आईनस्टाईन यांच्या स्टडीरूमच्या भिंतीवर एका भारतीयाचा फोटो होता.

अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये प्रिंसटोन युनिव्हर्सिटी आहे. तिथे मुख्य रस्त्यावर म्हणजेच मर्कर स्ट्रीटवर इतिहासातल्या एका सुप्रसिध्द शास्त्रज्ञाचं एक दोन मजली घर आहे. या घराच्या वरच्या मजल्यावर एक अभ्यासिका होती. तिथे अनेक पुस्तके तर होतीचं पण पुस्तकांच्या गराड्यात दोन मोठ्या शास्त्रज्ञाचे फोटो होते. यापैकी एक होता मायकेल फॅरेडे आणि दुसरा होता जेम्स मेक्स्वेल यांचा.

शास्त्रज्ञाच्या स्टडीरूममध्ये शास्त्रज्ञांचे फोटो असणे ही तर नॉर्मल गोष्ट आहे. पण या दोन लोकांव्यतिरिक्त तिथे एका राजकीय नेत्याचा फोटो होता. ते घर होत जगातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांच.  

आणि फोटो होता भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा.  

अल्बर्ट आइनस्टाइन एक महान भौतिक शास्त्रज्ञ, ज्याच्या सापेक्षवादाच्या सिद्धांतामुळे आपल्या विश्वासंबंधीच्या कल्पनेमध्ये अतिशय महत्वाचा आणि क्रांतिकारक बदल झाला. आईनस्टाईन यांनी तयार केलेला  E = mc² हे सूत्र माहीत नसणारा भिडू तसे सापडणे कठीण आहे,.

पण भिडू याच अल्बर्ट आईनस्टाईनच आपल्या देशाशी देखील अनोख नात होत. तेच नात आणि त्यांचा भारताशी असणारा संबंध आज तुम्हला सांगायचं आहे. हे जाणून घेण्यापूर्वी जरा आईनस्टाईन यांना जाणून घेऊ करण आज अल्बर्ट आईन्स्टाईन यांची जयंती आहे.

अल्बर्ट आइनस्टाइन यांचा जन्म १४ मार्च १८७९ मध्ये दक्षिण जर्मनीतील उल्म या गावात झाला. हर्मान आणि त्यांची पत्नी पौलिन यांचा हा पहिला मुलगा . त्याच्या डोक्याचा आकार जरा वेगळा होता. इतर मुलांच्या मानाने बोलायला उशीरा लागल्याने त्याच्या आईला तो मतीमंद असावा अशी भीती वाटत असे. याच अल्बर्ट आइनस्टाइन याने नंतरच्या काळात जे सिद्धांत मांडले त्या सिद्धांताने संपूर्ण जगाचे लक्ष  वेधून घेतले. अल्बर्ट ची आई बुद्धिमान होती. वडील अभियंते होते. अल्बर्ट चा भाऊ जेकब आणि त्याच्या वडिलांचा एक कारखाना देखील होता.

अल्बर्ट आईनस्टाईन आणि भारत

आईनस्टाईन यांचा भारताशी आणि भारतातील अनेक लोकांशी खूप जवळचा संबंध आहे. त्यांचा भारतातील ज्या व्यक्तींशी जवळचा संबंध होता त्यातीलच एक होते महात्मा गांधी. आईनस्टाईन गांधीजींच्या कार्यामुळे इतके प्रभावित झाले होते की त्यांनी त्यांचा फोटो आपल्या अभ्यासिकेत लावला होता. ह्या बाबतीत बोलताना ते म्हणाले होते,

“हीच वेळ आहे जेव्हा आपण यशाच्या फोटो ऐवजी सेवेचा फोटो लावायला हवा”

गांधीजींना आईन्स्टाईन आदर्श मानत होते. जगातील त्याकाळच्या भीषण परस्थितीला तोडगा फक्त गांधीजींची अहिंसा हाच आहे असे मत देखील आईनस्टाईनने व्यक्त केले होते. महात्मा गांधी यांच्या अहिंसावादाच्या तत्वाची आईनस्टाईन यांनी स्तुती केली आहे. गांधीजी आणि आईनस्टाईन यांच्या प्रत्यक्ष भेट कधीच घडली नाही, पण त्यांच्यात पत्रव्यवहार भरपूर झाले आहेत.

१९३१ मध्ये असेच एक पत्र आईन्स्टाईन यांनी गांधीजींना लिहले आहे. या पत्रात त्यांनी गांधीजींचे अहिंसात्मक धोरणाची जगाला गरज असून सगळ्या जगणे ते पाळावे अशी अपेक्षा व्यक्त करत गांधीजींच तत्वच जगातील अनेक समस्यांचे उत्तर असल्याचे म्हटले आहे. गांधीजींनी या पत्राचे उत्तर देताना आईनस्टाईन अहिंसावादाचे तत्व मान्य करतात, याबद्दल आनंद व्यक्त केला. त्याबरोबरच गांधीजींना त्यांच्या आश्रमात येऊन भेटण्याचे आमंत्रण देखील याच पत्रातून दिले होते.

यानंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवाहरलाल नेहरू यांना अमेरिकेच्या प्रिंसटन युनिव्हर्सिटी मधून आमंत्रण आले. जिथे गांधीजींचा फोटो लावला होता त्याच घरात नेहरू आणि आईनस्टाईन यांची पहिली भेट झाली होती. 

इस्रायल ज्या स्थापनेवेळी देखील नेहरूंना आईनस्टाईनने पत्र पाठवले होते. भारत तेव्हा इस्रायलच्या स्थापनेच्या विरोधात होता, त्याचवेळी पॅल्सटाइनच्या विभाजनाच्या देखील भारत विरोधात होता, कारण तो जर स्वतंत्र ज्यू लोकांचा देश झाला तर तेथील अरबी लोकांवर अन्याय होईल असे नेहरूंचे मत होते.

दुसरीकडे ज्यू लोकांवर होणारा अन्याय थांबावा या उद्देशाने आईनस्टाईन यांचा या विभाजनाला पाठींबा होता आणि  भारताने देखील  ज्यू लोकांबाबत योग्य विचार करावा आणि या विभाजनाला विरोध करू नये, याबाबतचा एक पत्रव्यवहार नेहरू आणि आईनस्टाईन यांच्यात १३ जून १९४७ साली झाला होता.

भारतातील एक बुद्धिमान तरूण सत्येंद्रनाथ बोस यांची वैज्ञानिक म्हणून ओळख निर्माण होण्यात देखील आईनस्टाईन चा मोठा वाटा आहे. १९२० च्या दशकात बोस यांनी आपला एक रिसर्च पेपर आईनस्टाईन यांना पाठवला, तो वाचून त्यांनी सत्येंद्रनाथ यांना बर्लिनला बोलवून घेतले. कालांतराने आईनस्टाईन आणि बोस यानी मिळून एक संशोधन देखील केले. त्या दोघांच्या या संशोधनाला बोस- आईन्स्टाईन condensate phenomenon या नावाने ओळखले जाते.

भारतातील अशाच अजून एका व्यक्ती बरोबर आईनस्टाईन यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते, ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर. टागोरांना आईनस्टाईन रब्बी या नावाने बोलवत होते. या दोघांची पहिली भेट १४ जूलै १९३० साली आईनस्टाईनच्या राहत्या घरी, म्हणजेच बर्लिन मध्ये झाली. त्यावेळेस त्या दोघांमध्ये झालेला संवाद मिडिया मध्ये सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर अनेकदा आईनस्टाईन आणि टागोर यांच्या पत्रव्यवहार झाला आहे.

अशीच अल्बर्ट आईनस्टाईन यांची पुण्याच्या महर्षी कर्वे यांच्या सोबत ओळख होती. महर्षी कर्वेंच्या कुटुंबांनी जतन केलेल्या काही फोटोमध्ये एक फोटो आईनस्टाईन आणि कर्वे यांच्या भेटीचा देखील आहे.

तर फिजीसक्स मध्ये आपल्या डोक्याला शॉट लावणारा E = mc²  हा फॉर्म्युला देणाऱ्या महान शास्त्रज्ञाचे भारताशी देखील खूप चांगले नात होत हेच यावरील काही गोष्टींमधून स्पष्ट होते.

१८ एप्रिल १९५५ रोजी आइनस्टाइन यांचा मृत्यू झाला. अमेरिकेत आल्यापासून आयुष्यभर ते प्रिन्स्टन विद्यापीठातल्या आपल्या घरात राहिले. या घराचं म्युझियम करण्यासही त्यांनी विरोध केला होता. त्यांच्या नंतर त्यांची मुलगी या घरात राहिली.  आज या घरात काही सेमिनार वगैरे आयोजित केले जातात.

आइनस्टाइन यांचा मेंदू त्याच्या मृत्यूनंतर प्रिन्स्टन हॉस्पिटल च्या पथौलॉजीच्या प्रयोग शाळेत परीक्षण करण्यासाठी ठेवलेला आहे. या मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागाचे नमुने तपासले गेले त्यात अनेक आश्चर्यकारक गोष्टी उघड झाल्या. आजवर त्यांच्या मेंदूवर एक लाखहून अधिक रिसर्च पेपर लिहिण्यात आले आहेत आणि अजूनही त्यावर संशोधन सुरुच आहे.

हे ही वाच भिडू.