आमदार, खासदार देणारा भारिप-बमसंचा अकोला पॅटर्न प्रकाश आंबडेकरांनी असा राबवला होता…

जास्त दूरची नाही २०१९ सालची गोष्ट आहे. भारिप-बहुजन विकास महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करण्यात येईल अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली. यावेळी त्यांनी एक गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले होते की,

मी इतिहासाला कवटाळत बसणारा नेता नाही.

हे आता सांगण्याचे कारण म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी काल शिवसेने संदर्भात एक वक्तव्य केले. आंबेडकर म्हणाले की, शिवसेनेचे हिंदुत्व वैदिक नाही, चातुर्वर्ण्य मानणारे नाही त्यामुळे आम्हाला ते मान्य आहे. तसेच शिवसेनेसोबत युती करायला सुद्धा तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होतांना दिसत आहे. युती आघाड्यांमुळे प्रकाश आंबेडकर हे नेहमी चर्चेत असतात. त्यांचा वंचितचा प्रयोगही चांगलाच गाजला होता. मात्र प्रकाश आंबेडकर यांना राजकीय महत्व मिळून दिलं ते भारिप बहुजन महासंघाच्या प्रयोगाने. हा प्रयोग नेमका काय होता? त्याला सार्वधिक यश कुठे कुठे मिळाले ते पाहुयात  

त्यापूर्वी प्रकाश आंबेडकर हे राजकारणात कसे आले ते पाहुयात 

रिपब्लिकन पक्षाची जी शकले पडली होती, फूट पडली होती ती एकत्र करायला प्रकाश आंबेडकर हे राजकारणात आले होते. डॉ. बाबासाहेब यांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष त्यांना उभा करायचा होता. तसेच दलित नेतृत्वाची पोकळी त्यांना भरून काढायची होती. 

८० च्या दशकात या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली. २७ नोव्हेंबर १९८३ मध्ये मुंबईतील वडाळा भागात समविचारी लोकांनी एका परिषदेचे आयोजन केले होते. यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष या विषयावर चर्चा करण्यात येते. यानंतर रिपब्लिकन पक्ष पुन्हा प्रवाहात आणण्यात येतो. 

पुढे गीताबाई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील नानापेठ येथे ५ मे १९८४ रोजी रिपब्लिकन पक्षाचे दोन दिवशीय अधिवेशन भरवण्यात आले होते. या अधिवेशनाला प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. या अधिवेशनात भारतीय रिपब्लिकन पक्षाची (भारिप) मुहूर्तवेढ रोवण्यात आली. 

भारिप नावाने रिपब्लिकन पक्षाची बांधणी करण्यात आली. याच मेळाव्यात प्रकाश आंबेडकर यांनी दलितांसह बहुजनांना राजकीय मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले होते. 

भारिप बांधणी झाली मात्र त्याला मुख्य प्रवाहात येण्यासाठी संधी मिळत नव्हती. प्रकाश आंबेडकर यांचे एका कार्यक्रमा निम्मित ते अकोल्याला गेले होते. तिथे त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. लंकेश्वर गुरुजी, बी.आर. सिरसाट आदी नेत्यांनी आंबेडकरांची भेट आणि अकोल्याला ‘राजकीय कर्मभूमी’ करण्यासंदर्भात चर्चा केली.  पुढे प्रकाश आंबेडकरांच्या अकोल्यात गाठी-भेटी वाढत गेल्या. 

अकोल्यात ‘भारिपच जाळ निर्माण झालं. अकोल्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये साळी, माळी, कोष्टी, कुंभार,सुतार, लोहार, न्हावी या बारा बलुतेदार या घटकांची मोट बांधली. आणि प्रस्थापितांना चांगलीच धूळ चारली. तसेच १९९० मध्ये प्रकाश आंबेडकरांची राज्यसभेवर निवड झाली होती. माजी पंतप्रधान डॉ. विश्वनाथ प्रतापसिंह यांना साथ दिल्याने आंबेडकरांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली असल्याचे सांगितले जाते.  

१९९० मध्ये अकोल्याच्या मूर्तिजापूर मतदार संघातून भारिपच्या पाठिंब्यावर बंजारा समाजातील नेते मखाराम पवार निवडणून आले होते. त्यांना त्यांनी जिल्हा स्तरावर बहुजन महासंघ या राजकीय पक्षाची उभारणी केली. यानंतर आंबेडकर आणि पवार यांनी अकोला जिल्हा बहूजन समाज महासंघ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.  

यात भारीपचे पदाधिकारी लंकेश्वर गुरुजी, सूर्यभानजी ढोमणे, हरिदास भदे,प्राचार्य सुभाष पटनायक, बी आर सिरसाट, श्रीकृष्ण वानखडे  ह्यांनी २३ ऑगस्ट १९९० ला बहूजन समाज महासंघाची स्थापना केली. 

१९९२ पासून अकोला पॅटर्न सुरुवात 

१९९२ च्या अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारिपला मोठं यश मिळालं. भारतीय रिपब्लिकन पक्ष व बहुजन समाज महासंघाचे ६० पैकी १५  जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रचंड बहुमताने निवडून आले. तर २० सदस्य फक्त १०० ते २०० मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. 

बहुजन समाज महासंघाचा एवढा जबरदस्त रेटा होता की भाजप व सेनेचे अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमधे सर्व उमेदवार पराभूत झाले, त्यापैकी अनेकांच्या अनामत रक्क्मा जप्त झाल्याची माहिती वंचित बहूजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी दिली. 

तसेच अकोला जिल्ह्याच्या १३ पंचायत समितींच्या निवडणुकीमधे १२० उमेदवारांपैकी भारतीय रिपब्लिकन पक्ष व बहुजन समाज महासंघाचे ३० उमेदवार निवडून आले होते. आणि ४८ उमेदवार  अत्यंत कमी फरकाने पराभूत झाले होते. हाच पॅटर्न पुढे अकोला पॅटर्न म्हणून ओळखला गेला.अशी माहिती पातोडे यांनी दिली. 

भारिपच्या तिकिटावर निवडून येणारे पहिले आमदार होते भीमराव केराम. 

१९९३ मध्ये नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारिपने भिमराव केराम यांना तिकीट दिले होते.  प्रस्थापित राजकीय पक्षांची मक्तेदारी मोडीत काढत केराम या आदिवासी युवकाला आंबेडकरांनी आमदार म्हणून निवडून आणलं होत. भिमराव केराम भारिपचे पहिले आमदार होते.

प्रकाश आंबेडकर या प्रवासात कार्यकर्त्यांसाठी ‘बाळासाहेब आंबेडकर’ झाले होते. पुढे २१ मार्च १९९३ ला शेगाव येथे निळू फुले, राम नगरकर यांच्या उपस्थितीत ‘भारिप’ आणि ‘बहुजन महासंघा’चं संयुक्त अधिवेशन झालं. या अधिवेशनात मखराम पवारांनी आपली संघटना ‘बहुजन महासंघ’ भारिपमध्ये विलीन केली. अन् पुढे ‘भारिपचा नामविस्तार ‘भारिप-बहजन महासंघ’ असा झाला.

भारिप बहुजन महासंघ या पक्षाची स्थापना २ जुलै १९९४ केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मधून जी फुटून बनलेल्या पक्षापैकी हा एक होता. 

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात भारिप- बहुजनच्या अनेक उमेदवारांना चांगली मते मिळाली होते. १९९५ मध्ये टर्म संपलेल्या पवारांना पक्षाने पुन्हा विधान परिषदेत पाठवले आणि राज्याच्या सत्तेत सहभागी असल्याने मखररामजी हे कॅबिनेट मंत्री झाले होते.

९९ च्या विधानसभेत  भारिप- बहुजन महासंघाचे ३ आमदार निवडून आले होते. यात अकोला जिल्ह्यातील बोरगावमंज, अकोट आणि धुळे जिल्ह्यातील साक्रीतून येथून भारिपचे उमेदवार निवडून आलेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीच्या सरकार मध्ये १९९९ ते २००४ दरम्यान मंत्रिमंडळात भारिपच्या वाट्याला दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद होते. 

१९९८ आणि १९९९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर काँग्रेसच्या पाठिंब्यावर अकोल्यातून खासदार झाले होते. 

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत भारिप- बहुजनचे अकोला जिल्ह्यातील अकोला पुर्व आणि बाळापूर मतदारसंघातून दोन आमदार निवडणून आले होते. तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बाळापुरातून एक आमदार विजयी झाले होते. 

२०१९ च्या लोकसभा निवणुकीपूर्वी भारिप-बहुजन महासंघ’ ‘वंचित बहुजन आघाडी’त विलीन भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. मात्र भारिपला जे यश मिळालं ते वंचितला मिळालं नाही. 

शिवसेने सोबत युती केली तर परत एकदा भारिप-बमसंचा प्रयोग जसा यशस्वी ठरला होता. त्यांची पुनरावृत्ती होऊ शकेल का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

हे ही वाच भिडू   

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.