३२ वर्षांपूर्वी फोटोशूटवेळी अक्षय कुमारला हाकलून लावलं होतं त्याच बंगल्याचा तो आता मालक आहे.

भारतीय फिल्मइंडस्ट्री मध्ये दोन प्रकारचे कलाकार आहेत. एक म्हणजे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले घराणेशाहीचे वारसदार. त्यांच्याकडे टॅलेंट असो अथवा नसो त्यांना बड्या सिनेमात संधी मिळते.

पण दुसऱ्या साईडला असतात आऊटसाईडर ज्यांना खूप मेहनत घेऊन अवघ आयुष्य खर्च कराव लागतं तरी त्यांच्या टॅलेंटला न्याय देईल असे रोल दिले जात नाहीत.

अस असतानाही काही कलाकार असे असतात जे इंडस्ट्रीच्या बाहेरून येतात, स्ट्रगल करून स्वतःची संधी स्वतः तयार करतात आणि बॉलिवूडवर राज्य देखील करतात. यात प्रमुख नाव येतं,

सबसे बडा खिलाडी अक्षय कुमार याचं.

अक्षयचं खरं नाव राजीव भाटिया. त्याचे वडील आर्मीमध्ये सोल्जर होते. अक्षयची आई सुद्धा पंजाबी. त्याच बालपण दिल्लीच्या चांदणी चौकमध्ये गेलं.

वडिलांच्या आर्मीमधल्या निवृत्तीनंतर अक्षयचं कुटुंब मुंबईला आलं. इथल्या सायन कोळीवाडामधल्या १०० रुपये भाडे असलेल्या छोट्या घरात राहू लागले.

अक्षयच्या घरची परिस्थिती इतकी उत्तम नव्हती पण त्याच्या वडिलांची जिद्द होती की,

आपल्या मुलाला मुंबईच्या बेस्ट शाळेत शिकवायचं.

डॉनबॉस्को शाळेत मुलाखतीला गेलेल्या अक्षयने ऑफिस मध्ये पडलेला कागद उचलून कचऱ्याच्या डब्ब्यात फेकला आणि ते पाहून तिथल्या प्रिन्सिपलनी मुलाखत न घेताच त्याला ऍडमिशन देऊन टाकलं.

यामुळे अक्षयचं शिक्षण अगदी उच्चभ्रु मुलांच्या शाळेत झालं.

पण अक्षयला अगदी लहानपणापासून अभ्यासापेक्षा खेळाची आणि व्यायामाची आवड होती. त्याचे वडील पण एकेकाळी पहिलवानी केलेले होते त्यामुळे त्यांनीं त्याला कधी अडवलं नाही.

तो अकरावीत असताना त्याला कराटे शिकण्यासाठी थेट बँकॉकला जाण्यास परवानगी दिली. तिथे रेस्टॉरंटमध्ये कुकची नोकरी करत अक्षयने थाई बॉक्सिंग आणि मार्शल आर्ट शिकून घेतलं.

भारतात परतल्यावर त्याला पोट भरण्यासाठी नोकरी व्यवसाय करावा लागणार होता. मार्शल आर्टने पोट भरणे इथे तरी शक्य नव्हतं.

अक्षयने आर्टिफिशयल ज्वेलरीचा बिझनेस सुरू केला.

कोलकात्याहुन ज्वेलरी विकत घेऊन ती मुंबईत २०% नफ्याचे तो विकायचा. यातून महिन्याला ५००० रुपये मिळायचे.

असच एकदा मुंबईत त्याला कोणी तरी पाहिलं आणि एका फर्निचर स्टोअरच्या जाहिरातीत मॉडेलिंगची ऑफर दिली.

फक्त तिथे ठेवलेल्या फर्निचर वर बसायचं आणि फोटोग्राफर फोटो काढणार एवढ्यासाठी एका दिवसाचे २१ हजार रुपये मिळाले.

तेव्हा अक्षयने ठरवलं की आपण आता मॉडेल बनायचं.

इथून त्याचा स्ट्रगल सुरू झाला. मॉडेल बनायचं तर स्वतःच्या फोटोंचा पोर्टफोलिओ पाहिजे आणि त्यासाठी बरेच पैसे देखील गरजेचे आहेत. अक्षयकडे फुटकी कवडी देखील नव्हती.

पण त्याने आयडिया केली. जयेश सेठ नावाचे एक सुप्रसिद्ध फोटोग्राफर होते त्यांच्या हाताखाली लाईट असिस्टंट म्हणून फुकट काम करू लागला.

बाकी पोट भरण्यासाठी हिरो हिरॉईनच्या मागे गर्दीत नाचणे, मार्शल आर्ट शिकवणे अशी छोटी मोठी कामे चालली होती.

जेव्हा जयेश सेठ त्याला पगाराच विचारायचे तेव्हा तो हसून नकार द्यायचा. तीन चार महिने असच झालं. एकदा कंटाळून जयेशनी त्याला रागावल तेव्हा तो म्हणाला की,

“सॅलरीच्या ऐवजी माझा पोर्टफोलिओसाठी फोटोशूट करून द्या.”

जयेश सेठ तयार झाले. एकेदुपारी दोघे अक्षयच्या फोटोसाठी जुहू बीच वर आले. तिथे फिरता फिरता त्यांना एक पडका बंगला होता. समोर समुद्र आणि हा निर्मनुष्य बंगला जयेशला हे लोकेशन खूप आवडला.

त्यांनी अक्षयला तिथल्या एका भिंतीवर चढून बसायला सांगितलं.

अक्षय स्टाईल मध्ये उडी मारून कंपाउंडमधून आत गेला आणि त्या भिंतीवर चढला. अगदी एक दोन फोटो काढून झाले असतील इतक्यात त्या बंगल्याचा वॉचमन कुठून तरी उगवला.

SAVE 20200622 165324

त्याने या दोघांना इरसाल शिव्या घातल्या. अक्षय आणि जयेश कसेबसे तिथून पळाले. पण

लायकी नसताना फोटो काढतात असा अपमान त्या वॉचमनकडून सहन करून घ्यावा लागला होता.

पुढे काही दिवस गेले. अक्षयचा पोर्टफोलिओ तयार झाला. संगीता बीजलानी हिच्याशी एकदा फोटोशूट निमित्त त्याची ओळख झाली होती. तिला आपला पोर्टफोलिओ दाखवण्यासाठी अक्षय फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये गेला.

तिथे सेटवर गोविंदा सुद्धा होता. त्याने अक्षयचे फोटो बघितले आणि म्हणाला,

“यार तुम हिरो क्यू नहीं बन जाते?”

या एका वाक्याने अक्षयच आयुष्य बदलून गेलं. त्याने प्रचंड कष्ट करून सिनेमा मिळवला. तो हिट करून दाखवला. पुढच्या काही वर्षातच अक्षय भारतातल्या आघाडीच्या हिरोच्या यादीत जाऊन बसला तेही कोणत्याही गॉडफादरच्या मदतीशिवाय.

आज अक्षय कुमार भारताच्या हायेस्ट पेड अभिनेत्यापैकी तो एक आहे. आपल्या घामाच्या पैशांनी त्याने मुंबईत जुहू बीचवर एक आलिशान घर खरेदी केल आहे. योगायोग म्हणजे हे तेच घर आहे जिथून त्याचा अपमान करून हाकलून लावण्यात आल होतं.

अक्षयने अगदी सेम पोजमध्ये त्याच ठिकाणी फोटो काढून घेतला आहे.

SAVE 20200622 165332

याच मुंबईच्या मायानगरीमध्ये १०० रुपये भाडे असणाऱ्या घरापासून ते कोट्यवधी किंमतीच्या घरापर्यंत झालेला अक्षय कुमारचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.