउट झाली. आजपर्यंतच्या इतिहासातील हा सगळ्यात नीचांकी स्कोर ठरला होता. 

त्यादिवशी क्रिस ओल्डने २१ रन्स देत ५ विकेट घेतल्या तर ज्योफ अर्नोल्डने १९ रन्स देत ४ विकेट काढल्या.

४ जुलैला तिसऱ्या टेस्ट मॅचला सुरूवात झाली. भारताने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली, १६५ वर ऑल आउट, इंग्लडने पहिल्या डावात पुन्हा ४५९ रन्स मारल्या आणि तब्ब्ल २९४ रन्सची आघाडी घेतली. भारत मात्र दुसऱ्या डावात २१६ वर ऑल आउट झाला आणि इंग्लंडने मॅच एक डाव आणि ७८ रन्सने जिंकली.

सोबतच सिरीज देखील ३ – ० ने खिशात घातली.  

भारताने त्याच दौऱ्यात अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये पहिल्यांदा वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र सर्वच्या सर्व ११ खेळाडूंना हा फॉरमॅट नवीन असल्यामुळे त्या दौऱ्यातील दोन्ही वन-डे मॅच भारताला गमवाव्या लागल्या होत्या.

या सगळ्या अपयशी दौऱ्यानंतर कॅप्टन अजित वाडेकर यांच्यावर सगळ्या स्तरातून टीका व्हायला सुरुवात झाली, आधीच्या सलग तीन यशस्वी दौऱ्यांवर पाणी पडले, खेळाडू आणि कॅप्टन यांचे संबंध ताणले गेल्याच्या बातम्या येऊ लागल्या.

हे इथवरच न थांबता अजित वाडेकर यांच्या घरावर दगडफेकीचे प्रकार झाले. त्यांच्याकडून वेस्ट झोनची कॅप्टनशिप काढून घेण्यात आली.

एकेकाळी भारताला पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये कसोटी सिरीज विजय मिळवून देणारा महान कप्तान अजित वाडेकर ला अपमानाचा सामना करावा लागला.

आणि अखेरीस भारतात परत येताच त्यांनी राष्ट्रीय टीमच्या कॅप्टनशिपचा राजीनामा देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. अशा प्रकारे इंग्लंडविरुद्धच्या त्या दौऱ्यानंतर वाडेकर यांच्या लिजेंडरी क्रिकेट कारकिर्दीला कायमचा ब्रेक मिळाला.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.