आणि अक्षय कुमार नवस फेडायला बारामतीला आला.

आता तुम्ही म्हणाल भिडू काहीही फेकतोय. कॅनडाचा पासपोर्ट धारक नवस फेडायला बारामतीला कशाला येईल? तर चेष्टा नाही हे खर आहे. १५ जुलै २०१० चा कोणताही पेपर काढून बघा. त्यात सगळीकडे हीच बातमी होती.

पण अक्षय कुमार बारामतीला का आला होता मॅटर तुम्हाला व्यवस्थित सांगायला पाहिजे. नाही तर तुम्ही राजकीय अर्थ काढत बसणार.

तर झालं अस होत की २००९ साली नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात प्रियदर्शन आपल्या नव्या खट्टा मिठा सिनेमाच फलटणमध्ये शुटींग करत होता.

सिनेमाचा हिरो म्हणून प्रियदर्शनने आपल्या लाडक्या अक्षय कुमारला घेतलेलं. हेराफेरी वेळी त्यांचे सूर चांगलेच जुळलेले. तर हिरोईन म्हणून हिंदीत नवख्या असणाऱ्या त्रिशाला घेतलेल.

अक्षय कुमारने या सिनेमात रोड कॉन्ट्रॅक्टर सचिन टिचूकलेचा रोल केला होता. (अभिजित बिचुकले नाही) त्याचा एक डायलॉग ट्रेलर वेळी फेमस झाला होता,

“सचिन टिचूकले, पता मुधोजी मनमोहन राजवाडा, राम मंदिर, पवार गली नंबर ४, तालुका फलटण, जिल्हा सातारा, पिन कोड 415523 “

सजदे किये है लाखो या गाण्यासाठी तर राम मंदिराला लाखो दिव्यांनी उजळवून टाकण्यात आले होते.

संपूर्ण सिनेमाचा क्रु बिना चप्पलचं शुटींग करत होता. तर मंदिर प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे सर्वांनी भारतीय सभ्यतेला धरून कपडे घातले होते. फलटण शहर या सिनेमाच्या निमित्ताने नव्या रंगात रंगलेलं दिसून येत होतं. अबालवृद्ध प्रत्येकाला आपल्या गावात अक्षय कुमारच्या सिनेमाच शुटींग होतंय याच कौतुक होतं.

अक्षय कुमार या सिनेमाचा प्रोड्युसर देखील होता. खट्टा मिठाच मुख्य शुटींग फलटणच्या राजवाड्यामध्ये होत पण आउट डोअर लोकेशन शुटींग फलटण तालुका, बारामती तालुकामध्ये चाललेलं. तसंही बारामती फलटण पासून जास्त दूर नाही.

आमचे फलटणचे भिडू ऋषी आढाव यांनी सांगितलेल्यानुसार

अक्षय कुमार या काळात राहायलादेखील बारामतीमध्येच होता. तिथल्या सिटी इन हॉटेलमधून तो रोज शुटींगला यायचा.

तर बातमीत अस म्हटल होत की याकाळात तो नेहमी प्रमाणे पहाटे लवकर उठायचा आणि गायब व्हायचा ते थेट शुटींगच्या वेळी उगवायचा. सेटवरच्या कोणालाच ठाऊक नसायचा की तो एवढ्या पहाटे जातो कुठे. नंतर शोध घेतल्यावर कळाल की तो शहरापासून दूर कुठल्यातरी एका मंदिरात जातोय.

बारामती तालुक्यामध्ये शुटींग करत असताना त्याला हे छोटसं मंदिर दिसलेलं. धार्मिक वृत्तीच्या अक्षय कुमारला त्या शहरी वातावरणापासून दूर असलेल शांत पुरातन मंदिर खूप आवडल. रोज पूजा करायला तो तिकडे जाऊ लागला आणि फॅन्स गर्दी होऊ नये म्हणून ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली.

पुढे शुटींग संपल. विपुल शहाच्या अॅक्शन रिप्ले या सिनेमाच्या शुटींगसाठी अक्षय कुमार मनालीला गेला.

पण जेव्हा खट्टा मिठा रिलीज होणार होता त्याच्या आधी एक आठवडा अक्षय कुमार खास चार्टर विमानाने मनालीहून पुण्याला आला व तिथून थेट बारामतीला गेला. सगळीकडे उत्सुकता पसरली होती,

मग नंतर कळाले की अक्षय कुमारने आपल्या लाडक्या मंदिरात सिनेमासाठी नवस केला होता व रिलीज आधी नवस फेडण्यासाठी बारामतीला आला होता.

आता हे मंदिर कोणत, कोणत्या देवाचं? ते बारामती तालुक्यात येत की फलटण तालुक्यात? या सगळ्या गोष्टी अक्षय कुमार ने गुप्तच ठेवल्या. फलटणच्या लोकांनाही ते ठाऊक नाही. आमचे भिडू ऋषी आढाव यांनी सांगितलं,

“अक्षय कुमार नवस फेडायला कोणत्या मंदिरात गेला होता ठाऊक नाही पण सिनेमा रिलीज होण्यापूर्वी त्याच्या प्रमोशनचा मोठा कार्यक्रम राम मंदिरात घेण्यात आला होता हे नक्की आठवतंय.”

हे ही वाच भिडू.