शोले पिक्चरमधल्या रहीम चाचाने ब्रिटिशांविरोधात बंड केलं अन २ वर्षाचा तुरुंगवास भोगला
बॉलीवूडमध्ये आज तागायत लाखो कलाकार होऊन गेलेले आहेत. आणि त्यातल्या जवळपास प्रत्येकाने आपली एक वेगळी छाप सोडली आहे . त्यातलंच एक नाव ए के हंगल. त्यांचे शोले पिक्चर मधले रहीम चाचा हे कॅरॅक्टर आजही आपल्या लक्षात राहिलंय. सिरिअस अभिनयाद्वारे वेगळी छाप सोडणाऱ्या ए के हंगल यांचं बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच करियरही लाजवाब होतं.
त्यातलाच एक होता ए के हंगल यांनी नौसैनिकांच्या उठावात घेतलेला त्यांनी भाग.
आज रॉयल इंडियन नेव्ही बंडाचा ७६वा वर्धापन दिन आहे. १८फेब्रुवारी १९४६ रोजी 20000 हून अधिक भारतीय नौसैनिकांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध उठाव केला होता. ३५० वर्षांपासून, स्पॅनिश आरमाराचा पराभव केल्यापासून ब्रिटीश नौसेना जगातील सर्वात मजबूत नौदल होती. दुसऱ्या महायुद्धातही ते सर्वात शक्तिशाली नौदल होते. मात्र दुसऱ्या महायुद्धांनंतर ब्रिटिश लष्कराची अवस्था डळमळीत झाली होती.आणि त्यातच 20000 हून अधिक नौसैनिकांनी रॉयल नेव्ही विरुद्ध बंड केले.
इंग्रंजांच्या सत्ता या बंडाच्या माध्यमातून बसलेल्या हादऱ्याने पार खिळखिळी झाली.
विद्यार्थी संघटना आणि डावे पक्ष या आंदोलनात हिरिरीने सहभागी झाले होते. १८ फेब्रुवारीला चालू झालेलं हे बंड तीन दिवसांत, बंड सुमारे ७५ इतर जहाजांमध्ये पसरलं. कराची, बॉम्बे, कोची, मद्रास हे बंडाचे केंद्रबिंदू होते. भारतीय खलाशांनी ब्रिटीश वरिष्ठ अधिकाऱ्यांना डाव्या हाताने सलामी देण्यास सुरुवात केली.
या विद्रोहाने ब्रिटिश साम्राज्याला जोरदार हादरा दिला आणि हा उठाव चिरडून टाकण्याशिवाय इंग्रजांकडे दुसरा पर्याय उरला नव्हता.
मुंबईच्या रस्त्यांवर नुसता ब्लडबाथ झाला होता आणि कराची येथे तर रस्त्यांवर लढाईसदृश्य परिस्तिथी झाली होती झाली. बॉम्बे स्टुडंट्स युनियन आणि सीपीआयने खलाशांना पाठिंबा देण्यासाठी जनरल स्ट्राइक पुकारला होता.
ए के हंगल देखील या संपात सहभागी होते.
१९४६ मध्ये, ३२ वर्षीय ए के हंगल यांनी कराचीतील नौदल विद्रोहाच्या समर्थनार्थ सामान्य संपाचे नेतृत्व केले होते.
ते ब्रिटिश गोळीबारातून थोडक्यात बचावले होते. १९४९ पर्यंत ते दोन वर्षे कराची तुरुंगात होते.
हंगल १९४६ मध्ये कराची कम्युनिस्ट पक्षाचे सचिव होते ज्यामुळे ब्रिटीश त्यांच्यावर आधीच नाराज होते. पुढे त्यांना पाकिस्तान सोडण्यास भाग पाडण्यात आले. १९४९ मध्ये ते मुंबईत आले. हंगल आजीवन कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर सदस्य होते.
पुढे मग मुंबईमध्ये आल्यानंतर हंगल वयाच्या ४८व्या वर्षी चित्रपट अभिनेता बनले.
ए के हंगल आपल्या पूर्ण कारकिर्दीमध्ये सामाजिक, राजकीय स्तरावरील प्रस्थापितांविरोधात आवाज उठवत राहिले. शोले पिक्चरमधला ए के हंगल यांचा इतना सन्नाटा क्यू है भाई? हा डायलॉग आजही अन्याविरुद्ध लोकं शांत बसतात तेव्हा पुन्हा सोशल मीडियावर झळकतो. बॉलिवूडमध्ये याआधी समृद्ध पिक्चर का येत होते हे ए के हंगल यांच्यासारख्या स्वतंत्र चळवळीतील सहभाग असणाऱ्या अभिनेत्यांमुळेच कळते.
हे ही वाच भिडू :
- फिल्म इंडस्ट्रीचा सगळ्यात जंटलमन माणूस पण त्याच्यावरही एकदा बॅन होण्याची वेळ आली होती
- एकटे शरद पोंक्षेच नाहीत तर नाना पाटेकरांनी देखील नथुराम गोडसेची भूमिका केली आहे
- राज कपूर आणि नर्गिसच्या लव्ह स्टोरीत थेट मोरारजी देसाईंची एंट्री झाली होती