तर अक्स हा मनोज वाजपेयीचा शेवटचा पिक्चर ठरला असता…

सिनेमाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान असे काही चित्रपट प्रसंग घडतात यातून कधीकधी काही अघटीत घडून कुणाच्या तरी  जीवावर बेतू शकतं तर कधी कधी अक्षरशः मृत्यू तुम्हाला चाटून निघून जातो! असाच काहीसा थरारक अनुभव अभिनेता मनोज वाजपेयी यांना आला होता. हा किस्सा आहे राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘अक्स’ (२००१) या सिनेमाच्या वेळचा. 

या सिनेमात अमिताभ बच्चन, रवीना टंडन, मनोज वाजपेयी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमाची गाणी गुलझार यांनी लिहिली होती आणि संगीत अनु मलिक यांचे होते. संगीत, अभिनय, दिग्दर्शन, चित्रीकरण या सर्वच बाबतीत सिनेमा अव्वल होता. पण एवढं सगळं असूनही सिनेमा फ्लॉप झाला. पण यातील ‘वुल्फ चेस’ चा प्रसंग अतिशय चित्तथरारक होता. काळजाचा ठोका चुकविणारा होता. 

हा प्रसंग चित्रित होतानाची डेंजर घटना मनोज वाजपेयीच्या जीवावर बेतली होती. 

सिनेमा भले ही फ्लॉप असला तरी या प्रसंगाने तो सर्वांच्या कायम लक्षात राहिला आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा ‘अक्स’ या चित्रपटाचे चित्रीकरण हंगेरीच्या बुडापेस्ट च्या जवळील एका जंगलात चालू होते. या शॉट मध्ये मनोज वाजपेयी हा काही हिंस्त्र लांडग्याच्या मागावर असतो आणि त्यांचा तो पाठलाग करत असतो. 

शॉट मध्ये हे जंगली लांडगे पळत असतात आणि त्यांच्या पाठीमागे शस्त्र घेऊन मनोज वाजपेयी धावत असतो. राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा हा पहिलाच चित्रपट होता. या शॉट साठी त्यांनी विशेष तयारी केली मल्टीपल कॅमेऱ्यामधून हा शॉट चित्रित होणार होता. तसेच ड्रोनच्या साह्याने देखील याचे चित्रीकरण होणार होते. 

या शॉट मध्ये जसे चित्रित होणार होते त्याच्या विपरीत हा शॉट घेतला जाणार होता. म्हणजे मनोज वाजपेयी ज्या श्वापदांच्या पाठीमागे पळत असतो वस्तुतः हे श्वापद  त्याच्या ट्रेनरच्या मागे पळत असतात. आणि ठराविक अंतर ठेवून त्यांच्या मागून मनोज वाजपेयी पळत असतो.

कॅमेऱ्यामध्ये ट्रेनर अर्थातच दिसत नाहीत. त्यामुळे सिंक्रोनायझेशन केल्यानंतर त्या हिंस्त्र श्वापदांच्या मागे मनोज वाजपेयी पळताना दिसत असतो. सर्व काही सेट झालेले असते. शॉट सुरू होतो. खतरनाक पाठलाग  सुरू होतो. त्या ट्रेनरच्या मागे ते हिंस्र लांडगे पळू लागतात. काही ठराविक अंतरानंतर मनोज वाजपेयी हातात शस्त्र घेऊन त्यांच्या पाठीमागे पळत असतो.

शॉट बऱ्यापैकी होत आलेला असतानाच त्यातील एक ही हिंस्त्र लांडगा सहज पाठीमागे वळून बघतो तर त्याच्या नजरेच्या टप्प्यात शस्त्र घेऊन कोणी त्याच्या मार्गावर आहे हे त्याच्या लक्षात येतं! काही समजायच्या आतच तो पलटी मारतो आणि उलट्या दिशेने पळायला लागतो!! 

आता मनोज वाजपेयीच्या दिशेने जणू मृत्यूच धावत येत असतो. लांडग्याची ती चपळ चाल खरंतर मनोज वाजपेयीला गर्भगळीत करणारी असते. पण ज्या वेळेला माणसावर खरोखर संकट येतं त्यावेळेला त्याच्यात दुप्पट हिम्मत देखील एकवटली जाते. 

मनोज वाजपेयी देखील आलेले संकट परतावून  लावण्यासाठी जोरात मागे पळू लागतो आणि आपल्या व्हॅनिटी व्हॅन दिशेने त्याची धाव सुरू होते. मृत्यू आणि त्याच्या मधे काही क्षणाचे काही फुटांचे अंतर असते. अक्षरशः जीवाच्या आकांताने तो त्याच्या व्हॅनिटीच्या दिशेने धावू लागतो. तो ट्रेनर देखील त्या लांडग्याला  आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करू लागतो. 

सर्व शूटिंग बोंबलते आणि महत्वाचं म्हणजे आता सर्वाना काळजी असते मनोज वाजपेयीच्या जीवाची!

कसतरी करून व्हॅनिटी पाशी येतो आणि त्याच्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये जाऊन आतून दार लॉक करून अक्षरशः कोसळतो. प्रचंड टेन्शन आणि थकव्याने त्याला आता भोवळ आलेली असते. पण प्राण वाचलेला असतो! तो ट्रेनर त्या हिंस्त्र श्वापदाला आपल्या आटोक्यात आणतो आणि त्याला आपल्या सोबत घेऊन जातो. सिनेमांमध्ये आपण जेव्हा हा शॉट पाहतो त्यावेळेला या शॉटच्या वेळी झालेली ही भयानक घटना आपल्याला माहिती नसते!

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी देखील प्रमुख भूमिका केली होती मनोज वाजपेयींनी खलनायक रंगवला होता अमिताभ बच्चन यांनी आपला ब्लॉगमध्ये ही आठवण लिहून ठेवली आहे. मनोज वाजपेयी याचा हा पहिलाच महत्त्वाचा सिनेमा होता आणि त्यातून त्याचा खऱ्या अर्थाने पुनर्जन्म झाला. कारण साक्षात मृत्यूच त्याचा पाठलाग करत होता पण हिमतीने त्याने त्यावर मात केली!

– भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.