अकबराने देवाची भाषा शोधण्याच्या वेडापायी नवजात बाळांवर नराधम प्रयोग केला होता

मुघलांची सल्तनत देशभर पसरवणारा बादशाह म्हणजे सम्राट अकबर. त्याचा इतिहास वाचला तर आपल्या लक्षात येते की तो भारतावर राज्य केलेल्या इतर सुलतानामध्ये त्याला न्यायी समजलं जातं. त्यानेच हिंदूंवर जुलूम करणारा जिझिया कर रद्द केला. धार्मिक चर्चा घडवून आणल्या, भारतीय कलांना उत्तेजन दिले. पर्शियन साहित्य आणि संस्कृत यांचा मिलाफ घडवून आणला. त्याचा नवरत्नांचा दरबार जगभरात प्रसिद्ध आहे.

कोणी काहीही म्हणो अकबर बादशाहने प्रचंड लोकप्रियता कमावली होती. आजही अकबराच्या गुणग्राहकतेचं त्याच्या न्यायीपणाचं कोडकौतुक इतिहासकारांमध्ये देखील चालत असतं . मात्र याच अकबर बादशाहच्या व्यक्तिमत्वाची काळी बाजू अनेकांना ठाऊक नसते.

अकबर बादशाहने आपल्या प्रयोगासाठी नवजात अर्भकांना अनेक वर्षे कोंडून ठेवलं होतं.

असं म्हणतात की अकबर बादशाह स्वतःला भगवान समजू लागला होता. दरबारातील मोठमोठ्या विद्वानांसोबत गप्पा हणणे त्याला आवडायचं. यातूनच त्याच्या डोक्यात वेगवगेळ्या कल्पना निर्माण व्हायच्या. जे आपल्याला सुचलं ते खरं करायची त्याला सवय लागली होती. एवढा मोठा नवरत्नांचा दरबार, मात्र तो देखील गप्प बसायचा.

एकदा असच त्याच्या दरबारी मंडळींच्या वाद सुरु होता कि जर भगवान एक असेल तर त्याची मूळ भाषा कोणती? हिंदू ब्राम्हण विद्वान होते ते म्हणत होते की संस्कृत ही जगातली पहिली भाषा आहे. तर मुस्लिम दरबारी म्हणत होते की कुराण शरीफ ज्या भाषेत लिहिलंय ती अरबी भाषा हीच देवाची भाषा आहे.

स्वतः अकबर बादशाह निरक्षर होता. त्याला दोन्ही भाषा लिहिता वाचता येत नव्हत्या. पण डोक भरपूर चालायचं. असच बादशाहच्या मनात आलं की भाषेचा उगम कसा झाला हे शोधायचं. आधी कुठली भाषा तयार झाली अरबी, संस्कृत की युरोपियन ?

आता आले बादशहाच्या मनात तर त्याला कोण काय म्हणा !

त्याने आपल्या सेवकांना आदेश दिले. आग्रा शहरात नुकताच जन्मलेली २० हिंदू मुसलमान महिलांची बाळे गोळा करण्यात आली. त्यांच्या घरच्यांना भरमसाठ पैसे देण्यात आले. बाळांच्या आयांनी आकांत केला मात्र अकबर बादशाहच्या दगडी काळजाला पाझर फुटला नाही.

कोणालाच माहित नव्हतं की अकबर बादशहा या लहान बाळाचं काय करणार आहे.

अकबराने त्या बाळांना त्यांच्या आयांपासून दूर एका महालात ठेवण्यात आलं. या महालाचं नाव होतं गुंगा महल. त्या बाळांना दूध पाजण्यासाठी काही दाया ठेवण्यात आल्या होत्या मात्र त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे या सर्व दाया कर्णबधिर होत्या.

त्या वीस बाळांच्या कानावर एकही अक्षर पडू नये त्यांना कोणताही आवाज ऐकू येऊ नये याची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व दारे खिडक्या २४ तास बंद असायची. त्या गुंगा महालात काम करणारे सेवक एक तर कर्णबधिर होते किंवा त्यांच्या कानाला व तोंडाला कापड बांधण्यात आलेलं असे.

या गुंगा महलच्या आसपासदेखील फिरकण्यास सर्वसामान्यांना मनाई होती.

ज्या गावाबाहेर हा गुंगा महल होता त्यांना पण नेहमी या वाड्यात नेमकं काय चाललं आहे याच्या बद्दल उत्सुकता असायची. तिथे कायम दिवा जळत असायचा आणि अधूनमधून जनावरांसारखे चित्रविचित्र आवाज यायचे. यापलीकडे काही नाही.

जवळपास साडे तीन वर्षे हा गुंगा महल बंद राहिला. 

१० ऑगस्ट १५८२ रोजी स्वतः शहेनशहा अकबर आपल्या दरबारी मंडळींसह गुंगा महलकडे आला. कित्येक वर्षांनी या वाड्याची दारे उघडण्यात आली. ती लहान अर्भके आता थोडी मोठी झाली होती. स्वतःच्या पायावर चालत वगैरे होती. त्यांच्या जन्मापासून पहिल्यांदाच त्या वाड्या बाहेरच्या जगाशी त्यांचा संबन्ध येत होता.

तिथल्या सेवकांच्या तोंडावर बांधलेली पट्टी सोडण्यात आली. काही जणांच्या त्या पट्टी आवळल्यामुळे गळ्याची नस दबली गेली होती.  बादशहाने त्या मुलांना सामोरे आणायचा फर्मान सोडला.

घाबरलेली मुले एकेक करून त्याच्या समोर येऊन उभी राहिली. सोबत बादशहाचे दरबारी विद्वान होते. या पैकी संस्कृत पंडिताला बादशाहने त्या मुलांशी बोलायला सांगितले. पण ती मुले काही बोलू शकला नाही. यानंतर मुल्लाला बोलायला लावलं. त्या मुलांना पर्शियन अरेबिक यातलंहि एक अक्षर सुद्धा समजलं नाही.

त्या भागातली स्थानिक ब्रज कौरवी अवधी हिंदुस्थानी या भाषा त्यांच्याशी बोलण्यात आल्या. मात्र दुर्दैव म्हणजे ती २० मुले कोणतीच भाषा बोलू शकत नव्हते. त्यांना एकच भाषा येत होती ती म्हणजे हातवाऱ्यांची भाषा. या मुलांनी आपापसात हातवाऱ्यानी बोलून भाषा डेव्हलप केली होती.

बादशहाचा लवाजमा बघून ती लहानमुले घाबरली होती. काहींनी तिथेच मलमूत्र विसर्जन केलं. एकमकांशी हात वारे करून ती भांडू लागली. त्यांचे व्यवहार प्राण्यांप्रमाणे होते. 

इतक्या लहान मुलांचं पाशवी वागणं बघून शहेनशहा अकबराच्या अंगावर काटा उभा राहिला. आपण देवाची भाषा शोधायला गेलो आणि या मुलांच्या आयुष्याशी खेळलो हे त्याच्या उशिरा का असेना लक्षात आले. निसर्गाची भाषा ही इतकी भयंकर असेल हे त्यालाही झेपत नव्हते.

बाकी शोध लागले नाहीत पण आपण भगवान नाही हा शोध मात्र अकबराला या निमित्ताने नक्की लागला.

गुंगा महालच्या दारे खिडक्या उघडण्यात आल्या. या मुलांना  त्यांच्या पालकांकडे परत पाठवून देण्याचे फर्मान अकबराने सोडले. पुढे तो वाडा पडीक राहिला. तिथून चित्रविचित्र आवाज येतात  अफवेमुळे  गावकऱ्यांना तिथे जाण्याची भीती कायमच राहिली. 

दाबेस्तान ए मजहब या पुस्तकात या प्रसंगाबद्दल सांगितलेलं आहे. या शिवाय तत्कालीन इतिहासाच्या साधनांमध्ये गुंगा महलबद्दल उल्लेख येतात. या मुलांच्या आईबापांनी त्यांना ओळखले का, त्यांना परत स्वीकारले का याची माहिती कुठे सापडत नाही.

अकबराच्या या अमानुष भाषिक प्रयोगाबद्दल आजही अनेक ठिकाणी अभ्यास केला जातो. सुप्रसिद्ध हिंदी कवी विष्णू खरे यांची गुंगा महल ही हृदयस्पर्शी कविता याच प्रयोगाबद्दल माहिती सांगते.  

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.