नागराजू आणि सुलतानाचं आंतरधर्मीय लग्न “आर्य समाज विवाह” पद्धतीमुळे शक्य झालं
“माझ्या राजुला ट्रॅफिक सिग्नलजवळ लोकांच्या डोळ्यांदेखत मारण्यात आलंय. मी सर्वांच्या पाया पडले. कोणी मदतीला का आलं नाही?”
असा उद्विग्न सवाल सय्यद अश्रीन सुलताना विचारत होती.
तिच्या पतीला 4 मे रोजी हैदराबादमधील गजबजलेल्या रस्त्यावर चाकूने भोसकून ठार मारण्यात आलं. सुलतानाने बिल्लीपुरम नागराजू या दलित युवकाशी प्रेमविवाह केला होता. नागराजू हा हिंदू आणि त्यात दलित असल्याने घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. त्यातूनच मग सुलतानच्या नातेवाईकांनी त्याची हत्या केली.
सुरवातीपासूनच या लग्नाला सुलतानच्या घरच्यांचा विरोध होता. नागराजू सुल्तानाशी लग्न करण्यासाठी मुस्लिम धर्मात धर्मांतर करण्यासही तयार होता. मात्र सुलतानच्या घरच्यांनी तेही मान्य केलं नाही. अखेर मग दोघांनी आर्यसमाज पद्धतीनं लग्न केलं.
त्यासाठी सय्यद अश्रीन सुलताना हिनं हिंदू धर्मात धर्मांतर केलं. मग सुलतानची ‘पल्लवी’ झाली.
सुलतानच्या घरच्यांपासून धोका आहे हे ओळखून हे दोघं विशाखापट्टणमला शिफ्ट देखील झाले होते. मात्र काही दिवसांपूर्वी हैद्राबादमध्ये आल्यानंतर नागराजूची हत्या झाली आणि नागरजूबरोबरच या लग्नाचा दुःखद शेवट झाला.
ज्याप्रमाणे नागराजू आणि सुलताना या आंतरधर्मीय लग्नाला विरोध झाला होता तसाच विरोध देशभरातल्या हजारो जोडप्यांना होतो. मग अशावेळी ही जोडपी आर्यसमाज पद्धतीनं लग्न करण्याचा एक पर्याय निवडतात. याच पद्धतीनं नागराजू आणि सुलताना यांनी लग्न केलं होतं.
मग आंतरधर्मीय लग्न करण्यासाठी केवळ याच एका पद्धतीचा ऑप्शन आहे का?
तर नाही.
भारतात, विवाह आणि घटस्फोट संबंधित बाबी वेगवेगळ्या धर्मांच्या वैयक्तिक कायद्यांद्वारे नियंत्रित केल्या जातात. जसं की हिंदू पर्सनल लॉ , मुस्लिम पर्सनल लॉ. पण या अंतर्गत समान धर्माचे लोकच लग्न करू शकतात.
मात्र जेव्हा दोन वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना लग्न करायचं असतं तेव्हा त्यांना या कायद्यद्वारे लग्न करता येत नाही. मग यासाठी १९५४ मध्ये स्पेशल मॅरेज ऍक्ट तयार करण्यात आला. या कायद्यामध्ये जोडप्याला आपला धर्म नं बदलता लग्न करता येतं.
मात्र या कायद्याचा उपयोग करून लग्न करण्याची प्रोसेस ही खूप किचकट आणि वेळखाऊ आहे.
या कायद्यांअंतर्गत लग्न करण्यासाठी जोडप्याला स्वतः जाऊन लग्न रजिस्टर करावं लागतं.
लग्न करण्याच्या आधी हे लग्न मर्जीने होत आहे, याची लोकांना कल्पना आहे हे माहिती करून देण्यासाठी ३० दिवस आधी एक नोटीस काढली जाते.
त्यानंतर मग ही नोटीस पब्लिक केली जाते. त्यानंतर या लग्नावर कोणाला आक्षेप असले तर ते नोंदवण्यास सांगितलं जातं. त्यामुळं घरातून पळून आलेल्या आंतरधर्मीय जोडप्याला अशा सगळ्या प्रक्रिया करण्यास वेळ नसतो .
त्यामुळं झटपट लग्नाचा ऑप्शन देणाऱ्या आर्यसमाज पद्धतीनं लग्न उरकलं जातं. मात्र ही लग्नाची पद्धतही वादात असते.
त्याआधी या लग्न पद्धतीबद्दल बघू.
आर्य समाज ही हिंदू सुधारणावादी संघटना स्वामी दयानंद सरस्वती यांनी १८७५ मध्ये स्थापन केली होती. याच आर्य समाजाच्या मार्फत ही आंतरधर्मीय लग्नं देखील केली जातात.
लग्न समारंभ हिंदू वैदिक पद्धतीनुसारच होतो. मात्र आर्य समाज मूर्ती पूजा मानत नसल्याने काही विधी थोडे वेगळे असतात.
आर्य समाज मॅरेज व्हॅलिडेशन ऍक्ट १९३७ आणि हिंदू मॅरेज ऍक्ट १९५५ या कायद्यांनुसार हे विवाह वैध ठरवले जातात. यासाठी मुलींचं वय १८ आणि मुलाचं वय २१ असणं बंधनकारक असतं. या पद्धतीचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट म्हणजे आंतरजातीय विवाह आणि आंतर-धार्मिक विवाह देखील केले जाऊ शकतात.
हिंदू, बौद्ध, जैन, शीख अशी कोणतीही व्यक्ती आर्य समाज विवाह करू शकते. मात्र जोडप्यामधील एक जण मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी किंवा ज्यू या धर्मातून येणारा असेल तर त्यांच्यावर एक अट घातली जाते.
ती म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी किंवा ज्यू धर्मातून येणाऱ्या व्यक्तीला हिंदू धर्मात कन्व्हर्ट व्हावं लागतं.
शुद्धी प्रक्रिया करून या चार धर्मातून येणाऱ्या व्यक्तीला आर्य समाज हिंदू धर्मात घेतं. याच कारणामुळं सुलतानाने हिंदू धर्मात प्रवेश केला होता असं सांगण्यात येतं.
कन्व्हर्जनचा रुल असतानाही आंतरधर्मीय जोडप्याकडून या पद्धतीला पसंती दिली जाते कारण या प्रोसेसद्वारे लग्न अगदी झटक्यात उरकलं जातं.
अर्ध्या ते एक तासात लग्नाची प्रक्रिया पूर्ण होते.
स्पेशल मॅरेज ऍक्टच्या प्रक्रियेसाठी लागणार ३० दिवसांचा कालावधी इथं लागत नाही. आर्यसमाजाचा हॉल बुक करून अगदी अर्ध्या तासात लग्नाची तयारी पूर्ण होते. तसेच विटनेस म्हणून फक्त २ लोकं असलं तारिक चालतात. या सर्व कारणांमुळं आर्य समाजाच्या चालीरीतींन आंतरधर्मीय लग्न उरकली जातात.
मात्र यातील कन्व्हर्जनच्या अटीमुळे ही पद्धत विवादित मानली जाते.
तसेच आर्य समाज पद्धतीला स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली आणावं यासाठी कोर्टाचे दरवाजे देखील ठोठवण्यात आले होते. मध्यप्रदेश हायकोर्टाने काही काळ आर्य समाजाला मॅरेज सर्टिफिकेट देण्यास बंदी देखील घातली होती. मात्र पुढे सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या या निर्णयावर स्टे दिला होता.
अनेक सेलिब्रिटीजनी देखील आर्य समाज पद्धतीनं लग्न केलं आहे. त्यामध्ये महत्वाचं नाव घेता येइल ते म्हणजे शाहरुख खान आणि गौरी खान.
आर्य समाज पद्धतीनं झालेल्या या लग्नात शाहरुख खाननं जितेंदर कुमार तुल्लि हे नाव धारण केलं होतं.
मात्र शाहरुख – गौरी खान यांच्या सारखी हॅप्पी एंडिंग नागराजू आणि सुलताना यांच्या नशिबी आला नाही.
हे ही वाच भिडू :
- लग्नाच्या बोलणीपासून ते जुही चावलाचं करियर सावरण्यात कुरकुरे ब्रँडचा सिंहाचा वाटा होता…..
- मोदी सरकारने विधानसभेत काश्मिरी पंडितांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव मांडलाय…
- सेनेविरोधात बोललं की दरवेळी BMC कारवाई करते, हा आजवरचा इतिहास आहे
- नवऱ्याच्या खुनाचा बदला घ्यायचा होता म्हणून तिने नवऱ्याच्या खुन्याशीच लग्न केले