…आणि तेव्हापासून अजनाळेचे ग्रामस्थ म्हणतायत, आमच्या डाळिंबाचा नादच खुळा!

गेल्या वर्षात अनेक नैसर्गिक संकटं आली ज्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागलं. अतिवृष्टी, बदलतं हवामान यामुळे पिकंच्या पीकं वाया गेली. यामध्ये डाळिंब शेतीचा ही समावेश होता. डाळिंबावर तेलकट डाग, मर रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे शेतकऱ्यांना हवालदिल झाल्याचं आपण बघितलं. मात्र अशातही  महाराष्ट्रात एक गाव असं आहे ज्याला डाळिंबाच्या शेतीने गडगंज श्रीमंत बनवलं आहे. इतकं की वर्षात डाळिंबाच्या दोन हंगामात मिळून किमान ५० कोटी रुपयांहून जास्त उलाढाल एकट्या या गावात होते. 

या गावाचं नाव म्हणजे ‘अजनाळे’.

सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील अजनाळे हे गाव. दुष्काळ जणूकाही याच्या पाचवीलाच पुजलेला. पण या गावाच्या लोकांची हिम्मत या दुष्काळापेक्षा ही जास्त मजबूत आहे. आणि त्याच जोरावर या गावाने आज स्वतःची ओळख निर्माण केली आहे. या गावातल्या शेतकऱ्यांनी डाळिंब शेतीत उतरून गावाचं रूपच बदलून टाकलं आहे. 

या गावाची भौगोलिक स्थिती जर आपण बघितली तर ती एखाद्या उलट्या तव्यासारखी आहे. त्याचमुळे पाऊस कितीही पडला तरी सुद्धा पाणी थेट पायथ्याशी जातं, नाहीतर वाहून जातं. जमिनीत मुरायचा प्रश्नच येत नाही. सहाजिकच पाणीटंचाई या गावाला नेहमीच भासत असते. शिवाय इथली जमीनसुद्धा खुप ओबडधोबड. पण अशातही गावकऱ्यांनी यशस्वी डाळिंब शेती करून दाखवली आणि यामुळे हे गाव चांगलंच श्रीमंत झालंय.

या गावातील डाळींब शेतीचा इतिहास बघितला तर १९८० च्या जवळपास शेजारच्या ‘एकतपुरा’ या गावामध्ये पहिल्यांदा डाळिंबाची लागवड केली गेली. या गावाकडे बघून १९८२ ला अजनाळेमध्ये पहिल्यांदा डाळिंबाचं रोप लावलं गेलं. डाळिंब हे बांधावरचं पीक मात्र गावातल्या तरुणांनी याचं महत्त्व ओळखलं आणि त्याची लागवड केली. सुरुवातीला लोकांनी त्यांना वेड्यात काढलं. पण याच डाळिंबातून जेव्हा चांगलं उत्पन्न मिळालं तेव्हा इतर शेतकऱ्यांनी सुद्धा हे पीक घेण्यास सुरुवात केली.

गावामध्ये पाणी टंचाई असल्यामुळे आणि हलक्‍या जमिनीमुळे अनेक शेतकरी हे पीक घ्यायला धजत नव्हते. मात्र एकमेकांची साथ लाभल्याने हिम्मत आली आणि त्यांनी गावाचा कायापालट करण्याचा निश्चय केला. नंतरच्या काळात रोजगार हमी योजनेतून डाळिंब बागांना शंभर टक्के अनुदान मिळालं, तेव्हाही बागांच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली.

एकेकाळी रोजगार हमीच्या कामावर मजूर म्हणून इथले शेतकरी जात होते. मात्र लवकरच या शेतकऱ्यांची उलाढाल हजारांत, लाखांत होत गेली. डाळिंबामुळेअजनाळे गावाला आर्थिक सुबत्ता आली. अनेकांनी आपल्या शेतातंच टुमदार असे बंगले बांधले आणि आता चार चाकी गाड्यांचे मालकही इथले शेतकरी झाले आहेत.

आता नेहमी दुष्काळात असलेलं हे गाव. डाळिंब शेतीला पाण्याची गरज होती म्हणून अजनाळे गावातल्या शेतकऱ्यांनी शेततळ्यांचा पर्याय निवडला. कोणी व्यक्तीगत तर कोणी सामूहिक शेततळी घेतली. त्यामुळे उन्हाळ्यातसुद्धा संरक्षित पाण्याची सोय झाली. गावात आता डाळिंब बागेच्या बाजूला एक तरी शेततळं आहे आणि अशी जवळपास ७०० शेततळे गावात आहेत.

महाराष्ट्रात एकाच गावात ७०० शेततळे असलेलं अजनाळे हे एकमेव गाव आहे. त्याचमुळे दुष्काळातसुद्धा इथल्या बागा फुलल्या आहेत.

या गावातील शेतकऱ्यांना डाळिंबाचा इतका लळा लागला आहे आणि इतकं ज्ञान आलं आहे की, डाळिंबाच्या वेगवेगळ्या कलम, त्यांची लागवड, त्यासाठी लागणारी खतं, औषधं, सिंचन पद्धती ते डाळिंबाची काढणी पद्धत अशा सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन त्यांना तोंडपाठ झालं आहे. एका हंगामातून एका एकरात सरासरी दहा टन उत्पादन घेतलं जातं, तर काहीजण त्याहीपेक्षा जास्त घेतात.

इतकंच नाही तर या गावातील डाळिंबाची निर्यातही केली जाते. गावातील सुमारे ५० टक्के माल निर्यातीसाठी ठेवलेला असतो आणि याचा दर दुप्पट असतो. अशा या सोलापूर जिल्ह्यातील डाळींबाला जी. आय मानांकन सुद्धा मिळालेलं आहे.

जिल्ह्यात जवळपास ७५ हजार एकरावर ही डाळिंबाची लागवड होते आणि हैदराबाद, मदुराई, दिल्ली, मुंबई यांसारख्या देशातल्या वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये हे डाळिंब व्यापारी स्वतः खरेदी करून नेतात आणि विकतात. जवळपास दोनशे सालगडी इथे काम करतात. या डाळिंब बागांमुळे अजनाळे गाव संपूर्णतः हिरवाईने नटलं आहे. शिवारात जिकडे बघाल तिकडे डाळिंबंच डाळिंब तुम्हाला दिसतील.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.