बिहारमध्ये सम्राटने पहिल्यांदा एके ४७ आणली खरी पण पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला…

बिहारमधील क्राईम हा सिनेमांमधून आपण बरेचदा बघितलेला असेल. पण बिहारमध्ये एकापेक्षा एक सराईत गुन्हेगार होते आणि त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर टोळीयुद्धे चालायची. राजकारण आणि राजकीय नेत्यांनी हि गुन्हेगारी वापरून स्वतःची सत्ता त्या त्या काळात बळकट केली. अनेक विरोधकांचा काटा या लोकांनी काढला होता.

पण ज्या ज्या वेळी बिहारच्या गुन्हेगारी क्षेत्राचा उल्लेख येतो त्या त्या वेळी सम्राट अशोक या गुन्हेगाराचा उल्लेख आल्याशिवाय राहत नाही. बेगुसराय मध्ये जन्मलेला हा सम्राट सगळ्यात खतरनाक मानला जायचा. तो कायदे आणि पोलीस यांना क्षुल्लक मानायचा. त्याची दुष्मनी होती रेल्वेच्या ठेकेदारीवरून भांडलेल्या सुरजभान सिंग याच्याशी. 

असं म्हटलं जात कि ज्यावेळी बिहारमध्ये पोलिसांनीसुद्धा एके ४७ पाहिली नव्हती त्यावेळी गुन्हेगार सम्राट अशोक हि एके ४७ घेऊन फिरायचा. या बंदुकीच्या जोरावर त्याने अनेक हत्या घडवून आणल्या होत्या.

पोलीस त्यावेळी या मोकाट सुटलेल्या गुन्हेगारांना पकडू शकत नव्हते कारण वरिष्ठांच्या मर्जीत हे गुन्हेगार वावरत असे, त्यामुळे पोलिसांचे हात बांधलेले असे.

१९९० च्या दशकात बिहारमध्ये सगळ्यात जबरदस्त दहशत सम्राट अशोकने तयार केली होती. सुरजभान याच्याशी रेल्वेच्या ठेक्यावरून झालेल्या वादामुळे सम्राट अशोकने खलिस्तानी लॉकिअनशी हातमिळवणी केलेली होती. खलिस्तानच्या समर्थकांनी सम्राट अशोकला एके ४७ पुरवली होती.

तत्कालीन बेगुसरायचे एसपी गुप्तेश्वर पांडे यांनी सगळ्यात आधी सम्राट अशोक आणि सुरजभान सिंग यांच्या मालावर जप्ती आणली. १९९३-९४ च्या काळात बेगुसराय मध्ये ४२ चकमकी झाल्या आणि यात तितकेच लोक मरण पावले. यात स्थानिक लोकांनी पोलिसांची चांगलीच मदत केली. बिहारमध्ये एके ४७ ने पहिली हत्या हि १९९० साली झाली.

सम्राट अशोकने आपल्या पीएच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मुझफ्फरपूरच्या छाता चौकात गर्जना केली होती. छाता चौकात दिवसाढवळ्या सम्राट अशोकच्या टोळीने पोलीस स्टेशनजवळच त्यावेळचा मोठा बाहुबली असलेल्या चंद्रश्वर सिंहची हत्या केली होती. 

त्याकाळी सम्राट अशोक हा राजकीय लोकांसाठी काम करायचा. असं सांगण्यात येतं कि लालू प्रसाद यांच्या जवळचे नातेवाईक बृजबिहारी प्रसाद यांच्याशी त्याच घट्ट नातं होतं. अशोक सम्राट बेगुसराय, मुझ्झफरपूर, वैशाली, लखीसराय, शेखपुरा आणि आसपासच्या ठिकाणांवरून तो कोणता उमेदवार जिंकणार हे ठरवत असे. लोकांना धमकावून तो ठराविक पक्षाला मत द्यायला लावत असे.

पण पुढे बृजबिहारी प्रसाद यांची हत्या झाली आणि वातावरण जास्तच तापलं. सम्राट अशोकने त्याच्या ताकदीचा वापर करून सरकारला चॅलेंज करायला सुरवात केली होती. तो आता निवडणूक लढवू इच्छित होता. आनंद मोहन यांच्या पार्टीतर्फ़े त्याला तिकीट मिळणार हे सगळं निश्चित झालं होतं. पण तो नेता बनणार त्याआधीच तो पोलिसांच्या गोळीचा बळी ठरला.

सम्राट अशोकचा एन्काऊंटर केला तो बिहारचे बहादूर पोलीस ऑफिसर शशिभूषण शर्मा. या पोलीस ऑफिसरने आपल्या कारकिर्दित एकूण ३५ एन्काऊंटर केले होते. ५ मे १९९५ रोजी शशिभूषण शर्मा यांनी सम्राट अशोकचा एन्काऊंटर केला. सोनपूरमध्ये रेल्वेच्या टेंडरचं वाटप होणार होतं, पोलिसांना खबर मिळाली होती कि सम्राट अशोक तिथे येणार आहे म्हणून. 

पोलिसांना बघता क्षणीच सम्राट अशोकच्या टोळीने फायरिंग सुरु केली. पोलीस आणि गुंडांमध्ये फायरिंग सुरु झाली. पण पोलीस भारी पडत आहे असं दिसताच गुन्हेगार पळू लागले. पोलीस आणि गावकरी त्यांचा पाठलाग करू लागले. गुंडांपैकी ४ गुन्हेगार हे एका झोपडीत लपले, गावकऱ्यांनी डायरेक्ट झोपडी पेटवून दिली. या गोळीबारात गावकरीसुद्धा जखमी झाले.

पण या एन्काऊंटरमध्ये सम्राट अशोकला गोळी लागली आणि तो जागेवरच गतप्राण झाला. त्याच्याकडून अनेक गोळ्या आणि बंदुका जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी हि मोठी कामगिरी मानली. सम्राट अशोकच वर्चस्व पोलिसांनी एका गोळीतच संपवलं होतं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.