अक्कलकोटच्या भोसले घराण्याचे महाराज थेट जर्मनी विरुद्ध लढले होते..

अक्कलकोट संस्थानचे भोसले. छत्रपती घराण्याशी नाते सांगणारं घराणं. खुद्द सातारच्या शंभूपुत्र शाहू महाराजांनी त्यांच्या मूळपुरुषाला फत्तेहसिंह महाराजांना आपलं भोसले हे आडनाव दिलं होतं. अनेक युद्धात त्यांनी छत्रपतींच्या सैन्यासोबत पराक्रम गाजवला. स्वराज्याची राजधानी रायगड सिद्दीकडून वापस जिंकण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

या फत्तेसिंह महाराजांची शौर्याची परंपरा त्यांच्या वारसदारांनी देखील चालवली.अक्कलकोट अखेर पर्यंत सातारच्या गादीशी त्यांनी इमान राखला.

१८४८ साली साताऱ्याचे राज्य खालसा झाले आणि अक्कलकोटकर ब्रिटिशांचे मांडलिक बनले. पण गादीची परंपरा पुढे चालू राहिली.

या घराण्यातील बाबासाहेब शाहजीराजे भोसले तिसरे हे निपुत्रिक वारले. वंश परंपरा चालवण्यासाठी भोसले कुळातीलच एका मुलाला दत्तक घेण्यात आले. त्यांचे नाव ठेवण्यात आले  फत्तेसिंहराव तिसरे “फत्तेसिंहराव तिसरे शहाजी राजे भोसले” असं नाव देण्यात आलं.

त्यांचा जन्म कुर्ल्यात २४ ऑगस्ट १८९४ मध्ये झाला होता. १८९६ साली वयाच्या दुसऱ्या वर्षी फत्तेसिंहराव अक्कलकोटचे महाराज बनले. फत्तेसिंहराव बालपणापासून प्रचंड हुशार होते. मैदानी खेळांमध्ये त्यांना विशेष रुची होती. आपल्या घराण्याने दिलेला रणांगणातील शौर्याचा वारसा फत्तेसिंह महाराजांच्या धमन्यांमधून देखील वाहत होता. 

हाच वारसा जपण्यासाठी त्यांनी अक्कलकोट मध्ये शस्त्रागार उभारलं.

अगदी पेशवाईच्या काळापासून ते आधुनिक बंदुकांपर्यंत निरनिराळ्या शस्त्रांचा संग्रह त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात जमवला. यात अकराशे तलवारी, दोनशेहून अधिक बंदुका, तेवीस लहानमोठ्या तोफा, बावन्न पिस्तुले; तसेच, कट्यार, गुप्ती, बिचवे, खंजीर, भाले, परशू, अंकुश, वाघनखे, बाण अशा कितीतरी शस्त्रांचा समावेश आहे . संग्रहालय मानले जाते.

akkalkot shatragar 4फत्तेसिंह महाराजांचे शिक्षण राजकोट येथील राजपुत्राच्या कॉलेजमध्ये झाले, त्यानंतर त्यांनी डेहराडून येथे लष्करी महाविद्यालयात ट्रेनिंग देखील पूर्ण केलं. कोल्हापूरच्या छत्रपतींच्या सैन्यात सेकंड लेफ्टनंटच्या दर्जाचा मान अक्कलकोट फत्तेसिंह महाराजांना मिळाला होता.

दिल्लीला जेव्हा भारताची राजधानी बनवण्यात आलं आणि पाचव्या जॉर्जचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला तेव्हा फत्तेसिंह राजे भोसले हे राजा व राणीसोबत दरबारात येणाऱ्या तुकडीत सामील होते.

अक्कलकोटच्या राज्यकर्ता म्हणून त्यांनी अगदी कमी वयात राज्यकारभारावर पकड बसवली होती. अनेक ठिकाणी रस्ते बांधले, विकासकामे सुरु केली. लोकांचे कष्ट कमी व्हावेत म्हणून त्यांनी कित्येक योजना सुरु केल्या. राजकारभारात मदत व्हावी म्हणून हायीम शालोम नावाचा एक ज्यू कारभारी देखील नेमला.

कमी वयात आपले कर्तृत्व गाजवणाऱ्या फत्तेसिंह महाराजांवर प्रजेच प्रचंड प्रेम होतंच. शिवाय दिल्लीच्या इंग्रज दरबारी देखील त्यांचं मोठं वजन होतं.

क्रिकेटसाठी जगात ओळखल्या जाणाऱ्या नवानगरच्या जामसाहिब ‘रणजी’ महाराजांच्या बहिणीशी त्यांचा विवाह धडाक्यात संपन्न झाला होता. 

जेव्हा जर्मनी आणि इंग्लंड विरुद्ध पहिल्या महायुध्दास तोंड फुटले तेव्हा भारतातून जे राजे इंग्रजांच्या वतीने लढण्यासाठी युरोप मध्ये गेले त्यात फत्तेसिंगराजेंचा समावेश होता. युद्धात सहभागी होणारे ते सर्वात तरुण राजे होते.

ब्रिटिश रॉयल आर्मीच्या नवव्या रिझर्व्ह रेजिमेंटची जबाबदारी महाराजांकडे देण्यात आली होती. इंग्लंडमध्ये ते या रेजिमेंटला जॉईन झाले. लवकरच या रेजिमेंटची रवानगी फ्रान्सला युद्धभूमीवर करण्यात आली.

सतरा अठरा वर्षाचे फत्तेसिंह महाराज जर्मनी विरुद्ध युद्धात उतरले. या युद्धात त्यांनी मोठा पराक्रम गाजवला. जवळपास दोन महिने ते युद्धक्षेत्रात होते. अखेर जखमी झाल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. 

डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे फत्तेसिंह महाराजांना भारतात परत यावे लागले पण त्यांच्या युद्धात केलेल्या पराक्रमाचा ब्रिटिश सरकारने यथोचित सन्मान केला. रणांगणात रक्त सांडण्याची अक्कलकोट भोसले घराण्याची परंपरा फत्तेसिंह महाराजांनी राखली होती.

या पहिल्या महायुद्धात वापरल्या गेलेल्या बंदुका आणि आधुनिक शस्त्रे फत्तेसिंह महाराजांनी आपल्या शस्त्रागारासाठी आणली. आजही ती अक्कलकोट येथे पहावयास मिळतात.

फत्तेसिंह महाराजांनी अक्कलकोटमध्ये लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसची प्रतिकृती उभारण्याचे स्वप्न पाहिले होते.

त्या राजवाड्याचे बांधकाम १९१० साली सुरू झाले. ते पुढे तब्बल तेरा वर्षांनी, १९२३ साली पूर्ण झाले. तो राजवाडा त्याच्या भव्यतेने दीपवून टाकतो. तो पाश्चात्य शैलीत आहे. तो अष्टकोनी, तीन मजले उंच आहे. असंख्य खोल्या, दालने, स्तंभ-कमानीच्या रचना आणि त्या साऱ्यावर चार मजली उंच घड्याळाचा मनोरा. तेथील या मातीत ते सारे चित्र अद्भुत वाटते.

वाड्याच्या दर्शनी भागावर अक्कलकोट संस्थानचे राजचिन्ह आहे आणि त्याखाली ‘सत्यमेव जयते’ ही त्यांची राजमुद्राही आहे. आपल्या देशाचे म्हणून वापरात असलेले ते बोधवाक्य कधीकाळी अक्कलकोट संस्थान होते!

अक्कलकोटचा हा कर्तबगार आणि पराक्रमी राजा दुर्दैवाने फार काळ जगला नाही.  वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी त्यांचं निधन झालं. मात्र फक्त १०० गावांच छोटंसं संस्थान असणाऱ्या या राजाने जागतिक पातळीवर आपली छाप सोडली होती हे मात्र नक्की.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.