आजही जगासाठी अभिनयाचा गॉडफादर अल पचिनोच आहे !

” तू माझा मोठा भाऊ आहेस आणि मी तुझा आदर करतो. पण इथून पुढे कधीच आपल्या कुटुंबाविरुद्ध कुणाची बाजू घ्यायची नाही. कधीच नाही. कळलं ? “

अशा आशयाचा संवादातून थंड आणि भेदक डोळ्यांनी आपल्या मोठ्या भावाला दम देणाऱ्या मायकल कार्लीयॉनीला कुणी विसरू शकेल काय ?

एवढंच काय पुढं चालून तो आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेणारा जबाबदार व्यक्ती आणि वडिलांचं गुन्हेगारी विश्व सांभाळणारा कुख्यात डॉन होईल असं गॉडफादर सिनेमा पाहताना सुरुवातीला कुणालाही वाटलं नसेल.

पडद्याबाहेरच्या आयुष्यात लहानपणी न्यूयॉर्कच्या ब्रॉंक्स या उपनगरात आईसोबत राहत असताना इटलीची पार्श्वभूमी असलेल्या वडिलांपासून दुरावलेला, बास्केटबॉलमध्ये करियर करण्याची इच्छा असलेला, सतत मारामाऱ्या करणारा, शाळेतून काढून टाकलेला, वयाच्या नवव्या वर्षीच दारू प्यायला लागलेला व

तेराव्या वर्षापासून गांजा फुकायला लागलेला अल्फ्रेडो जेम्स पचीनो उर्फ अल पचीनो उर्फ सोनी,

होय सोनी, लहानपणी सर्वजण त्याला सोनी म्हणून बोलावत असत, पुढें जाऊन सिनेमा विश्व गाजवून सोडेल व जगप्रसिद्ध अभिनेता अल पचीनो म्हणून प्रसिद्ध होईल असा कुणीही विचार केला नसेल.

अभिनयाची आवड त्याला लहानपणापासून होती.

हायस्कुल फॉर परफॉर्मिंग आर्टस् या शाळेत त्याने स्वतःहून ऍडमिशन घेतलं होतं. पण त्याचा हा निर्णय आईला आवडला नाही तेंव्हा आईसोबत भांडण करून त्यानं घर सोडलं. पोट भरण्यासाठी कधी पोस्टमन, कधी बस कंडक्टर, कधी कारकून अशा छोट्या मोठ्या नोकऱ्या त्यानं केल्या. सोबत हौशी नाट्य संस्थांमधील नाटकांत अभिनय करत होता.

दरम्यान एच बी स्टुडिओ या अभिनयाचं व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत त्याची निवड झाली. तिथे त्याला चार्ली लाफ्टन हे शिक्षक लाभले. त्यांच्याशी त्याची चांगली मैत्री झाली. तिथे अभिनयाचे धडे तो गिरवायला लागला. पण नोकरी सुटल्यामुळे त्याचे हाल होत होते.

या काळात कधी मित्रांकडे, कधी थिएटरवर, कधी फुटपाथवर झोपून त्याने दिवस काढले.

त्या काळात त्याची आईही वारली, आजोबाही गेले. फार वाईट दिवस होते ते. एच बी स्टुडिओत चार वर्ष काढल्यानंतर पुढे त्याची ऍक्टर्स स्टुडिओ या नामांकित संस्थेत निवड झाली.

हा स्टुडिओ म्हणजे व्यावसायिक लेखक, दिग्दर्शक, अभिनेते यांच्या संघटनेचं केंद्र आहे. इथे त्याला ली स्ट्रासबर्ग या गाजलेल्या अभिनय शिक्षकाकडे मेथड अभिनय पद्धत शिकायला मिळाली.

हा त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट होता. इथेच त्याने अभिनयात करियर करण्याचा निर्णय घेतला.

पॅनिक इन द निडल पार्क या सिनेमातील अल पचीनोच्या भूमिकेने फ्रान्सिस फोर्ड कपोलाचं लक्ष वेधून घेतलं होतं. कपोला त्या वेळी द गॉडफादर फिल्म बनवण्याची तयारी करत होता.

जॅक निकोल्सन, रॉबर्ट रेडफोर्ड यांसारख्या ओळखीचा चेहरा सिनेमात घ्यावा अशी निर्मात्यांची इच्छा होती पण ती इच्छा मोडून कपोलाने पचीनोला घेतलं.

पचीनोने संधीचं सोनं केलं. फिल्मने इतिहास घडवला.

पचीनोला अकादमीचं ऑस्करसाठी सहायक अभिनेत्याच नामांकन मिळालं. पचिनो चिडला,

गॉडफादर मध्ये मी सह नायक नाही तर नायक आहे असं म्हणत त्याने त्यावेळच्या ऑस्करवर बहिष्कार टाकला.

त्यानंतर आलेल्या दुसऱ्या भागानेही अफाट यश मिळवलं. पचीनोची निरागस असण्यापासून कठोर होणाऱ्या मायकल कार्लीयॉनीची भूमिका प्रचंड गाजली. या ही वेळी त्याला अकादमीचं नामांकन मिळालं, पण ते सर्वोत्कृष्ट नायकासाठीच होत,

पण यावेळीही ऑस्करने त्याला परत हुलकावणी दिली.

त्या काळात पचीनो सुसाट सुटला होता.

स्केअरक्रो, सर्पिको, डॉग डे आफ्टरनून हे एक से एक भारी सिनेमे त्याने केले. डॉग डे आफ्टरनून आणि अँड जस्टीस फॉर ऑल या सिनेमांसाठी त्याला सलग चार वेळा नामांकन मिळाले.

पुढे क्रूझिंग आणि ऑथर ऑथर सिनेमे विशेष चालले नाहीत पण नंतर आलेल्या स्कारफेस या सिनेमाने धमाका केला. त्यातील त्याची टोनी मोन्टानाची भूमिका प्रचंड गाजली. फिल्मला गोल्डन ग्लोबसाठी नामांकन मिळालं.

मध्यंतरी आलेले रिव्हॉल्यूशन,

सी ऑफ लव्ह आणि गॉडफादर ३ फारसे चालले नाही.

अगोदर आलेल्या भागांमुळे लोकांनी गॉडफादरचा तिसरा भाग पाहिला पण त्याला अगोदरच्या भागांची सर नव्हती.

पुढे बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पचीनोला 1993 साली सेंट ऑफ अ वूमन या फिल्ममधील भूमिकेसाठी ऑस्कर मिळालं. विशेष म्हणजे या ही वर्षी त्याला ग्लेनगरी ग्लेन रॉस या सिनेमातील भूमिकेसाठी सहायक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी नामांकन होतं.

पुढे त्याने शॉन पेन सोबत कार्लीटोज वे, रॉबर्ट डी निरो सोबत हीट आणि किनू रिव्ह्ज सोबत द डेव्हील्स ऍडव्होकेट या सिनेमांत भूमिका केल्या. ख्रिस्तोफर नोलनच्या इनसोम्नीया या महत्वाच्या फिल्ममध्ये काम केलं.

अजूनही तो न थकता काम करत आहे.

गेल्या वर्षी क्विंटीन टेरंटीनोच्या वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड व मार्टीन स्कोर्सेसीच्या द आयरिशमेन या सिनेमांत भूमिका केल्या आहेत.

करियरच्या सुरुवातीला अल पचीनोने नाटकांत कामं करायला सुरुवात केली होती. अवेक अँड सिंग, द इंडियन वांट्स ब्रॉंक्स, डझ अ टायगर वियर अ नेकटाय ? आणि शेक्सपिअरच्या द मर्चंट ऑफ व्हेनिस मधील शायलॉक या भूमिका गाजल्या.

नाट्य क्षेत्रासाठी त्याचं मोठं योगदान आहे.

द मिरर थिएटरसाठी त्यानं मोठं डोनेशन दिलं आहे. नाटकांसाठी नाट्य क्षेत्रातील मानाचा टोनी अवॉर्ड त्याला दोनदा मिळाला आहे. सिरीयल मधल्या कामांसाठी टिव्ही क्षेत्रातील महत्वाचा एमी अवॉर्डही दोनदा मिळाला आहे. सेंट ऑफ वूमनसाठी एक ऑस्कर.

अशा प्रकारे नाटक, सिरीयल आणि सिनेमा अशा तिन्ही क्षेत्रांतील मोठे आणि महत्वाचे पुरस्कार त्याला मिळाले आहेत.

इटलीची पार्श्वभूमी असलेला अल पचीनो आज अमेरिकेत आयकॉन म्हणून ओळखला जातो.

जगभरातील लोक त्याच्या द गॉडफादर आणि स्कारफेस यासह इतरही फिल्म्सची पारायणं करत असतात. सिनेमातील त्याचे संवाद लोकांना तोंडपाठ आहेत.

मायकल कार्लीयॉनी साधारण आयुष्यातून माफिया विश्वात प्रवेश करतो तो गॉडफादर मधील बाप्तिस्माचा सीन अजूनही अनेक सिनेमांना व कलाकारांना प्रेरित करत असतो.

आज अल पचीनो ऐंशी वर्षांचा झाला पण त्याचा उत्साह अजूनही तरुणाला लाजवेल असा आहे.

हॅपी बड्डे अल पचीनो !

  •  नारायण शिवाजी अंधारे

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.