सोबर्सच्या भीतीने वाडेकरांनी सुनील गावसकरला बाथरूममध्ये लपवलं होतं.
१९७०-७१ सालचा हा किस्सा. वेस्ट इंडीज विरुद्ध भारत कसोटी सामना. सुनील गावसकर यांचा पदार्पणाचा कसोटी सामना. त्यावेळी गावसकर १२ धावांवर फलंदाजी करत होते. गावसकरांनी एक साधा ड्राइव्ह मारला कट लागून तो चेंडू गॅरी सोबर्स कडे गेला आणि सोबर्सने तो झेल सोडला. त्यानंतरच्या अजून एका सामन्यात सोबर्सने गावस्करांचा झेल सोडला तेव्हा ते ५ धावांवर फलंदाजी करत होते त्या जीवनदानाचा फायदा घेत त्यांनी शतक झळकावलं.
त्या दिवशी संध्याकाळी त्यावेळी अशी एक प्रथा होती की बॅटिंग करणारी बाजू त्यांच्या ड्रेसिंग रूममधुन काही ड्रिंक्स घेऊन फिल्डिंग टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये जात होती. गावसकर जरा वेळाने गेल्यावर लान्स केप त्यांना म्हणाला YOU ARE LUCKY यावर गावसकर गप्प राहिले. सोबर्स या विधानावर जोरात हसला आणि म्हणाला,
” NEXT TIME I AM GONE TO TOUCH YOU FOR GOOD LUCK. “
सोबर्स हा दिग्गज खेळाडू होता त्यामुळे गावसकर तिथेही काही बोलले नाही.
तोवर इतके दिवस सोबर्सचा फॉर्म काही चांगला नव्हता. मग दुसऱ्या दिवशी सोबर्स फलंदाजी साठी आला आणि आल्याबरोबर त्याने गावस्करांना टच केलं आणि तो खेळू लागला. त्याच्याविरुद्ध पायचीतची अपीलही झालं पण सुदैवाने तो वाचला. त्यावर त्याने शतक ठोकलं. चौथ्या कसोटी सामन्यातही तसचं घडलं
तो मैदानावर आला आणि गावसकरांना धुंडाळू लागला
अरे तो मुलगा कुठय ? मला त्याला टच करायचं आहे कुठय तो ?
परत त्याने गावसकरांना शोधून खरंच टच केलं आणि १७८ धावा तडकावल्या.
त्यानंतर पाचवा कसोटी सामना आला. सोबर्स हा दर सकाळी भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये अजित वाडेकरांना भेटायला यायचा आणि इतर खेळाडूंशीही बोलत बसायचा. पाचव्या कसोटी सामन्यात परत त्याने गावसकरांना टच केलं आणि १३१ धावा केल्या.
या कसोटीचं अस झालं होत की जर भारताने हा सामना वाचवला तर भारत ही सिरीज जिंकणार होता आणि ती सहा दिवसांची कसोटी होती.
शेवटच्या दिवशी गावसकर बॅटिंग करत होते. त्याच्या आदल्या दिवशी अजित वाडेकरांचा झेल पकडताना सोबेर्सला दुखापत झाली होती त्यामुळे तो फिल्डिंगला आला नव्हता आणि त्याचा आवाजही येत नव्हता. तेव्हाचे ड्रेसिंग रूम हे समोरासमोर तोंड करून असायचे त्यामुळे एकमेकांच्या गोटात चालणारे विनोद, हसणे सगळ एकमेकांना ऐकू यायचं. त्या दिवशी काहीच गप्पा ,आवाज आला नाही.
शेवटच्या दिवशी मात्र सोबर्सच्या हसण्याचा आवाज आला आणि अचानक त्याचा आवाज ऐकू आला की ‘ अजितला आणि त्याच्या खेळाडूंना हलो म्हणून येतो. ‘ तो त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांच्या ड्रेसिंगरूम मधून बाहेर पडून भारताच्या ड्रेसिंग रूमकडे यायला निघाला.
अजित वाडेकरांनी त्याचं ते वाक्य ऐकलं आणि ते गावस्करांना म्हणाले, ” ए सनी तू जा तिकडे जाऊन बस ” त्यांनी गावस्करांना पकडलं आणि बाथरूममध्ये कोंडून ठेवलं.
गावस्करांनी विचारल,
” अहो काय बोलताय तुम्ही , सोबर्सने मला टच केल्याने थोडीच त्याचं शतक होतं आणि इथ कोंडून काय होईल असंही तो मला मैदानावर हात लाविलच की…”
त्यावर वाडेकर म्हणाले ”
“नाही तो ड्रेसिंग रूममध्ये हात लावतो ते त्याला लकी आहे.”
सोबर्स गावस्करांना शोधायला भारतीय ड्रेसिंग रूममध्ये घुसला. पण वाडेकरांनी लपवून ठेवलेला सुनील त्याला सापडला नाही. सोबर्सने खेळाडूंशी जुजबी गप्पा मारल्या आणि आल्या पावली निघून गेला. खरंतर तो गावस्करांची चेष्टा करायला यायचा.
त्यानंतर विंडीजला जिंकण्यासाठी १७० धावा करायच्या होत्या आणि सामना संपायला एक तास उरला होता. सोबर्स फलंदाजीला आला आणि पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. गावसकर तेव्हा फिल्डिंग करायला उपस्थित नव्हते. ते दवाखान्यात दाताचा इलाज करण्यासाठी गेले होते. जेव्हा ते परतले तेव्हा भारताने सामना वाचवला होता आणि सिरीज जिंकली होती.
ड्रेसिंगरूममध्ये जल्लोष सुरु होता. गावस्करांना बघताच वाडेकर त्यांच्या जवळ गेले आणि म्हणाले,
” बघ मी म्हणालो होतो ना तसच झालं ,तुला लॉक केलं म्हणून सोबर्स आउट झाला. “
हा किस्सा क्रिकेट वर्तुळात चांगलाच चर्चेत राहिला होता. आजही गावसकर हा किस्सा हसून सांगतात.
हे ही वाच भिडू.
- सुनील गावस्करनां त्या खेळीमुळे सगळ्यात जास्त टोमणे सहन करावे लागले होते.
- बॉथमच्या शॉटने सुनील गावस्करांचा पाय फ्रॅक्चर झाला होता !
- पाक अंपायरने मुद्दाम आउट दिलं पण त्यातूनही गावस्करने ब्रॅडमनचा विक्रम मोडला.