विदर्भाला हक्काचं कृषी विद्यापीठ मिळवण्यासाठी ९ आंदोलकांना प्राणाचं बलिदान द्यावं लागलं…
मजबूत शरीरयष्टी, दणकट मनगट, हातात स्टीलचे भक्कम वजनी कडे, काळीशार दाढी, साधू बांधतात तशा जटा, पांढरे शुभ्र एकटांगी धोतर, लख्ख शुभ्र बंगाली सदरा आणि त्यावर तसेच शुभ्र उपरणं अशा अवतारातला झंझावात झपझप निघाला की भल्या भल्याना कापरं भरायची. आसंमतात ललकारी घुमायची,
वा रे शेर आया रे शेर
हा शेर म्हणजे कधी एकेकाळी लाखोंच्या सभा गाजवणारा, सत्ताधाऱ्यांना सभागृहात सळो की पळो करून सोडणारा अभ्यासू वक्ता. विदर्भाच्या प्रेरणेनं झपाटलेलं निष्ठा, समर्पण अन त्यागाचं एक वेगळचं रसायन.
विदर्भवीर जांबुवंतराव धोटे…
असं म्हणतात की गेल्या शंभर वर्षात त्यांच्या एवढं प्रेम विदर्भात कुठल्याच नेत्याला मिळालं नाही आणि त्यांच्या एवढं पोट तिडकीने कोणी विदर्भासाठी भांडलं देखील नाही. विदर्भाच्या प्रश्नासाठी विधानसभा अध्यक्षांच्या अंगावर पेपरवेट फेकून मान्य इतपत त्यांची मजल गेली होती.
त्यांचं सगळ्यात गाजलेलं आंदोलन म्हणजे विदर्भाच्या स्वतंत्र कृषी विद्यापीठाचं आंदोलन.
विदर्भाला विकासाची जाणीव जागृती करवून देणारे कृषिरत्न म्हणजे डॉ.भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख. फक्त विदर्भच नाही तर संपूर्ण भारताच्या कृषीविकास धोरणाला स्वप्रयत्नांतून दिशा देणारे असे हे कृषिमहर्षी! त्यांच्या प्रयत्नांतून भारतात १९६०मध्ये उत्तर प्रदेशात पंतनगर येथे पहिल्या कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
त्याच्या आधीच १९५९ मध्ये भारतातील पहिले खाजगी कृषी महाविद्यालय अमरावती येथे त्यांनी स्थापन केले. विदर्भाच्या शेतीविषयक गरजा लक्षात घेऊन जमीन, हवामान, भौगोलिक परिस्थिती आणि शेती पद्धती विचारात घेऊन वैदर्भीय शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘विदर्भात कृषी विद्यापीठ असावे’ हा भाऊसाहेबांना ध्यास होता.
१० एप्रिल १९६५ रोजी कृषीमहर्षी पंजाबराव देशमुख यांचं निधन झालं आणि त्यांचं कृषी विद्यापीठाचं स्वप्न अधूरच राहिलं.
त्याकाळात निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित दुष्काळामुळे राज्याला छळलं होतं. शेतकरी हवालदिल झाले होते. शेतातलं उत्पन्न प्रचंड कमी झालं होतं. याचा फटका बसून राज्यात अन्नटंचाई निर्माण झाली होती. महागाई प्रचंड वाढली, अमेरिकेतून मागवलेल्या मिलो सारख्या धान्याने जनतेला जगवणायची वेळ आली होती.
तेव्हा मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक.
वसंतराव नाईक हे शेती आणि माती वर प्रेम करणारे नेते होते. ही भीषण समस्या पाहताना ते अंतर्मुख झाले. अन्नटंचाईची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. यातीलच प्रमुख पाऊल म्हणून कृषी विज्ञानाला चालना देण्याचे कार्य त्यांनी हाती घेतलं.
त्यांच्याच पुढाकाराने १९६८ साली महाराष्ट्र शासनाने राज्यात कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. संपूर्ण राज्यभरासाठी हे एकच विद्यापीठ असणार होते. पण हे प्रस्तावित कृषी विद्यापीठ विदर्भातच व्हावे, विशेषतः डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मभूमी व कर्मभूमीत अमरावती येथे व्हावी अशी मागणी होती विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांची.
पण या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष करून राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
विदर्भातील कार्यकर्ते या निर्णयामुळे पेटून उठले. विधानसभेत जांबुवंतरावांनी जोपर्यंत विदर्भाला कृषी विद्यापीठ मिळणार नाही तोपर्यंत सभागृहात पाय ठेवणार नाही, अशी प्रतिज्ञा केली. त्यानंतर तडक अकोला गाठून त्यांनी उपोषण सुरू केले
त्यांनी उभारलेल्या या चळवळीत अमरावती जिल्ह्यातील विविध विद्यार्थी संघटना, क्रीडा मंडळे, सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी व युवावर्ग, राजकीय कार्यकर्ते व नेते यांचा सक्रिय सहभाग होता. सामान्य जनताही यात स्वयंस्फूर्तीने सहभागी झाली होती. जांबुवंतराव धोटे यांच्यासारख्या धगधगत्या निखाऱ्याच्या आंदोलनाच्या हाकेला व देऊन ही मंडळी रस्त्यावर उतरली.
सहभागी आंदोलकांनी २० ऑगस्ट रोजी अमरावती येथे उग्र निदर्शने केली. विद्यापीठ आंदोलकांना रोखण्यासाठी स्थानिक शासकीय यंत्रणेने कठोर पावले उचलली.
वरुड येथे आंदोलक विद्यार्थ्यांची सकाळी मिरवणूक निघाली. दुपारी आमदार श्री. कृष्णराव वानखडे आनंद बागेत आहेत, अशी बातमी आल्याने विद्यार्थी एका खाजगी लॉरीतून आनंद बागेकडे गेले. पोलिस त्यांच्या मागावर होते. विद्यार्थ्यांचा जमाव बस स्टॅन्डवर परत आला.
आंदोलनाने उग्र रूप घेतले. ४-५ हजार लोकांचा जमाव पांगवण्यासाठी शासकीय यंत्रणेने त्यांना समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र लोक अधिकच भडकले. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. दगडफेकीत एक पोलिस जखमी झाला. त्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला. सुरेश भडके व गजानन देवघरे या शाळकरी मुलांना या धुमश्चक्रीत गोळी लागून ते जागच्या जागीच मरण पावले.
विद्यापीठ आंदोलकांना रोखण्यासाठी झालेल्या गोळीबारात नरेंद्र देशमुख, सुरेश भडके, भिरुमल रिझुमल, सुरेश कुऱ्हे, प्रफुल्लचंद्र कोठारी, गजानन देवघरे, नेमीचंद गोपाल, सुरेश वानखडे, शेख रफिक शहीद झाले तर असंख्य विदर्भवीर जखमी झाले. कित्येकांनी तुरुंगवास भोगला.
या आंदोलनाचा परिणाम मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सरकारचा राज्यभरात एकच कृषी विद्यापीठ काढण्याचा निर्णय तत्काळ बदलला व राहुरीबरोबरच विदर्भासाठी दुसरे विद्यापीठ ताबडतोब काढण्याचा निर्णय घेतला. फक्त इतकेच नाही तर या दोन विद्यापीठांबरोबर येत्या दहा वर्षांत मराठवाडा व कोकणासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठे काढण्यात येतील असे जाहीर केले.
२० ऑक्टोबर १९६९ ला अकोला येथे कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात आले. कालांतराने या विद्यापीठाला डॉ.पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात आले. राज्यातील शेती सुधारण्यासाठी व तिच्या विकासासाठी विस्तार शिक्षण हाती घेणे आणि त्याचे मार्गदर्शन करणे विद्यापीठातील निरनिराळ्या विद्याशाखांतील विषयांच्या अध्यापनाचे एकात्मीकरण व समन्वय करणे कृषिशिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणविषयक कामांचा समन्वय करणे कमी खर्चात अधिक कार्यक्षम व एकात्मीकृत शिक्षणाची तरतूद करणे अध्यापन, संशोधन आणि विस्तार शिक्षण यांसाठी प्रयोगशाळा, ग्रंथालये, संशोधन संस्था, वस्तुसंग्रहालये, मत्स्यालये यांची स्थापना करणे ही या विद्यापीठाची उद्दीष्टे आहेत.
या विद्यापीठाच्या कक्षेत अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील महाविद्यालये येतात. दरवर्षी हजारो विद्यार्थी या विद्यापीठातुन बाहेर पडतात आणि राज्याच्या कृषिविकासाला आपले योगदान देतात .
विदर्भातील ९ शहिदांनी आपले प्राण अर्पण केले म्हणून ही महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे उभी राहिली. दरवर्षी २० ऑगस्ट रोजी पंजाबराव देशमुख विद्यापीठाच्या प्रांगणात या शहिदांच्या स्मृती जागवल्या जातात आणि शहीद दिवस पाळला जातो.
हे ही वाच भिडू.
- विदर्भ सिंहाच्या दहशतीमुळे विधानसभेत पेपरवेट ठेवायचं बंद करण्यात आलं..
- नाईक व चव्हाण या जोडीने महाराष्ट्राच्या शेतीला महाबीज दिलं
- काकांनी केलेली घोषणा पुतण्याने १५ वर्षांनी पूर्ण करून दाखवली
- राज्याचा कृषिमंत्री राजकारणातून निवृत्ती घेऊन भाषाशास्त्राच्या अभ्यासासाठी आयुष्य वाहतो..