सुरवातीला टेलरकाम करण्याऱ्या अली बाशाने ९०० सिनेमांमध्ये काम करण्याचा रेकॉर्ड केलाय….

सिनेमांमध्ये कॉमेडी असल्याशिवाय मजा येत नाही असं एकूण सिनेमा स्ट्रक्चर असतं, अलीकडच्या काळात यात बदल झालेला दिसतो. पण विनोदी अभिनेता हा एक कायम इंटरेस्टिंग विषय असतो. यात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, मकरंद अनासपुरे पासून ते परेश रावल, राजपाल यादव अशी मंडळी आपल्याला दिसतात. पण साऊथमध्ये एक दोन कॉमेडी पात्र आपल्याला कायम दिसतात त्यात एक तर फिक्स असतात ते म्हणजे ब्रम्हानंदम.

टॉलिवूडचा कॉमेडी  किंग म्हणून ब्रम्हानंदम ओळखला जातो पण ब्रम्हानंदमच्या खालोखाल अजून एक अभिनेता आहे ज्याला आपण हजारदा टीव्हीवर बघितलं असेल, त्याचा आपल्याला अभिनय आवडत असेल पण त्याच नाव माहिती नसेल तो अभिनेता म्हणजे अली बाशा. या कॉमेडी हिरोला ब्रम्हानंदम नंतरचा सगळ्यात मोठा कॉमेडी स्टार म्हणून ओळखलं जातं.

ब्रम्हानंदम आणि अली बाशा यांच्यात कायम तुलना केली जाते कि या दोघांमध्ये भारी कोण पण हे दोन्ही हिरो एकमेकांना ग्रेट मानतात. ब्रम्हानंदम जेव्हा सिनेमात विनोदी कॅरेक्टर करू लागले होते तेव्हा अली बाशा हे चाईल्ड रोल करत होते. ब्रम्हानंदम हे अली बाशाचे गुरु आहेत. हिरो हिरोईनपेक्षाही मोठा फॅनबेस हा या दोघांचा आहे.

१० ऑक्टोबर १९६७ रोजी आंध्रप्रदेशात अली बाशाचा जन्म झाला. वडील टेलर होते आणि आई गृहिणी होती. घरात पैशांची कायम वानवा असायची. अली बाशाला अभिनयाची प्रचंड आवड होती. अगदी लहान वयातच वडिलांना मदत म्हणून तो हि टेलरिंगचं काम करायचा. घरदार चालवणेसुद्धा भागचं होतं. त्यामुळे अभिनय आणि टेलरिंगचा व्यवसाय अशा पद्धतीने दिवस रेटत होते. 

याच काळात एके दिवशी राज मुंद्री यांच्या म्युझिक कंपनीच्या मालकाची नजर अली बाशावर पडली. ११ वर्षाच्या अली बाशाने बाल कलाकार म्हणून निंदूं नुरेल्लू या सिनेमात काम केलं. या सिनेमात त्यांच्या कामावर खुश होऊन त्यांना चांगलं मानधन मिळालं. हे मानधन इतकं होतं कि एखाद्या रोजंदारीवर जाणाऱ्या गड्याच्या हजेरीपेक्षाही जास्त होतं.

छोट्याश्या कामामुळे इतके पैसे मिळू शकतात हे कळल्यावर अली बाशा यांनी अभिनयातच करियर करायचं ठरवलं. यानंतर त्यांना चेन्नईला बोलावणं आलं. त्यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांना एका चांगल्या बालकलाकाराची गरज होती. तेव्हा पहिल्याच सिनेमात चांगला अभिनय करणारे अली बाशा भारती राजाच्या सिनेमात एकदम फिट्ट बसले आणि सिथाकोका चिलाका नावाचा त्यांनी दुसरा सिनेमा केला. या कामामुळे बालकलाकार म्हणून त्यांना बरीच काम मिळाली. 

कमल हसन, चिरंजीवी अशा तेव्हाच्या टॉपच्या हिरोंबरोबर त्यानी काम केलं. तब्बल १९ वयापर्यंत ते बालकलाकार म्हणून काम करत होते. पण १९८७ ते १९९१ या काळात अली बाशाला सिनेमेच मिळाले नाही. कारण त्यांचे हक्काचे बालकलाकाराचे रोल वयवाढीमुळे जाऊ लागले होते. पुढे १९९१ मध्ये बॉलिवूडच्या प्रेम कैदी या सिनेमात त्यांना काम मिळालं. पुढे मुकाबला या गोविंदाच्या सिनेमातसुद्धा त्यांना काम मिळालं.

तेलगूमध्ये ब्रम्हानंदम सोबत त्यांची जोडी चांगली जमली. नागार्जुनच्या हॅलो ब्रदर सिनेमामुळे अली बाशाला परत मागे फिरायची गरजच पडली नाही. फक्त कॉमेडी हिरो म्हणूनच अली बाशाला ओळख मिळाली पण ते काही सिनेमांमध्ये हिरोसुद्धा होते. ९०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये आजवर त्यांनी काम केलंय. ब्रम्हानंदम नंतर सगळ्यात जास्त काम करणारा हिरो म्हणून बाशाची ओळख आहे.

सन ऑफ सत्यमूर्ती, बॉडीगार्ड, गब्बरसिंग अशा सिनेमांमुळे अली बाशा अजूनच जास्त लोकप्रिय झाले. तामिळ, तेलगू, कन्नड अशा सगळ्या भाषांमध्ये त्यांचे सिनेमे आहेत. आज सुद्धा भारतभरात त्यांचा एक वेगळा फॅनबेस आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.