मोहिते पाटलांच्या पक्षप्रवेशासाठी यशवंतरावांनी मान्यता नसलेल्या कारखान्याची फीत कापली .

मध्यंतरी अकलूजच्या मोहिते पाटील घराण्याची तिसरी पिढी म्हणजेच रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यशवंतराव चव्हाण यांचा विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा नातू , शरद पवारांनी ज्यांना उपमुख्यमंत्री केलं त्या विजयसिंह मोहिते पाटलांचा मुलगा त्यांनी आयुष्यभर ज्या विचारसरणीविरुद्ध लढा दिला त्याच पक्षात गेला .

शंकररावांच खरं आडनाव मोहिते पाटील नव्हतं. ते मुळचे अकलूजचे माने !!  त्यांच्या आज्जीने म्हणजेच आईच्या आईने त्यांना दत्तक घेतले आणि तेव्हा पासून त्यांच आडनाव मोहिते पाटील झाले. 

गरीब शेतकरी कुटुंब. त्यांच्या घरच्यांची आपल्या पोरांना शिकवण्याची देखील ऐपत नव्हती. छोट्या शंकरला सातवीत असताना फीचे पैसे नाहीत या कारणाने मास्तरनी परीक्षेला बसू दिल नव्हत. लहानवयात ही रक्तात स्वाभिमान वाहत होता. त्यांनी मास्तरला आवेशात उत्तर दिलं,

“अशा 56 शाळा उभ्या करीन आणि अनेक गरिबांची पोरं फुकट शिकवीन. तुम्ही बसा कौरव पांडवाना शिकवत, मी एकलव्य घडवणार”

त्यादिवशी शाळा सुटली, आयुष्याच्या शाळेत टप्पेटोणपे खात शिकले. पण त्यादिवशी बोलेले शब्द खरे करून दाखवले.

स्वातंत्र्यलढ्याचा मंतरलेला काळ. गांधीजींच्या सत्याग्रहाच्या प्रभावाने शेतकरी कुटुंबातले अनेक तरूण ब्रिटीश सत्तेच्या विरुद्धच्या चळवळीत उतरले होते. ‘चरखा चला चलाके लेंगे स्वराज’ या घोषणा खेडोपाडी घुमत होत्या. यामध्ये शंकरराव सुद्धा होते. त्याकाळात त्यांना कुस्तीचा आणि तालमीचा नाद लागला होता. तिथल्या आपल्या पैलवान मित्रमंडळींना सोबत घेऊन अन्यायी सरकार विरुद्ध त्यांनी रान उठवलं .

१९४२ सालच्या भारत छोडो आंदोलनावेळी काँग्रेसच्या सर्व मुख्य नेत्यांना अटक करण्यात आली. चळवळीची पुढची दिशा समजत नव्हती. अशातच एक दिवस शंकररावाना निरोप आला, सांगली जिल्ह्यातल्या पद्माळे गावातून बोलावण आलं आहे. तिथे त्यांची भेट पुढे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेल्या वसंतदादा पाटलांशी झाली. ब्रिटीशांविरुद्धचा हा अंतिम लढा संघर्ष तीव्र केला पाहिजे आणि अत्यासाठी हातात शस्त्र घ्यावे लागले तरी हरकत नाही असा निर्णय करूनच शंकरराव अकलूजला परत आले.

वसंतदादा पाटलानी त्यांच्यासोबत जयराम कुष्टे या क्रांतिकारकाला पाठवलं होतं. त्यांनी अकलूज माळशिरसच्या तरुणांना शस्त्र चालवण्याचे, बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले. याच काळात सातारा सांगली परिसरातल्या क्रांतिकारकानी प्रतिसरकारच्या नाना पाटलांच नेतृत्व स्वीकारलं होतं. 

नाना पाटलांच्या इशाऱ्यावरून इंग्रज सरकारच्या विविध यंत्रणा नेस्तनाबूत करण्याचा चंग सर्वच कार्यकर्त्यानी बांधला. या परिसरातील टेलीफोनच्या तारा तोडण्यात आल्या. टपालपेट्या उद्धध्वस्त करण्यात आल्या. देशद्रोही लोकांवर जरब बसरवण्याचे काम या परिसरात शंकररावांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. अकलूज हे भूमिगत कार्यकर्त्यांचे आश्रयस्थान बनले.

पुढे १९४६ साली  प्रांतिक सरकारच्या निवडणुका झाल्या. कॉंग्रेसची सरकारे सत्तेत आली. प्रतिसरकारच्या क्रांतिकारकांवरचे खटले मागे घेण्यात आले. यावेळी  शंकरराव मोहिते पाटलांनी अकलूजमध्ये इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणाऱ्या आपल्या लाडक्या नाना पाटलांची मोठी सभा आयोजित करण्यात आली.  खुद्द क्रांतिसिंहानी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्यसुर्य उगवला. स्वातंत्र्यलढ्यात काम केलेल्या तरूणांकडे लोक भावी नेतृत्व म्हणून पाहू लागले.शंकरराव मोहिते पाटलांच्याजवळ देखील आपल्या मागण्या, प्रश्न घेऊन लोक नेहमी जाऊ लागले. सोलापूर जिल्ह्यातला हा भाग म्हणजे दुष्काळी प्रदेश. ब्रिटीश काळात इथल्या शेतीकडे पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले. शंकररावाच्या घरची परिस्थिती देखील हलाखीची होती. त्यांना वाटले देशाला स्वातत्र्य मिळवणे हेच आपले स्वप्न होते. ते पूर्ण झाले. आता बस झाले हे समाजकार्य. आता घरच्यासाठी देखील काही केलं पाहिजे.

अकलूजजवळ एक खाजगी कारखाना सुरु झाला होता. शंकरराव सायकलीवरून त्या कारखान्याच्या गेट वर जाऊन थडकले. मॅनेजरजवळ नोकरी मागितली. शंकररावांच नाव तेव्हा पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. एवढा मोठा माणूस आपल्या कारखान्यात साधी नोकरी करणार याच त्याला आश्चर्य वाटलं. पण त्याने शंकररावाना नोकरी दिली. पण जेव्हा त्यांच्या मोठ्या भावाला हे कळाल तेव्हा त्यांना वाईट वाटलं. ते शंकररावांना म्हणाले,

“शंकरराव तुम्ही पाटील आहात. पाटलांनी स्वतःच्या घरची गरिबी दूर करण्यापेक्षा गावाची गरिबी दूर हटवावी. तुमच्याकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा आहेत.”

त्या दिवशी शंकररावांनी ठरवलं आता इथून पुढचं आयुष्य आपण समाजासाठी वाहून द्यायचं. गावच्या सरपंचपदापासून त्यांनी राजकारण आणि समाजकारणाची सुरवात केली.

याच काळात पंढरपूरमधल्या विठोबाच्या मंदिरात साने गुरुजींचं दलितांना प्रवेश मिळावा म्हणून आमरण उपोषण सुरु होतं. युगानुयुगे जगाच्या कल्याणासाठी विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाचे दर्शन जातीपातीमुळे अडवल जात आणि त्यासाठी साने गुरुजी सारख्या संताला उपोषणाला बसावं लागत ही गोष्ट शंकररावाना खूप लागली. त्यांनीही या चळवळीत उडी घेतली. मोहिते पाटीलांनी आपल्या दलित मित्रांना घेऊन पांडुरंगाचे दर्शन घेतलं आणि साने गुरुजींनी आपलं उपोषण सोडलं.

समाजकारणात सक्रीय असणाऱ्या शंकरराव मोहिते पाटलाना एकदा स्वातंत्र्यानंतरही तुरुंगवास सहन करावं लागला होता. 

गांधी हत्ये नंतरचा काळ. सर्वत्र आक्रोश पसरला होता. नथुराम गोडसे या मराठी तरुणाने केलेल्या या कृतीच्या निषेधार्थ महाराष्ट्रात दंगल पसरली होती. या दंगलीचा वणवा अकलूजसारख्या ग्रामीण भागात येऊन पोहचला. अनेकांची घरे जाळण्यात आली. वैयक्तिक आकासापोटी कोणीतरी याचा ठपका हा वणवा विझवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शंकरराव मोहिते आणि त्यांच्या बंधूंवर ठेवला.

पुण्याच्या येरवडा जेल मध्ये त्यांची रवानगी करण्यात आली. त्यांना माफीनामा दिल तर सोडतो असं जेलरने सुचवून पाहिले. पण त्यांनी याला नकार दिला. पुढे अनेक महिन्यांनी मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्यापर्यंत हे प्रकरण जाऊन पोहचले आणि मोहिते पाटलांची सुटका झाली.

१९५२ साली भारतातल्या पहिल्या निवडणुका जाहीर झाल्या. सर्वाना वाटत होते शंकररावाना कॉंग्रेसचं विधानसभेचं तिकीट मिळेल. पण त्यांना ते मिळालं नाही. गावकऱ्यांनी त्यांना अपक्ष उभ केलं आणि कॉंग्रेस लाट असताना देखील त्यांना निवडून आणल. शंकरराव मोहिते पाटील आमदार झाले. त्याच्या पुढच्या निवडणुकीत तर ते शेतकरी कामगर पक्षाकडून आमदार झाले.

आमदार झाल्यावर आपल्या भागाचा विकास कसा करता येईल याच ध्यासान त्यांना पछाडल.  शेतकऱ्याने घामाने पिकवलेल्या मालाला दर मिळत नव्हता.. ही लुट थांबण्यासाठी काय करता येईल हा विचार त्यांच्या मनात चालला होता. शेतीचा विकास झाला तरच गावचा विकास होणार हे साध गणित त्यांच्या लक्षात आलं होतं.  याच काळात प्रवरानगर येथे विखेपाटील शेतकऱ्याचा स्वतःचा सहकारी साखर कारखाना उभारत होते. मोहिते पाटलांनी हा प्रयोग अकलूजला करायचं ठरवलं.

patil2

कारखाना उभा करण्यासाठी भागभांडवलाची गरज होती. गावोगावी हिंडून, बांधाबांधावर जाऊन त्यांनी शेतकर्याना कारखान्याच महत्व पटवल. जीवाच रान करूनही आवश्यक भागभांडवल जमा होत नव्हत. अनेकांनी त्यांना समजावून सांगितलं, तुमचा भाग दुष्काळी आहे. इथे कारखाना चालवण्यासाठी आवश्यक ऊसं मिळणार नाही. त्याला लागणार भांडवल तुमचे गरीब शेतकरी उभे करू शकणार नाहीत.

पण जिद्दी स्वभावाचे मोहिते पाटील गप्प बसणाऱ्यातले नव्हते. पावलोपावली आलेल्या असंख्य अडचणीवर मात केली. बायकोचे दागिने गहान टाकून पैसा उभा केला. सर्व अटींची पूर्तता करणारी फाईल घेऊन दिल्लीला गेले. पण शेवटच्या क्षणी त्यांची फाईल नामंजूर करण्यात आली. नवीन नियमांचा अडसर आला होता. शंकररावांवर डोंगर कोसळला. पण त्यांनी हार मानली नाही.

याकाळात त्यांनी अनेक सहकारी संस्थांची उभारणी केली. लहानपणी आपल्या शिक्षकांना दिलेल्या शब्दाप्रमाणे शाळा वसतिगृह उभारले, महाविद्यालये सुरु केली. सहकारात त्यांची व अकलूज भागाची प्रगती पूर्ण महाराष्ट्रात उठून दिसत होती.

क्रांतिसिंह नाना पाटलांचे अनेक सहकारी तेव्हा कॉंग्रेसच्या चौकटीबाहेर राहून राजकारणात काम करत होते. यशवंतराव चव्हाण जेव्हा द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांनी या आपल्या जुन्या सहकाऱ्याना परत कॉंग्रेसच्या प्रवाहात आणण्याचे ठरवले. तेव्हा सगळ्यात पहिली नजर शंकरराव मोहिते पाटलांच्यावर पडली. त्यांना कॉंग्रेसमध्ये आणण्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या.पण शंकरराव अकलूज मध्ये साखर कारखाना व्हावा यासाठी ठाम होते.

“माझ्या भागातील शेतक-यांचे पाण्याशी संबधित आणि सहकाराशी संबंधित प्रश्न सोडवा, त्यानंतर पक्षप्रवेशासंदर्भात विचार करू”

अखेर मान्यता ही न मिळालेल्या या कारखान्याच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचं निम्मित करून यशवंतरावाची अकलूज ला सभा आयोजित करण्यात आली. यशवंतराव चव्हाण सुद्धा मोठ्या मनाने या सभेला आले.

१९ नोव्हेंबर १९५९ हा तो दिवसं होता. अकलूजच्या वेशीवरच डोक्यावर शेकापची काळी टोपी घातलेल्या शंकरराव मोहिते पाटलांनी स्वागत केलं. २५१ खिलारी बैलांचा  बनवलेल्या रथावर यशवंतरावानां बसवण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरात न भूतो न भविष्यती अशी मिरवणूक काढण्यात आली.

साखर कारखान्याच्या कार्यालयाची फीत कापण्याच्या कार्यक्रमावेळी कोणीतरी यशवंतरावाना अजून मान्यता नाही याची आठवण करून दिली. तेव्हा तुमच्या मदतीवाचूनच ते आडलय हे हजरजबाबी उत्तर शंकररावांनी दिलं.

त्यानंतर सभा झाली. लाखोंची गर्दी झाली होती. त्यांच्यासाक्षीने यशवंतरावांनी शब्द दिला,

“लवकरच सहकारी कारखान्याला मान्यता देणारे धोरण बदलण्यात येईल आणि परवानगी मिळालेला राज्यातला पहिला कारखाना तुमचा असेल.”

यशवंतरावांच्या शब्दावर विश्वास ठेवून मोहिते पाटील आपल्या कार्यकर्त्यासोबत कॉंग्रेस मध्ये आले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याचा मंगलकलश यशवंतराव चव्हाणांनी मुंबईमध्ये आणला. मराठी भाषिकांचे स्वतःचे राज्य झाल्याबरोबरचं काहीच दिवसात कुस्ती पहायला गेलेल्या शंकरराव मोहितेंच्या हातात कारखाना रजिस्ट्रेशनचं पत्र पडलं.

अनेक वर्षांच्या मेहनतीला फळ आलं होतं. यशवंतरावांच्या पायी कृतज्ञता म्हणून मोहिते पाटलांनी आपल्या या पहिल्या साखर कारखान्याच नाव यशवंत सहकारी साखर कारखाना असे ठेवले.

कारखाना उभारणे, चालवणे यासाठी कोणातरी अनुभवी व्यक्तीच्या मदतीची आवश्यकता होती. तेव्हा नाव पुढे आले अप्पासाहेब पवार. महाराष्ट्रातला पहिला सहकारी कारखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रवरानगरच्या कारखाना उभारण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. त्यांची दुसरी ओळख म्हणजे महाराष्ट्रातले जेष्ठ राजकारणी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे ते थोरले बंधू. शेकापच्या काळापासून पवार बंधूंचा आणि मोहिते पाटलांचा चांगला संबंध होता.

१४ फेब्रुवारी १९६३ रोजी संरक्षणमंत्री झालेल्या यशवंतराव चव्हाणसाहेबांच्याच हस्ते कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले. अकलूजच्या फाटक्या शेतकऱ्यांचे कारखान्याचा मालक होण्याचे स्वप्न शंकरराव मोहिते पाटील या भागीरथामुळे फळाला आले. अकलूज भागात त्यांनी विकासगंगा आणली होती.

(या लेखासाठी राज्यशासन प्रकाशित महाराष्ट्राचे शिल्पकार शंकरराव मोहिते पाटील या पुस्तकाची मदत झाली. )

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.