फाळणी वेळी पाकिस्तानात अडकलेल्या लोकांना स्वतःच्या विमानातून भारतात आणलं

भारत आणि पाकिस्तान फाळणी हि अनेक लोकांसाठी दुर्दैवी घटना समजली जाते. १५ ऑगस्ट १९४७ हा असा दिवस होता जेव्हा भारतीय लोकांना एकाच दिवशी स्वातंत्र्याचा आनंद होता आणि दुसरीकडे फाळणीचं दुःख होतं. इंग्रजांशी झुंजून स्वातंत्र्य मिळवलं पण तेच इंग्रज देशाच्या फाळणीला कारणीभूतसुद्धा होते.

या फाळणीच्या अनेक दुःखद गोष्टी आपण वाचत पाहत आलो असेल पण आजचा किस्सा अशा एका माणसाचा आहे ज्याने पाकिस्तानमधून स्वदेशात येण्याची वाट पाहत असलेल्या भारतीय लोकांसाठी स्वतःची विमानं पाठवली होती.

ते होते महान बिझनेसमन आणि समाजसेवक डॉ.अलगप्पा चेट्टीयार.

तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील एका छोट्याश्या कोट्टियूर मध्ये चेट्टीयार राहायला होते. युकेमध्ये शिक्षण घेऊन त्यांनी भारतात आपला व्यवसाय थाटला. 

डॉ.अलगप्पा चेट्टीयार यांनी केरळमध्ये टेक्स्टाईल कंपनी, कोलकातामध्ये विमा कंपनी, मद्रासमध्ये थिएटर आणि मुंबईमध्ये हॉटेल अशा एकदम सगळीकडे पसरवलेला व्यवसाय सुरु केलेला होता. १९३३ साली लंडनमधून पायलट बनण्याची ट्रेनिंग आणि सर्टिफिकेट त्यांनी मिळवलेलं होतं.

चेट्टीयार यांना अगोदरच आयडिया आलेली होती कि भविष्यकाळात एअर लाईन्सची डिमांड वाढणार आहे त्यामुळे अलगप्पा चेट्टीयार यांनी ८ जुने विमानं खरेदी करून ठेवलेले होते. १९४५ मध्ये त्यांनी ज्युपिटर एअरलाईन्सचा पाया घातला. या विमानांचा त्यांनी विमासुद्धा उतरवून ठेवलेला होता. सगळं घोडं अडलेलं ते इथं कि चेट्टीयार यांना अजून भारतात विमान चालवायचं लायसन मिळालेलं नव्हतं. 

लायसनची वाट पाहत बसलेल्या चेट्टीयार काहीतरी नवीन करण्याच्या बेतात होते आणि तेव्हा देशाची फाळणी झाली. देशाची फाळणी झाली आणि मोठा हाहाकार उडाला तेव्हा अलगप्पा चेट्टीयार यांनी स्वतःहून सरकारपुढे प्रस्ताव मांडला कि मला लायसन द्या मी पाकिस्तानमध्ये अडकलेल्या लोकांना स्वदेशी आणतो.

सरकारची परवानगी मिळताच अलगप्पा यांच्या विमानातून अनेक भारतीय लोकं आपल्या मायभूमीत आले. हे मिशन संपल्यानंतर पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला चढवला होता. काश्मीरवर हल्ला केल्यावर भारतीय सैन्याकडे विमानांची कमतरता होती तेव्हा अलगप्पा यांनी देशाची मदत केली.

आपल्या एका प्लॅनमधून त्यांनी भारतीय सेनेला रवाना केलं होतं. एका रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळी विमान क्रॅश झालं पण आपल्या नुकसानाची पर्वा न करता अलगप्पा यांनी लागलीच दुसरं विमान पाठवलं होतं. 

१९४८ साली ज्युपिटर एअरवेजला ऑफिशियल परवानगी मिळाली. काही वर्ष अलगप्पा चेट्टीयार यांनी आपली विमान सेवा सुरु ठेवली पण प्लेनची देखरेख करणे आणि पायलट लोकांचा खर्च जास्त होता. १९५३ साली जेव्हा इंडियन एअरलाईन्सची सुरवात झाली तेव्हा अलगप्पा यांनी आपले सारे विमानं सरकारला विकून टाकले.

डॉ. अलगप्पा चेट्टीयार यांनी भारतात शिक्षणप्रसारासाठी खूप मोठं काम केलं. लोकं साक्षर कसे होतील यासाठी alagappa Group Of Educational Institutions ची स्थापना केली. या संस्थेत आजही हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. देशाच्या अनेक कामांमध्ये भारत सरकारला सहकार्य केल्यामुळे डॉ.अलगप्पा यांना १९५४ साली पद्म भूषण पुरस्कार देण्यात आला होता.

आपल्या व्यवसायाचा लोकांना कसा फायदा होईल आणि समाजसेवा कशी करता येईल यासाठी डॉ.अलगप्पा चेट्टीयार आयुष्यभर कार्यरत राहिले. त्यांनी दिलेल्या विमान सेवेमुळे अनेक लोकांना स्वतःच्या मायभूमीत परतता आलं होतं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.