सिद्धूने फिल्डिंग लावली होती पण पंजाबचे नवीन कॅप्टन बनले चरणजितसिंह चन्नी .. !

सध्या पंजाबमध्ये राजकारणाचा धुरळा उडालाय. तिथले मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिलाय. याला कारणीभूत ठरले क्रिकेटमधले सिक्सर किंग, कॉमेडी नाईट्स विथ कपिलचे ठोको ताली स्पेशालिस्ट, आणि आता राजकारणात सिक्सर मारणारे नवज्योतसिंग सिद्धू.

आपला उभं आयुष्य भाजपमध्ये काढल्यानंतर सिद्धू काँग्रेसमध्ये आले आणि इथे कुरबुरीला सुरवात झाली. आधीच काँग्रेस म्हणजे जुना पुराना पक्ष, त्यात अनेक पिढ्यांचे नेते इथे नंबर लावून बसले होते. त्यात सिद्धूचा नम्बर कुठे लागायचा. त्यात काँग्रेसचा शेवटचा लोकनेता म्हणवले जाणारे अमरिंदर सिंग मुख्यमंत्री होते. अमित शहा नरेंद्र मोदींची देखील चाणक्य नीती ज्यांच्या पुढे फेल ठरते अशा अमरिंदर सिंग यांना हरवणे अशक्य होतं.

पण सिद्धू निघाला चिकट गडी. त्याने गेली दोन तीन वर्षे चांगलीच फिल्डिंग लावली होती. अमरिंदर सिंग आणि त्याचे डाव प्रतिडाव चालत होते. अशातच सिद्धूच्या पाठीशी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आपलं सगळं वजन टाकलं. सोनिया गांधीच्या जुन्या नेत्यांचा गट विरुद्ध राहुल-प्रियांका यांच्या तरुण तुर्कांचा गट असं या लढाईला स्वरूप मिळालं.

त्यातच अमरिंदर सिंग यांनी हळूहळू भाजपकडे सहानुभूती दाखवायला सुरवात केली होती. शेवटी त्या सगळ्या चर्चेला फायनल पूर्णविराम मिळाला.अमरिंदर सिंग यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला.

 ‘‘हा माझा पंजाब आहे. मी माझ्या राज्यासाठी शक्य ते सर्व केले. मी गेली ५२ वर्षे राजकारणात आहे, यापुढेही राहीन. मी राजीनामा दिला आहे; परंतु राजकारणात पर्याय कधीच संपत नाहीत,’’ असे अमरिंदर पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते. 

अमरिंदर सिंग यांचा राजीनामा तर सोनिया गांधींनी स्वीकारला, पण आता पुढे काय हा प्रश्न आ वासून पसरला होता.

मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह सुनील जाखड, सुखजिंदरसिंग रंधावा यांची नावं आघाडीवर होती. याशिवाय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अंबिका सोनी, तृप्त राजिंदर सिंग बाजवा, ब्रह्म मोहिंद्रा, विजय इंदर सिंगला, पंजाब काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुलजीत सिंह नागरा आणि खासदार प्रताप सिंह बाजवा यांच्या नावाची देखील चर्चा चालली होती.

जेष्ठ नेत्या अंबिका सोनी यांनी सर्वात सुरवातीलाच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. खरं तर इंदिरा गांधींच्या काळापासून काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या अंबिका सोनी या सर्व गटातटांना शांत करून नेतृत्व करू शकतात असा अनेकांना विश्वास होता. मात्र सोनी यांचं म्हणणं होत कि पंजाबचा पुढचा मुख्यमंत्री शीख समुदायातलाच असला पाहिजे. त्यांच्या माघारीमुळे पुन्हा वादावादीस प्रारंभ झाला.

पण या रेस मध्ये जिंकले ते चरणजीतसिंग चन्नी. काँग्रेसच्या विधिमंडळ बैठकीत म्हणे त्यांचं नाव एक मुखाने शिक्कामोर्तब करण्यात आलं.

अमरींदरसिंह यांच्या मंत्रीमंडळात ते औद्योगीक आणि तंत्र शिक्षण विभागाचे कॅबिनेट मंत्री होते. चमकूर साहीब हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ होता. सलग तीन वेळा त्यांनी या मतदारसंघात विजय मिळवला होता.

चरणजितसिंह हे ४८ वर्षांचे आहेत. ते रामदासिया ह्या शीख दलित कम्युनिटीतून येतात. पंजाबमध्ये दलितांची टक्केवारी ही ३० टक्क्यांच्या आसपास आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत ही सर्व मतं निर्णायकी ठरतील असा अंदाज बांधून चन्नींना मुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आल्याचं जाणकार सांगतायत. 

त्यांनी २०१५ साली वर्षभरासाठी चरणजितसिंह चन्नी यांनी पंजाबचे विरोधी पक्ष नेते म्हणूनही काम केलेले आहे. कॅप्टन अमरींदरसिंह यांचे कडवे विरोधक मानले जातात. म्हणूनच काँग्रेसने सिद्धू ला मागे टाकून त्यांना संधी दिली आहे. चन्नी यांच्या पुढे आता मोठे आव्हान असणार आहे. पाहू ते कॅप्टन आणि क्रिकेटर यांच्या सारख्या तगड्या प्लेयर्सचा सामना कसा करतात ते…

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.