एका मताने राजकारणात आलेल्या मोहिते पाटील घराण्याकडे ७ दशकांपासून अकलूजची सत्ता आहे

आज राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. यात आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली अकलूज ग्रामपंचायतीचा देखील समावेश होता. निकालानंतर इथे पुन्हा एकदा मोहिते पाटील घराण्याचीच सत्ता आली आहे. त्यात माढ्याचे माजी खा. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाची सरशी झाली असून त्यांनी १७ पैकी १४ जागा जिंकल्या आहेत. त्यांच्या विरोधात मोहिते पाटील घराण्याचेच धवलसिंह मोहिते पाटील यांचं पॅनल होत.

मागील जवळपास ७ दशकांपासून म्हणजे शंकरराव मोहिते पाटील यांच्या काळापासून अकलूज ग्रामपंचायतीवर मोहिते पाटील घराण्याची सत्ता कायम राहिली आहे. 

स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच काम सोलापूर जिल्ह्यात वाढवणारा आणि नेटाने पुढे नेणारा स्वातंत्र्यसैनिक म्हणजे शंकरराव मोहिते पाटील. अकलूज, माळशिरस या भागातल्या इंग्रजांच्या संपत्तीचे नुकसान करणे, स्वातंत्र्य चळवळीची माहिती देणारे पत्रके वाटणे, बुलेटिन्स वाटणे, घडामोडींची माहिती देणे अशी काम करायचे. यातूनच त्यांची संपूर्ण गावात आणि भागाला ओळख झाली होती.

शंकरराव आता पुढारी म्हणून ओळखू जाऊ लागले होते. क्रांतिसिंह नाना पाटील, वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण अशा अनेक पुढाऱ्यांचे घरी येणं-जाण होत असे. त्यातूनच त्यांच्याकडे देखील नेतृत्वगुण तयार झाला. तो हेरला मळोलीचे तुकाराम जाधव, तांबव्याचे लालासाहेब इनामदार, उघडेवाडीचे बाबासाहेब देशमुख, खंडाळीकर धर्मराज पताळे यांनी.

त्याकाळी तालुक्यातील विविध सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवणारी सुपरवायझिंग युनियन नावाची एक संस्था होती;  पण ती हवी तेवढी प्रभावी नव्हती. १९४३ साली वर उल्लेख केलेल्या मंडळींनी सुपरवायझिंग युनियनच्या अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून शंकरराव मोहिते पाटील यांच नाव निश्चित केलं. 

तेव्हा शंकररावांनी या पदासाठी तुम्ही सगळी ज्येष्ठ मंडळी असताना मी अध्यक्ष होणे बरोबर नाही, असं म्हणतं तात्काळ नकार दिला. पण तुकाराम जाधव आणि लालासाहेब इनामदार हे शंकररावांच्या उमेदवारीवर ठाम होते. त्यांनी शंकररावांचे थोरले भाऊ बाबासाहेब यांना उभं राहायला सांगावं म्हणून गळ घातली.

त्यांनी शंकररावांना अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास सांगितले.

यानंतर शंकररावांनी जावून फॉर्म भरला. पण इथून पुढं प्रचार कसा करतात, यात मुद्दे काय असतात यासाठी ते अगदीच नवखे होते. सगळी जेष्ठ मंडळी सोबत होती. प्रचार झाला. मतदान झाले. ही अध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली.

जेव्हा संपूर्ण निकाल हाती आले तेव्हा शंकरराव त्यात केवळ एका मताने निवडून आले होते.

स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग, घराण्याकडे पाटीलकी असल्याने लोकांचे प्रश्न सोडवण्यातच शंकरराव व्यस्त राहू लागले. पण घरची परस्थिती हलाखीची होती. त्यामुळे त्यांनी अकलूजजवळच्या खाजगी कारखान्यावर जावून मॅनेजरजवळ नोकरी मागितली. शंकररावांच नाव तेव्हा पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. एवढा मोठा माणूस आपल्या कारखान्यात साधी नोकरी करणार याच त्याला आश्चर्य वाटलं.

पण त्याने शंकररावाना नोकरी दिली. पण जेव्हा त्यांच्या मोठ्या भावाला हे कळाल तेव्हा त्यांना वाईट वाटलं. ते शंकररावांना म्हणाले,

“शंकरराव तुम्ही पाटील आहात. पाटलांनी स्वतःच्या घरची गरिबी दूर करण्यापेक्षा गावाची गरिबी दूर हटवावी. तुमच्याकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा आहेत.”

त्या दिवशी शंकररावांनी ठरवलं आता इथून पुढचं आयुष्य आपण समाजासाठी वाहून द्यायचं. गावच्या सरपंचपदापासून त्यांनी राजकारण आणि समाजकारणाची सुरवात केली.

त्याचवेळी राज्यभरात सहकाराच्या चळवळीचे वारं गावागावात वाहायला सुरुवात झाली होती. अकलूजमध्ये एक विविध कार्यकारी सेवा (विकास) सोसायटी स्थापन झाली होती. या सोसायटीमार्फत शेतकऱ्यांची प्रगती करणे शक्य होईल असा त्यांचा होरा होता.

त्यातून त्यांनी डोक्यात असलेल्या संकल्पना विकास सोसायटीच्या पंचांजवळ बोलून दाखवायचे पंचांनाही शंकररावांचे म्हणणं पटायचं.

त्यांच्या नवनवीन कल्पना आणि विकास तळमळ बघून २० ऑगस्ट १९४४ रोजी सोसायटीची सभा बोलविली आणि शंकररावांना संस्थेचे सभासद आणि कार्यकारी समितीचे पंच म्हणून त्यांची निवड करण्यात आली.

पंच म्हणून सहकाराच्या प्रांतात शंकररावांचे पहिले पाऊल पडले होते.

त्याच वर्षी अकलूज ग्रामपंचायतीची निवडणूक समोर येऊन ठेपली होती. शंकररावांकडे पैशाचा प्रश्न होता पण मत अमाप होती. त्याच मतांच्या जोरावर त्यांनी गावातल्या आपल्या माणसांना आणि तरुण पोरांना गोळा करून आपण निवडणुकीसाठी आपले पॅनल उभं करायचा विचार बोलून दाखवला. 

त्या पॅनलला नाव देण्यात आलं ‘प्रगती पॅनल’. त्यात बापू जैन, शिवदास कुंभार, माणिकलाल शेठ, रमणलाल व्होरा असे सगळे तरूण उमेदवार होते. शंकररावांनी आपल्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली. त्याकाळी अवघड समजल्या जाणाऱ्या वॉर्ड क्र. २ मधून त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली. त्यांना निवडणूक चिन्ह मिळालं ‘दिवा’.

त्यांनी एकूण अकरा उमेदवारांचे पॅनेल उभे केले होते. मतदानाचा दिवस उजाडला. अकलूजकरांनी जमलं तेवढे मतदान केलं. दुसऱ्या दिवशीच माळशिरसला निकाल होता. मतमोजणी सुरू झाली.

अकलूजकरांनी प्रगती पॅनेलच्या बाजूने मतदान केलं आणि अकरापैकी नऊ प्रगती पॅनेलने जिंकल्या. या विजयाचे शिल्पकार होते अर्थातच शंकरराव!

याच निवडणुकीनंतर शंकरराव मोहिते पाटील अकलूजच्या सरपंचपदी विराजमान झाले. पुढे त्यांचा वारसा विजयसिंह मोहिते पाटील, प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्याकडे आला. सध्या विजयसिंह मोहिते पाटील गटाचे शिवतेजसिंह मोहिते पाटील सरपंच होते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.