भारतात नोकरीसाठी आलेल्या फॉर्ब्जने गुजराती लोकांवर मोठे उपकार करून ठेवलेत.

‘फोर्ब्स’ हे नाव वाचल्यावर तुम्हाला काय आठवतं? तर एक मॅगझीन जे जरवर्षी श्रीमंतांची लिस्ट काढतं. अदानी, अंबानी, मेहता, शाह, पटेल ही ‘फोर्ब्स’च्या यादीतली ठरलेली नावं. आता ‘फोर्बस गुजराती सभा’ नाव वाचल्यावरच या लिस्ट मधल्या लोकांनीच काढलेली एखादी ‘स्वयंसेवी’ संस्था वगैरे असेल असं कायतरी लॉजिक लावून खुश होणार असाल, तर थोडं थांबा.

तर ‘फोर्बस गुजराती सभा’ मधला फोर्बस हा फोर्ब्सच आहे. मात्र त्याचा आणि फोर्ब्स मॅगझिनचा काडीमात्र संबंध नाहीए. 

हा ‘फोर्ब्स’ आहे अलेक्झांडर किर्लिक फोर्ब्स. या ब्रिटिश अधिकाऱ्यानं ही संस्था स्थापन केली म्हणून या संस्थेला त्याचं नाव देण्यात आलंय. आता एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं गुजराथी सभा का स्थापन केली? असं विचारणार असाल, तर सांगतो.

तर अलेक्झांडर फोर्ब्स हा तसा मूळचा ब्रिटनचा. वयाच्या फक्त २३ व्या वर्षी १८३४ मध्ये तो नोकरीसाठी भारतात आला आणि इथलाच होऊन गेला. भारतात त्याची पहिली पोस्टिंग होती अहमदाबादला. तिथं त्यानं उपन्यायाधीश म्हणून काम सुरू केलं. उपन्यायाधीश असल्यामुळं समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती त्याला भेटत असत. अशीच त्याची एकवेळ भेट झाली गुजराती कवी दलपतराम यांच्याशी. दोघंही समवयस्क. भेट तर झाली पण भाषेची अडचण. फोर्ब्सना गुजराती येत नव्हती आणि दलपतरामांचे इंग्लिशचे वांदे. मग दोघांनी एकमेकांना आपापली मातृभाषा शिकवायला सुरवात केली.  

गुजराथी भाषा शिकत असताना फोर्ब्स भाषेच्या चांगलाच प्रेमात पडला. लवकरच  फोर्ब्स गुजराती भाषेत लिहू लागला. 

गुजराती भाषेत लिहणारा इंग्रज अधिकारी गुजरातेत लवकरच लोकप्रिय झाला.  गुजराती लोकांनी त्याला भरभरून प्रेम दिले.

आता या प्रेमाची परतफेड करण्याची इच्छा फोर्ब्सला झाली. त्यातून त्याने १८४८ मध्ये ‘गुजरात व्हर्न्याकुलर सोसायटी’ ही संस्था गुजरातमध्ये स्थापन केली. फोर्ब्स स्वतःच या संस्थेचा पहिला सेक्रेटरी झाला. या संस्थेपर्यंत त्याने गुजराती भाषेच्या विकासासाठी कार्य सुरु केलं. या कामात त्यांना दलपतरामांनी मोठी साथ दिली. 

फोर्ब्स यांच्या विनंतीवरून दलपतरामांनी ‘लक्ष्मी’ हे नाटक लिहलं जे गुजराती भाषेमधील पहिले नाटक होतं. 

त्यावेळी गुजरातमध्ये एकही ग्रंथालय नव्हते. मग फोर्ब्सने गुजरातमध्ये पहिले सार्वजनिक ग्रंथालय सुरु केले. पुढे १८६५ मध्ये फोर्ब्सने मुंबईमध्ये ‘गुजराती सभा’ नावाची संस्था चालू केली. फोर्ब्स भाईंची लोकप्रियता एवढी की गुजराती लोकांनी सभेचे नामकरण ‘फोर्बस गुजराती सभा’ असं करून टाकलं. गुजराती लोक फोर्ब्स असं न म्हणता फोर्बस असा उच्चार करतात . फोर्ब्सने ‘रासमाला’ नावाने गुजराती साहित्याचा इतिहास इंग्रजीत दोन खंडांमध्ये लिहलाय.

फोर्ब्सनं न्यायालयीन क्षेत्रातही चांगली प्रगती केली होती. १८३२ मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी मुंबईला हायकोर्ट स्थापन केले तेव्हा फोर्ब्सला न्यायाधीश म्हणून नेमले होते. फोर्ब्सनं पुढे जाऊन काही काळ मुंबई विद्यापिठाच्या कुलगुरू पदाची जबाबदारीही सांभाळली होती.

आयुष्यात एवढी प्रगती साधणारा फोर्ब्स मात्र अल्पायुषी होता. फोर्ब्सला फक्त ४४ वर्षांचे आयुष्य लाभले. भारतात २१ वर्षे राहिल्यानंतर, १८६५ मध्ये त्यांचे पुण्यात निधन झाले. फोर्ब्सच्या निधनानंतर त्यांचे मित्र दलपतराम यांना खूप दुःख झाले. आपल्या मित्राच्या विरहाने दलपतरामांना झालेलं दुःख दलपतरामांच्या ‘फोर्बसविरह’ या पुस्तकात दिसून येते.

एक ब्रिटिश माणूस एका भारतीय भाषेच्या प्रेमात पडून एवढं मोठं काम करतो म्हणून अलेक्झांडर फोर्ब्स इतिहासात अजरामर आहेत. बाकी गुजराती लोकांच्या आवडत्या फोर्बसभाई यांनी सुरु केलेली  ‘फोर्बस गुजराती सभा’ मुंबई मधील जुहूमध्ये अजूनही कार्यरत आहे.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.