स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांपर्यंत अलिबाग शहरामध्ये वीजच नव्हती. त्यालाही एक कारण होतं..

रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहर. अलिबाग ची ओळख इथले सुंदर बीच, कोकणातील निसर्गसौंदर्य, अस्सल रानमेवा यांनीच आहे. मुंबईपासून अंतर साधारण १२० किमी. समुद्रमार्गे फेरीने गेलं तर आणखीन जवळ. त्यामुळे मुंबईकरांसाठी हक्काचं हॉलिडे डेस्टिनेशन अलिबागच आहे.

म्हणूनच मुंबईच्या विकासाच्या खाणाखुणा देखील अलिबाग पर्यंत पोहचल्या आहेत.

पण एककाळ होता जेव्हा अलिबागमध्ये वीजच पोहचली नव्हती. संध्याकाळ झाली की अलिबाग अंधारात बुडून जायचा. एका व्यक्तीच्या प्रयत्नातून हे सर्व चित्र पालटलं.

यासाठी आधी आपल्याला अलिबागचा इतिहास जाणून घ्यावा लागेल.

सुमारे तीनशे वर्षांपूर्वी अली नामक एका श्रीमान मुसलमानाने बऱ्‍याच विहिरी खणून आंब्याच्या व सुपारीच्या बागा ह्या भागात तयार केल्या, असे म्हणतात. त्यावरून ‘अलिबाग’ हे नाव पडले असावे. सरदार कान्होजी आंग्र्यांच्या ‘हिराकोट’ ह्या तसेच इतर वाड्यांचे अवशेष अजूनही गावात आहेत.

शहराच्या नैर्ऋत्येस दोनशे मी. अंतरावर एका छोट्या बेटावर कुलाब्याचा किल्ला आहे. तेथे मायनाक भंडारी ह्या शिवाजी महाराजांच्या नाविक सरदाराचे मुख्य ठाणे होते. हा किल्ला भक्कम असल्याने पुढे आंग्र्यांनीही आपले मुख्य ठाणे येथेच ठेवले होते.

पुढे इंग्रजांचा काळ सुरु झाला. पाश्चात्य जगात होणारे बदल इंग्रजांनी भारतात आणले. त्यांनी स्वतःचा फायदा पाहिला पण त्यातुन देशाचा विकास झाला.

अशीच एक महत्वाची गोष्ट म्हणजे भूचुंबकीय वेधशाळा.

ब्रिटिशांनी १८४ साली मुंबईतील कुलाबा येथे वेधशाळेची स्थापना केली. मुंबई बंदरातील खगोलीय घटनांचा अभ्यास करण्यासाठी या वेधशाळेची स्थापना करण्यात आली. रॉयल सोसायटी ऑफ लंडन यांच्या शिफारसीनुसार भूचुंबकीय क्षेत्राचे नियमित मापन सुरू करण्यात आले. १८४६ पासून दर तासाला सुसंगतपणे भूचुंबकीय लहरींच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात झाली. मॅग्नेटोग्राफच्या साह्य़ाने फोटोग्राफीक पद्धतीने या नोंदी ठेवल्या जाऊ लागल्या.

१८९६ च्या सुमारास डॉ. नानाभॉय आर्देशर फार्मजी मुस यांनी कुलाबा वेधशाळेची धुरा सांभाळली. त्याकाळात मुंबईत वाहतुकीसाठी घोडय़ावर चालणाऱ्या ट्राम्स वापरल्या जात असत. मात्र १९०० सालच्या सुमारास मुंबईतील ट्राम्सचे विद्युतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे भूचुंबकीय नोंदीच्या संकलनात अडथळे निर्माण होणार होते. त्यामुळे कुलाबा येथील वेधशाळा स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यावेळी वेधशाळेसाठी १२ जागांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातून अलिबाग येथील समुद्र किनाऱ्यावरील सात एकरची जागा निवडण्यात आली. चुंबकीय परिणामांपासून मुक्त अशा दोन इमारती येथे बांधल्या गेल्या. पोरबंदर येथील दगड, वाळू आणि तांब्यापितळाच्या वस्तूंचा वापर करून या ठिकाणी इमारतींचे बांधकाम करण्यात आले. बाहेरील तापमानाचा परिणाम न होणाऱ्या एका इमारतीत मॅग्मोमीटर बसवण्यात आले. तर दुसऱ्या इमारतीत भूचुंबकीय क्षेत्रातील विविध घटकांचे निरपेक्ष मापन सुरु झाले.

१९०४ साली अलिबाग येथील कुलाबा वेध शाळेतून भुचुंबकीय लहरीचे मापन सुरू झाले. मात्र यामुळे एक झालं, भूचुंबकीय वेधशाळेवर परिणाम होईल म्हणून ब्रिटिशांनी अलिबाग ला वीजच आणली नाही.

हीच परिस्थिती स्वातंत्र्यानंतर देखील कायम राहिली. पुढे अनेक वर्ष भारत सरकारने अलिबाग वीज आणली नाही. देश प्रगतीच्या पथावर धावू लागला होता पण अलिबागकर बिचारे अंधारात बुडालेले होते.

यावर उपाय शोधायचं ठरवलं ऍड.दत्ताजी खानविलकर यांनी.

ते अलिबागचे नगराध्यक्ष होते. राष्ट्र सेवा दलाच्या मुशीत १९४२ च्या स्वातंत्र्यलढय़ातून उदयास येऊन काँग्रेसच्या पुरोगामी विचारधारेत तयार झालेले दत्ताजी तथा भाऊ खानविलकर यांचे आयुष्य म्हणजे एक संघर्षपर्वच होते. १९५५ साली ते अलिबाग नगर परिषदेच्या अटीतटीच्या निवडणुकीत प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आले. 

१९५७ मध्ये अलिबाग नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली. काँग्रेसला मोठं बहुमत मिळालं. दत्ताजी भाऊनगराध्यक्ष झाले. ते जवळपास १२ वर्षे अलिबागचे नगराध्यक्ष होते.  

या १२ वर्षाच्या काळात त्यांनी केलेलं सर्वात महत्वाचं काम म्हणजे शहरात आणलेली वीज.  

वीज नसल्यामुळे अलिबागचा विकास अडखळला आहे हे सर्वानाच ठाऊक होत पण भूचुंबकीय वेधशाळेमुळे कोणाला काही करता येऊ शकत नव्हते. अखेर दत्ताजी खानविलकर यांनी भूचुंबकीय वेधशाळेच्या संशोधक आणि शास्त्रज्ञांशी संवाद साधून त्यामागील नेमकी शास्त्रीय मीमांसा जाणून घेतली. 

हा अभ्यास केल्यावर त्यांच्या लक्षात आले, की सरकारमध्ये मोठा गैरसमज आहे. अलिबागेत वीज आली तर वेधशाळेच्या नोंदीवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही आणि मग सरकारची मानसिकता अलिबागमध्ये वीज आणण्याकरिता सकारात्मक करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. 

तत्कालीन मुंबई राज्याचे नियोजन मंत्री स्व. आर. ए. वानखेडे यांच्याशी या मुद्दय़ावर चर्चा करून त्यांना भाऊंनी थेट अलिबागेत आणले आणि सारी वस्तुस्थिती समजावून सांगितली. त्यानुसार मागवलेल्या अहवालात अलिबागेत वीज आल्यास वेधशाळेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे निष्पन्न झाले आणि भाऊंचे तब्बल पाच वर्षाचे प्रयत्न व अथक पाठपुरावा फळास आला.

स्वातंत्र्यानंतर तब्बल पाच वर्षांनी म्हणजेच १९६२ साली अलिबाग शहरात वीज आली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.