अक्षय कुमारने त्याला मिळालेला अवार्ड अमीर खानला दिला..

गोष्ट आहे २००९ सालची, हा किस्सा वाचल्यानंतर आजच्या पेक्षा तेव्हाचं वातावरण तसं बरच होतं म्हणावं लागेल.

किस्सा झाला होता तो स्टार स्क्रीन अवॉर्ड्सच्या दरम्यान…

२००८ सालच्या सिनेमाबाबत हा समारोह आयोजित करण्यात आला होता. २००८ सालचा सर्वात सुपर-डुपर हिट पिक्चर होता तो गजनी. गजनी हा भारतीय इतिहासातला पहिला पिक्चर होता ज्यामुळे १०० करोड क्लबची स्थापना झालेली. १०० कोटी हा नवा क्लब सिनेमाच्या पॉप्युलर असण्याचा निकष झाला होता.

याच वेळी दूसरा एक पिक्चर देखील आलेला. अक्षय कुमारचा सिंग इज किंग. सिंग इज किंग पण हिट सिनेमा ठरलेला. सिंग इज किंग या सिनेमाने देखील बॉक्स ऑफिसवर ६७ कोटींच कलेक्शन केलेलं. वर्षाच्या शेवटी आलेल्या रब ने बना दी जोडी या सिनेमाने ८४ कोटी तर रेस ने ६० कोटींच कलेक्शन केलेलं. जाने तू या जाने ना या मोठी स्टारकास्ट नसणाऱ्या सिनेमाने तेव्हा ५५ कोटी छापले होते.

हे सगळं सांगायचं मुख्य कारण म्हणजे खरतर सिनेमाची नावे सांगून तुम्हाला नॉस्टेल्जिक करणं. रेस असो की गजनी. मार्केटमध्ये असणाऱ्या नोकिया ६२३३ सारख्या फोनवर गाणी ऐकण्याची मज्जा वेगळी असायची.

असो तर २००८ चा पैश्याने सर्वात हिट पिक्चर होता तो गजनी. दूसऱ्या क्रमांकावर सिंग इज किंग होता.

साहजिक स्टार अवॉर्ड्स फंक्शनमध्ये या दोन्ही सिनेमांना भरपूर अवार्ड्स मिळतील असा अंदाज बांधण्यात आला होता.

वेगवेगळे अवार्ड्स जाहीर झाले. बेस्ट ॲक्टर कोण असणार याबाबत सर्वांची उत्सुकता ताणली गेली होती. स्टार स्क्रीन अवार्ड्स बेस्ट ॲक्टरचं पॉप्युलर चॉईस हा अवार्ड्सचं नाव घोषीत करण्यात आलं आणि तो मिळाला तो अक्षयकुमारला…

अक्षय कुमारला बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड सिंग इज किंग साठी मिळाला होता. अनेकांना आमिर खानचं नाव अपेक्षित होतं. अमिरने गजनीच्या भूमिकेसाठी परिश्रम तर घेतलेच होते पण तसाच रिझल्ट त्याने या सिनेमातून दाखवला होता.

पण नाव मात्र अक्षयचं घोषीत झालं..

अक्षय अवार्ड्स घेण्यासाठी स्टेजवर गेला. त्याने हा अवार्ड हातात घेतला आणि म्हणाला,

मी एका हातात माझं स्वप्न पकडलं आणि दूसऱ्या हातात वडीलांच प्रेम पकडलं आहे. पण मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो काही दिवसांपूर्वी मी एक फिल्म पाहीली होती, गजनी. आणि विश्वास ठेवा ही फिल्म पाहून मी हैराण झालेलो. काही दिवसांनंतर मी लंडनवरून येत होतो तेव्हा माझ्या सिंग इज किंग आणि गजनीची मी तुलना केली. पून्हा एकदा सिंग इज किंग पाहून माझ्या आणि अमीरच्या कामाची तुलना केली.

तेव्हाच माझ्या लक्षात आलं की यावेळीचा बेस्ट ॲक्टर अवार्ड्स मला नाही तर अमीरला जातो.  अमिर खानने या सिनेमात खूप जबरदस्त काम केलं आहे.  ती या माणसाचा सन्मान हिरावून घेवू शकत नाही. मला माहिती आहे की असा सन्मान मला परत मिळेल की नाही पण मी हा अवार्ड् माझ्याकडे ठेवू शकणार नाही. माझ्यासाठी मत देणाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. तुम्हाला दुखवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. देवाची इच्छा असेल तर मी हा अवार्ड मी पुन्हा जिंकू शकतो. पण या वर्षाच्या या अवार्ड वर अमीरचाच अधिकार आहे.

त्यानंतर अक्षयने हा अवार्ड अमीरला देवू केला. साहजिकच अमीर खान अशा अवॉर्ड्स सोहळ्यांना जात नसल्याने तो त्यावेळी तिथे उपस्थित नव्हता.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.