वडिलांच्या रिक्षातनं सेटवर येणाऱ्या पोरानं मराठी बिग बॉस जिंकून दाखवलं

“बिग बॉस सीझन ४ चा विनर आहे, अक्षय केळकर…” 

महेश मांजरेकर यांनी काल बिग बॉस मराठी-४ च्या ग्रँड फिनालेमध्ये ही घोषणा केली आणि अक्षयला अश्रू अनावर झाले. म्हणजे बिग बॉसचं टायटल जिंकल्यावर आनंद साजरा करण्यासाठी नाचणं, उड्या मारणं असं काहीच त्याने केलं नाही. त्याचे डोळ्यातले अश्रू हे स्पष्ट दिसत होते. त्यानंतर मग त्याने महेश मांजरेकर आणि चाहत्यांचे आभार मानले.

अक्षयची ओळख ही बिग बॉस मराठीमध्ये ‘मास्टर माईंड’ अशी होती.

फिनालेमध्ये अक्षय सोबत अपुर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, किरण माने आणि राखी सावंत हे स्पर्धक होते. एक-एक एलिमिनेट झाले आणि शेवटी अपुर्वा नेमळेकर आणि अक्षय हे दोघंच उरल्यावर मांजरेकरांनी विजेता म्हणून अक्षयच्या नावाची घोषणा केली.

अक्षय हा बिग बॉसच्या घरासाठी एक परफेक्ट खेळाडू होता हे त्याच्या विजेतेपदावरून सिद्ध झालंच आहे. त्याची निर्णयक्षमता, खिलाडू वृत्ती आणि स्पष्टपणे मत मांडण्याची सवय हे गुण त्याला बिग बॉसच्या घरात फार कामी आल्याचं दिसलं.

अक्षयचे वडील हे सर्वसामान्य रिक्षा ड्रायव्हर आहेत.

अक्षय आता एक स्टार म्हणून जगासमोर आला असला किंवा प्रसिद्धीच्या झगमगाटात न्हाऊन निघत असला तरी, त्याचं आयुष्य सुरूवातीपासून इतकं ग्लॅमरस नव्हतं. अक्षयची घरची आर्थिक परिस्थिती तशी फार चांगली नव्हती. त्याचे वडील हे एक सामान्य रिक्षा चालक आहेत.

विशेष म्हणजे तो बिग बॉस मराठीमध्ये एंटर होतेवेळी सुद्धा वडिलांच्या रिक्षात बसूनच आला होता.

अक्षय हा परिवारावर खूप प्रेम करणारा आणि परिवाराबाबतीत हळवा आहे. हे लक्षात आलं ते बिग बॉसच्या घरातच. एकदा परिवाराविषयी बोलताना अक्षय अगदी हळवा झाला होता. त्यावेळी तो म्हणाला,

“माझे आई-वडील ९वी पास आहेत. वडील रिक्षा चालवून घर चालवतात. त्यांनी मुलांना म्हणजे आम्हाला खूप फ्रीडम दिलंय… आणि त्यामुळे आम्ही आज चांगल्या मार्गावर आहोत. सुशिक्षित असून अशिक्षीत असण्यापेक्षा अशिक्षीत असून सुशिक्षीत असणं कधीही बरं.”

अक्षयला खरंतर आर्ट डिरेक्टर बनायचं होतं.

त्याने कमर्शियल आर्ट्सचं शिक्षण वांद्रे इथल्या एस.एल. रहेजा कॉलेजमधून घेतलं. त्याला आर्ट डिरेक्टर म्हणून काम करायचं होतं. त्यासाठीच त्याने कमर्शियल आर्ट्सचं शिक्षण घ्यायचा निर्णय घेतला होता. त्याने त्या दृष्टीकोनातून कामही सुरू केलं होतं.

अक्षयने सुरूवातीला असिस्टंट आर्ट डिरेक्टर म्हणून काम सुरू केलं होतं.

अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

२०१३ मध्ये अक्षयने ‘बे दुने दहा’ या मालिकेतून अ‍ॅक्टींग क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर कमला या मालिकेत त्यांने काम केलं. या मालिकेतली त्याटी उदय देशपांडे नावाची भुमिका प्रचंड गाजली होती. आणि मग तो चित्रपटसृष्टीत आला. ‘प्रेमसाथी’ या सिनेमातून त्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. त्याला सिनेसृष्टीत ओळख मिळाली ती संगीतकार-दिग्दर्शक अवधूत गुप्तेच्या कान्हा या चित्रपटात त्याने साकारलेल्या भुमिकेनंतर.

कॉलेज कॅफे या सिनेमाच मग तो मुख्य भुमिकेत दिसला.

टकाटक-२ या सिनेमातही मग अक्षय केळकर पाहायला मिळाला. हे तर झालं अभिनय क्षेत्रातलं मराठी भाषेतलं काम. याशिवाय, अक्षयने हिंदी मालिकांमध्येही काम केलंय. ‘भाकरवडी’ , ‘निमा डेंझोंग्पा’ या हिंदी मालिकांमध्ये त्याने काम केलंय.

त्यानंतर आता तो मराठी बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आता विजेतेपद पटकावल्यानंतर तर त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होतोय. याशिवाय त्याला मोठ मोठ्या किंमतीची बक्षिसंही मिळाली आहेत.

अक्षयला विजेता म्हणून नेमकी काय बक्षिसं मिळाली?

सर्वात आधी तर सीझनचं विजेतेपद मिळवलं म्हणून त्याला १५ लाख ५५ हजार रुपये बक्षीस  म्हणून मिळाले. त्याशिवाय, कॅप्टन ऑफ द सीझनचा विशेष अवॉर्ड मिळाल्यामुळे  त्याला फिनोलेक्स पाईपकडून ५ लाख रुपयांचा चेकही मिळाला. या रकमेशिवाय त्यााला पीएनजी ज्वेलर्सकडून तब्बल १० लाख रुपये किंमतीचा सोन्याचा हारही मिळालाय.

या सगळ्या बक्षिसांशिवाय एक गोष्ट आहे ती म्हणजे, आता बिग बॉस जिंकल्यानंतर त्याची फेस व्हॅल्यू वाढल्यामुळे त्याला लवकरच चांगले चित्रपट, चांगल्या मालिकांच्या ऑफर्सही येतील.

या सगळ्या यशानंतर अक्षय केळकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानले आहेत. या सगळ्या यशाचं श्रेय अक्षय त्याच्या चाहत्यांना, आई वडिलांनी दाखवलेल्या विश्वासाला आणि स्वत:च्या मेहनतीला देतो.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.