कधीकाळी ज्यांना घरात घेण्यास विरोध झाला, त्याच डिंपल यादव आज यादवांचा बालेकिल्ल्ला लढवतायत…

मुलायम सिंग यादव यांच्या निधनानंतर त्यांची मैनपुरीची लोकसभा सीट खाली झाली आहे. मुलायम सिंग यांच्यानंतर ही जागा कुणाला मिळेल याची जोरदार चर्चा रंगली होती. कारण ही जागा मिळवण्यासाठी यादव घराण्यातल्या सदस्यांमध्येच प्रचंड स्पर्धा लागली होती.

१९९६ पासून आतापर्यंत गेली २६ वर्ष मैनपुरी लोकसभा सीटवर समाजवादी पक्षाची सत्ता राहिली आहे.

तर ३१ वर्ष यादव घराण्यातलेच सदस्य या सीटवरून येत आहेत. यामध्ये मुलायम सिंग यादव, त्यांचे पुतणे तेज प्रताप यादव आणि धर्मेंद्र यादव यांचा समावेश आहे. जेव्हा मुलायमसिंग यादव यांचं निधन झालं तेव्हा ही सीट तेज प्रताप यादव यांना दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. सोबतच मुलायम सिंग यांचे भाऊ शिवपाल यादव आणि पुतण्या धर्मेंद्र यादव यांचं सुद्धा नाव चर्चेत होतं, 

पण अखिलेश यादव यांनी मैनपुरी लोकसभेसाठी डिंपल यादव यांच्या नावाची घोषणा केली आणि सगळ्या चर्चांवर फुल स्टॉप लावला. यामुळे डिंपल यादव यांचा मुलायम सिंग यादवांच्या जागेवरून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

आज मुलायम सिंगांच्या सुनबाई मैनपुरीतून त्यांच्या जागेवर निवडणूक लढवणार आल्या तरी, एकेकाळी मुलायम सिंगांनी जातीच्या आधारावर डिंपल आणि अखिलेशच्या लग्नाला नकार दिला होता. पण अखिलेश आणि डिंपल दोघांनीही मुलायम सिंग यांच्या विरोधाला न जुमानता लग्न केलं होतं. 

तर झालं असं की, 

मुलायम सिंग दुसऱ्यांदा यूपीचे मुख्यमंत्री झाले होते. तर त्यांचे सुपुत्र अखिलेश यादव यांनी नुकतच मैसूरच्या कॉलेजमधून इंजिनियरिंगच शिक्षण पूर्ण केलं होतं. मैसूरमधून इंजिनियरिंग पूर्ण केल्यानंतर अखिलेश पुढील शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार होते, पण त्याआधी ते घरच्यांना भेटायला लखनौला आले होते.

याच सुट्टीच्या काळात लखनौच्या कॅंटोन्मेंट परिसरात राहणाऱ्या एका मित्राच्या घरी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अखिलेश सुद्धा त्या कार्यक्रमाला गेले. तर दुसरीकडे डिंपल यांचे वडील आर्मीत कर्नल असल्यामुळे त्या सुद्धा कॅंटोन्मेंटमध्येच राहत होत्या. म्हणून त्या सुद्धा कार्यक्रमात हजर होत्या.

आता दोन मित्र सिंगल असल्यावर बाकीचे मित्र शांत बसतील असं होईल का?  

कार्यक्रमामध्ये अखिलेश आणि डिंपल  यांच्या एका कॉमन मित्राने दोघांची भेट घालून दिली. एकीकडे नुकतेच मैसूर मधून इंजिनियरिंग पूर्ण करून परतलेले २१ वर्षांचे अखिलेश आणि दुसरीकडे लखनौच्या आर्मी स्कुल मध्ये शिकणाऱ्या १७ वर्षांच्या डिंपल. मग काय सुरु झालं टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. असं म्हणत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले ते पडलेच. 

दोघेही प्रेमात पडले परंतु त्यात एक अडचण आली. अखिलेशला पुढचं शिक्षण घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जावं लागलं होतं, पण प्यार कितना भी दूर क्यों ना हो, प्यार प्यार होता है. असं म्हणत दोघेही मेसेजच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. मग काय लवकरच दोघांचा विरह दूर झाला आणि अखिलेश लखनौला परतले. 

लखनौमध्ये परतल्यानंतर अखिलेश आणि डिंपल यांच्या भेटीगाठी पुन्हा वाढायला लागल्या. यातच दोघांनी एक साथ जिने मरने च्या शपथा घेतल्या.  

दोघांचं सगळं व्यवस्थित चाललं होतं पण अखिलेश यांच्या घरची मंडळी त्यांच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती. तर अखिलेश यांचं प्रेम मात्र डिंपलवर होतं. त्यामुळे अखिलेश यांनी स्वतःची लव्हस्टोरी आजीला सांगितली. नातवाची लव्ह स्टोरी ऐकून आजी खुश झाली मात्र अखिलेश यांचे वडील प्रचंड नाराज झाले.

आता नाराजीचं कारण काय तर अखिलेश यांची जात यादव होती आणि डिंपल या जातीने राजपूत होत्या.

निव्वळ जातच वेगळी नाही तर आणखी एक समस्या या नात्यामुळे मुलायम सिंगांच्या समोर उभी ठाकली होती. ती म्हणजे डिंपल या राजपूत असण्याबरोबरच त्यांचं कुटुंब हे मुळचं उत्तरप्रदेशच्या डोंगराळ भागातलं होतं. जे आज उत्तराखंड राज्यात येतं.

त्याचं झालं असं की, १९९० च्या दशकात उत्तर प्रदेशामधल्या डोंगराळ भागांचं वेगळं उत्तराखंड राज्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलने होत होती. तेव्हा मुलायम सिंग यादव हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांनी एका आंदोलनावर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते.

मुलायमसिंगांच्या या आदेशामुळे डोंगराळ भागातले लोक त्यांच्यावर प्रचंड रागावले होते. त्यांनी मुलायम सिंग यादव यांना उत्तराखंडमध्ये प्रवेश करण्यावर बंदी घातली होती. म्हणूनच मुलायम सिंग यांच्या मनात चिंता निर्माण झाली होती की, अखिलेश आणि डिंपल यांचं लग्न झालं तर उत्तराखंडचे लोक आणखीनच चिडतील आणि निवडणुकीत याचा फटका बसेल.  

यामुळे मुलायम सिंगांनी अखिलेश आणि डिंपल यांच्या लग्नाला विरोध केला.

परंतु मुलायम सिंग जरी या लग्नाला विरोध करत असले तरी अखिलेश आणि डिंपल हे दोघेही लग्नाच्या निर्णयावर ठाम होते. मुलायम सिंगांनी अखिलेश यांचं मन परिवर्तन करण्याची जबाबदारी त्यांचा भाऊ शिवपाल यांच्यावर सोपवली होती, पण अखिलेश काकाच्या शब्दाने सुद्धा मानले नाहीत.

तर दुसरीकडे डिंपल यांच्या वडिलांनी सुद्धा या लग्नाला विरोध सुरु केला होता. कारण डिंपल यांचे वडील आर्मीत कर्नल होते तर अखिलेश यांचं परिवार राजकारणात होतं. त्यामुळे त्यांचा सुद्धा या लग्नाला विरोध होता. मात्र दोन्ही घरातून विरोध होत असतांना सुद्धा अखिलेश आणि डिंपल लग्नाच्या मुद्यावर अडून बसले होते.

अखेर ययावर तोडगा काढण्यासाठी मुलायम सिंग यादव यांनी त्यांचा मित्र सूर्यकांत धस्माना यांचा सल्ला घेण्याचं ठरवलं.

धस्माना हे मुलायम सिंग यादव यांचे मित्र होते सोबतच त्यांची डिंपल यांच्या कुटुंबासोबत सुद्धा ओळख होती. डिंपलचे वडील आणि धस्माना यांचे गाव अगदी शेजारी होते. त्यामुळे धस्माना यांनी डिंपल यांचे वडील राम चंद्र सिंग रावत यांच्याशी बोलणी सुरु केली. एकीकडे डिंपल यांचे वडील आर्मीत कर्नल होते तर मुलायम सिंग हे त्यावेळी देशाचे संरक्षण मंत्री होते.  अखेर दोघांनीही लग्नाला होकार दिला आणि अखिलेश यादव यांच्या मूळ गावी म्हणजेच सैफईला दोघांचं लग्न धूम धडाक्यात पार पडलं. 

एकेकाळी जात आणि प्रदेशाच्या मुद्द्यावरून मुलाच्या लव्हमॅरेजला विरोध करणाऱ्या मुलायम सिंग यांची लोकसभा सीट आज त्याच सुनेला मिळाली आहे. 

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.