खानमंडळीनां फाईट द्यायला ‘खिलाडीयों का खिलाडी’ आला होता.

बारा नंबरचा जुता घालणारा हा ताडमाड पंजाबी पोरगा, प्रमोद चक्रवर्ती यांच्या “सौगंध” चा हिरो होता त्यावेळची गोष्ट. शूटला पत्रकार आणि फोटोग्राफर्सना बोलवायची तेव्हाची पद्धत. कॅमेरामन पटापट याला क्लिक करू लागले. टिपिकल बॉलिवूड भाषेत, “हां भैय्या जरा लपक लो वगैरे…” आणि तो ही इमाने इतबारे पोझेस देत होता. कुणीतरी एका फोटोग्राफरच्या कानात खुस्फुसलं. “कशाला अख्खा रोल वाया घालवतोस बे?” तो फोटोग्राफर क्लिक करता करता म्हणाला,

“भाई कल को कौन अमिताभ बच्चन बन जाये कह नही सकते. अभी फोटो खिंचवालो यही समझदारी हैं.”

बॉलिवूड फार गंमतीची दुनिया आहे. येत्या काही वर्षात हा उंच धिप्पाड मुलगा राजीव भाटिया उर्फ अक्षयकुमार, अमिताभ नाही पण त्याच्या मुलाचा रोल करण्याइतका ए लिस्टर बनला आणि आजतर…

सगळं काही सुरळीत नव्हतं अक्की साठी. तो आऊट सायडर होता. अभिनय यथातथा नाही तर नव्हताच येत त्याला. आवाजही पुनीत इस्सरच्या जातकुळीतला. तरीही तो पुनीत सारखा चट्कन बी ग्रेड मध्ये गेला नाही कारण त्याच्या कडे काही गोष्टी अफलातून होत्या. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो निर्व्यसनी होता. पार्टी सर्कल हे काम मिळवणे आणि संबंध बनाये रखनेवाले जग असूनही अक्कीच्या क्लीन आणि म्हणून मग वक्तशीर आणि व्यावसायिक असण्याचं बॉलीवूडला कौतुक होतं. त्यात तो मार्शल आर्ट चॅम्पियन. उत्तम स्टंटस आणि नृत्य दोन्ही छान करायचा. खिलाडी मध्ये खुद् को क्या समझती है या गाण्यात तो पायऱ्यांवरून गडगडत खाली सहज येतो.

आणि याला जोड म्हणून तो नम्र आणि सुस्वभावी होता. चक्क कुख्यात डॉन छोटा शकीलने त्याला घरेलू सीधा लडका म्हणून त्रास द्यायला नकार दिला होता.

अक्कीची प्रेम प्रकरणं भरपूर गाजली. त्याच्या प्रत्येक नायिकेशी. त्याला use n throw करणारा म्हणूनही नावं ठेवण्यात आली पण या गोष्टीला एक बाजू अशी ही आहे की अक्किच आकर्षण इंडस्ट्री मधल्या मुलींनाही होतं. त्याच काळात आलेला अजयही त्याच्या मागे असलेल्या दोन तरुण नायिकांनी (नावं घेणार नाही) केलेल्या तमाशामुळे चर्चेत होताच पण तो मीडिया पासून लांबच असायचा. तिसरा सुनील अण्णा हा संसारी उडुपी माणूस. पण तिघेही action stars. नव्वदीच्या सुरुवातीला खान त्रयी आणि हे तिघे यांनी इंडस्ट्री वाटून घेतली होती.

मला अक्कीचा रेखा (उफ्फ) बरोबरचा खिलाडियोन्का खिलाडी जाम म्हणजे जाम आवडतो. बीस कदम में त्याचं पंधरा वीस लोकांना लोळवणं आम्ही थेटरात धुमाकूळ केला होता. ऐलान मधली त्याची पोलीस स्टेशनमधली फाईटही मस्त.

मग मात्र तो तेच तेच सिनेमे करून उबग आणू लागला. दावा, सपुत डोक्यात जाणारे होते. त्याचे ओळीने चित्रपट फ्लॉप होऊ लागले होते. आणि अचानक हेराफेरी मधून त्याने कात टाकली. कॉमेडीच अंग त्याला होतंच. डेव्हिड धवनच्या मिस्टर अँड मिसेस खिलाडी मध्ये ते दिसलं होतं. इथे ते प्रियदर्शनने उत्तम रीतीने बाहेर काढलं. त्यानंतर मग सूर मिळालेल्या अक्कीच्या बॅटिंग ला सुरुवात झाली. मुझ से शादी करोगे मध्ये त्याने सलमानला झाकोळून टाकलं आहे. हळूहळू तो अभिनयही करू लागला होता.

खाकी मध्ये त्याचा ऐय्याश, लाचखोर इन्स्पेक्टर शेखर भाव खाऊन जातो. अक्की असले ऐय्याश आणि नकारात्मक छटांची पात्र करायला कधी घाबरला नाही. बॉबी देओल बरोबरच्या अजनबी मध्ये तो खलनायक बनला होता.

आज मात्र तो ज्या ठिकाणी आहे (योग्य अयोग्य हा वेगळा आणि राजकीय मुद्दा) ते त्याने सर्वार्थाने आपल्या मेहनतीने आणि हिकमतीने मिळवलं आहे. माणूस म्हणून तो चांगला आहे. स्वतःच्या संघर्ष काळाची जाणीव असलेला. ट्विंकल सारखी बायको आहे (उत्तम आणि फटकळ लिहिणारी), अमाप पैसा आणि पोझिशन आहे. त्याचा मुलगा काही वर्षांनी बॉलिवूड मध्ये नक्की येईल पण तो पर्यंत प्रेक्षकांची अभिरुची काय असेल सांगता येत नाही. मात्र फिटनेस आणि अचिव्हमेंट या गोष्टींसाठी तो नेहमीच आदर्श राहील.

  • भिडू गुरुदत्त सोनसुरकर

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.